अश्विन-जडेजाने राखली टीम इंडिया​ची लाज

पहिल्या दिवशी भारताच्या ६ बाद ३३९ धावा : अश्विनचे शतक, जैस्वाल-जडेजाची अर्धशतके

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
20th September, 12:17 am
अश्विन-जडेजाने राखली टीम इंडिया​ची लाज

चेन्नई : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने ६ गडी बाद ३३९ धावा केल्या आहेत. आर अश्विन नाबाद १०२ आणि रवींद्र जडेजा नाबाद ८६ धावांवर खेळत आहेत. १४४ धावांवर ६ विकेट अशी स्थिती असताना अश्विन आणि जडेजाने टीम इंडियाची लाज राखली आणि धावसंख्या ३०० पार पोहोचविली.
आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने सातव्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी केली. तसेच भारताला चांगल्या स्थितीत आणून सोडले. दुसऱ्या दिवशी या दोघांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. रवींद्र जडेजाला शतकासाठी अवघ्या १४ धावांची अावश्यकता असून पहिल्या सत्रात तो कामगिरी चोख बजावेल अशी आशा आहे. दुसरीकडे, भारताने पहिल्या दिवशीचा खेळ बांगलादेशच्या पारड्यातून खेचून आणला आहे.
पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात रोहित शर्मा अवघ्या ६ धावा करून तंबूत परतला. तर त्यानंतर आलेला शुबमन गिल तर खातेही खोलू शकला नाही. विराट कोहलीकडून फार अपेक्षा होत्या. पण त्या पूर्ण झाल्या नाही. अवघ्या ६ धावा करून बाद झाला. हसन महमूद पहिल्या सत्रात भारतीय फलंदाजांवर भारी पडला. यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंतने धावांची भागीदारी केली. ऋषभ पंत ३९ धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल काही करतील अशी भाबडी आशा होती. पण यशस्वीने ११८ चेंडूत ५६ धावा केल्या आणि तंबूत परतला. तो बाद होत नाही तोच केएल राहुलची खेळी १६ धावांवर संपुष्टात आली.
बांगलादेशकडून हसन महमूदने सर्वात चांगला स्पेल टाकला. त्याने आघाडीचे महत्त्वाचे विकेट घेतल्या. नहीद राणा आणि मेहदी हसन मिराजने प्रत्येकी एक गडी बाद केला. पण त्यांना आर अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडी काय फोडता आली नाही.
भारताच्या सहा विकेट पडल्यानंतर रविचंद्रन अश्निन आणि रवींद्र जडेजा यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी सातव्या विकेटसकाठी १९५ धावांची भागिदारी केली. विशेष म्हणजे यावेळी अश्विनने शतकी खेळी करत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. तसेच
अश्विनने चेन्नई कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात कसोटी क्रिकेटमधील सहावे शतक पूर्ण केले. तसेच चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर अश्विनचे ​​कसोटी क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे, जे त्याचे त्याच्या घरच्या मैदानवर देखील आहे. विशेष म्हणजे अश्विन भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात शतक झळकावणारा ५वा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. 
एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
अश्विनने भारतीय संघासाठी सातव्या किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना आतापर्यंत चार शतके झळकावण्याच्या बाबतीत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या यादीत पहिल्या क्रमाकांवर भारतीय संघाचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव आहेत. त्यांनी एकूण ७ शतके झळकावली आहेत. असे असले तरी अश्विनचे ​आजच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध आतापर्यंतचे कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद शतक झळकावले आहे. त्याने आजच्या सामन्यात अवघ्या १०८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
शतक झळकवणारे वयस्क भारतीय फलंदाज
विजय मर्चंट - ४० वर्षे २१ दिवस (वि. इंग्लंड, दिल्ली कसोटी, १९५१)
राहुल द्रविड - ३८ वर्षे ३०७ दिवस (वि. वेस्ट इंडिज, कोलकाता कसोटी, २०११)
विनू मंकड - ३८ वर्षे २६९ दिवस (वि. न्यूझीलंड, चेन्नई कसोटी, १९५६)

विनू मंकड - ३८ वर्षे २३४ दिवस (वि. न्यूझीलंड, मुंबई कसोटी, १९५५)

रविचंद्रन अश्विन - ३८ वर्षे २ दिवस (वि. बांगलादेश, चेन्नई कसोटी, २०२४)


अश्वीनने ब्रॉडला टाकले मागे
रविचंद्रन अश्विन आता कसोटीत ५०० पेक्षा जास्त विकेट्स घेणारा, १४ वेळा पन्नास पेक्षा जास्त धावा करणारा, ३६ वेळा पाचपेक्षा जास्त विकेट्स घेणारा, तसेच कसोटीत सहा शतके झळकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. या बाबतीत अश्विननंतर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने कसोटीत ६०४ विकेट्ससह १४ वेळा पन्नास पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

यशस्वी जैस्वालचा मोठा पराक्रम
यशस्वी जैस्वालने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात एक मोठा पराक्रम केला आहे. तो ८९ वर्षांचा विक्रम मोडत मायदेशात पहिल्या १० डावात ७५० हून अधिक धावा करणारा कसोटी इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या जॉर्ज हेडलीच्या नावावर होता, ज्याने १९३५ मध्ये १० कसोटी डावांनंतर मायदेशात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. हेडलीने ७४७ धावा केल्या होत्या. जैस्वालने चेपॉक कसोटीच्या पहिल्या सत्रात हा विक्रम मोडला. आजच्या सामन्यापूर्वी यशस्वी जैस्वालने घरच्या कसोटी सामन्यातील ९ डावात ७१२ धावा केल्या होत्या. त्याने खेळाच्या पहिल्या सत्रात ३७ धावा करत हेडलीचा विक्रम मोडला.