यूपी : गडकरी गरजले; कंत्राटदारांना दिली तंबी: म्हणाले-निकृष्ट काम केल्यास सोडणार नाही

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19th September, 11:03 am
यूपी : गडकरी गरजले; कंत्राटदारांना दिली तंबी: म्हणाले-निकृष्ट काम केल्यास सोडणार नाही

लखनौ : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेची दुरवस्था पाहून कंत्राटदार आणि संबंधित एजन्सींना सक्त ताकीद दिली आहे. रस्तेबांधणी आणि देखभालीमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल आणि त्यांची बँक हमी जप्त करण्यात येईल, अशा शब्दांत गडकरींनी सर्व कंत्राटदारांना तंबी दिली. 

गाझियाबादमध्ये वृक्षारोपण मोहिमेचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या नितीन गडकरींनी ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेची पाहणी केली. यावेळी रस्त्याची दुरवस्था पाहून त्यांनी एजन्सींवर जोरदार निशाणा साधला. जे कंत्राटदार व ऑपरेटर चांगले काम करत नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. 

निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांची बँक गॅरंटी जप्त केली जाईल, असा थेट इशारा गडकरींनी कंत्राटदारांना दिला. अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल आणि भविष्यात  त्यांना पुन्हा निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही अशी तजवीज केली जाईल, असे गडकरी म्हणाले. चांगल्या रस्त्यांची देखभाल करणाऱ्या एजन्सी आणि कंत्राटदारांना सरकारकडून विशेष प्राधान्य दिले जाईल. चांगले काम करणाऱ्यांना बक्षीस दिले जाईल, तर वाईट काम करणाऱ्यांना व्यवस्थेतून हद्दपार केले जाईल, असे गडकरी म्हणाले.

गडकरींनी आपल्या भाषणादरम्यान मोदी सरकारच्या काळात बांधलेल्या रस्ते आणि महामार्गांबद्दलही भाष्य केले.  भारताने रस्तेबांधणीत मोठी प्रगती केली आहे, मात्र देखभाल दुरुस्तीची गरज आहे. रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मी स्वतः पाहणी करत आहे. निकृष्ट देखभालीसाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदारांना सोडले जाणार नाही. एजन्सींना त्यांची जबाबदारी समजून घ्यावी लागेल आणि गुणवत्तेची कोणतीही कमतरता खपवून घेतली जाणार नाही, असे ते म्हणाले. भारत सरकार देशांतर्गत महामार्गची व्यवस्था सुधारण्यावर भर देत असल्याचे ते म्हणाले. 



हेही वाचा