जनमानसात प्रसिद्ध असलेल्या 'या' आरत्यांची रचना कुणी केली, तुम्हाला माहिती आहे का ? वाचा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th September, 05:42 pm
जनमानसात प्रसिद्ध असलेल्या 'या' आरत्यांची रचना कुणी केली, तुम्हाला माहिती आहे का ? वाचा

'आरती'- देवांची स्तुती करताना आर्त भावनेने गायले जाणारे कवन म्हणजेच आरती. जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी असलेल्या निराकाराबाबत आपल्या भावना पोहचवण्याचे माध्यम म्हणजे आरती. आरतीची व्युत्पत्ती किंवा उगम नेमक्या कोणत्या पद्य प्रकारातून झाला, याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण निवृत्ती-ज्ञानोबा-सोपान-मुक्ताई यांनी संस्कृत भाषेतील ज्ञानगंगा प्राकृत भाषेत आणल्यापासून म्हणजे ७०० ते ९०० वर्षांपासून अभंग-भजन-ओव्या-आरती इत्यादी पद्य प्रकारांनी सामान्य जनाला देवाच्या आणखी जवळ आणले. 

आता आरती असो वा भजन यामध्ये शेवटी नेहमी नाममुद्रा येते व यावरुन त्या रचनेची निर्मिती कोणी केली असावी, हे कळते. उदा. एका जनार्दनी, नामा म्हणे, रामी रामदास किंवा दास रामाचा इ. आता आपली श्री गणपतीची आरती जी समर्थ रामदास स्वामींनी मोरगाव येथे श्री गणेशाचे मनोहारी रुप बघून रचलेली आहे, ती 'सुखकर्ता दु:खहर्ता'. स्वामी समर्थ एकदा मोरगावला गणपतीच्या दर्शनाला गेले असताना तेथील पुजाऱ्याला आरती येत नाही हे पाहून त्यांनी 'सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची' या गणपतीच्या आरतीची निर्मिती केली. यामध्ये शेवटी 'दास रामाचा' ही नाममुद्रा आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती पूजनाने करतो, तसेच आरतीची सुरुवातही बाप्पांच्या 'सुखकर्ता दु:खहर्ता' या आरतीनेच होते. 

(ही मूळ आरती ७ कडव्यांची आहे पण प्रचलित फक्त तीनच कडवी आहेत) 

आरती पुढीलप्रमाणे आहे:-

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥

सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥

हिरेजडीत मुकुट शोभतो बरा ।रुणझुणती नुपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना

दास रामाचा वाट पाहे सदना ।संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना॥ जय ० ॥ ७ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥

या सोबतच मोरया गोसावी यांनी देखील मोरगावच्या मोरेश्वराची स्तुती करताना अशीच एक रचना केली आहे. ती अशी... 

जय जय जी गणराज विद्या सुखदाता । धन्य तुम्हाराे दर्शन मेरा मन रमता ॥ ध्रु० ॥

शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको । दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ॥ हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको । महिमा कहे न जाय लागत हूँ पदको ॥१॥

अष्टी सिद्धी दासी संकटको बैरी । विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकाई ॥ कोटीसुरजप्रकाश ऐसी छबि तेरी । गंडस्थलमदमस्तक झुले शशिबहारी ॥जय० ॥२॥

भावभगतिसे कोई शारणागत आवे । संतति संपति सबही भरपूर पावे ।

ऐसे तुम महाराज मोको अति भवे । गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥ जय० ॥३॥

दरम्यान, समर्थांच्या सुखकर्ता दुःखहर्तापूर्वी 'शेंदूर लाल चढायो' सारख्या आरत्या वाराणसीच्या घाटावर निर्मिल्या गेल्या. भारतात १५-१६व्या शतकात परकीय आक्रमकांनी उच्छाद मांडला. जनतेवर अनन्वित अत्याचारही केले. पण लोकांची देवावर असलेली श्रद्धा तसूभरही कमी झाली नाही, उलट ती वाढलीच.

महाराष्ट्रात ४००-५०० वर्षांपासून अन्य एक प्रचलित आरती म्हणजे विठ्ठलाची आरती. येई हो विठ्ठले माझे माऊलिये, अशी आर्त हाक जेव्हा भक्तांच्या कंठातून येते तेव्हा विठ्ठल हाकेला ओ देतोच. ५ शतके उलटूनही ही आरत भक्तांच्या मनावर गारुड करून आहे. 

येई हो विठ्ठले माझे माऊलिये,

निढळावरी कर ठेऊनि वाट मी पाहे।

आलिया गेलिया हाती धाडी निरोप,

पंढरपुरी आहे, माझा मायबाप।

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला,

गरुडावर बैसोनि माझा कैवारी आला।

विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी,

विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी।


समर्थ रामदासांनी महादेवाची आरती रचली...

श्री शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा ।

विषे कंठ कळा त्रिनेत्री ज्वाळा ।

लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।

तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझुळा । १ ।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ।।धृ ।।

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।

विभुतीचे उधळण शितिकंठ निळा ।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय देव ।। २ ।।

देवी दैत्यी सागर मंथन पै केले ।

त्यामाजी अवचित हलाहल जें उठिले ।

तें त्वां असुरपणे प्राशन केलें ।

नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ।।जय ।। ३ ।।

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।।

शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।।

रघुकुळटिळक रामदासा अंतरी ।। जय देव ।। ४ ।।

सतराव्या शतकामध्ये संत समर्थ रामदास होऊन गेले. त्यांनी अनेक आरत्या लिहिल्या आहेत. पण त्यापूर्वीही कुठल्याही देवतेची पूजा अर्चना करताना त्यांचे ठराविक असे अभिषेकाचे किंवा षोडोपचार, पंचोपचाराचे मंत्र होते व अजूनही आहेत. विशेषत: गणपतीचे गणपती अथर्वशीर्ष हे त्यातीलच एक प्रकार आहे, ते हजारो वर्षापूर्वीचे आहे. पुढे त्या पद्यप्रकारावर प्राकृत भाषेचे संस्कार झाले व आरत्यांचे आजचे स्वरूप आपल्यासमोर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात आरत्या आणि इतर प्रकार पुन्हा प्रचलित झाले. 


श्री देवीची आरती नरहरी सोनारांनी रचली...

श्री देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी ।

अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।

वारी वारी जन्ममरणाते वारी ।

हारी पडलो आता संकट निवारी ।। १ ।।

जय देवी जय देवी महिषासूरमथिनी ।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी महिषासूरमथिनी ।। धृ ।।

त्रिभुवनभुवनी पहाता तुजऐसी नाही ।

चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।

साही विवाद करिता पडिले प्रवाही ।

तें तू भक्तालागी पावसी लवलाही  ।। जय ।। २ ।।

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।

क्लेशापासुनि सोडी तोडी भवपाशा ।

अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा ।

नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा ।

जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी ।सुरवरईश्वरवरदे तारक संजिवनी || ३ ||


श्री विठ्ठलाची आरती संत नामदेवांनी रचली...

श्री विठ्ठलाची आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । 

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।

पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गां । 

चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ।। 

रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।। धृ ।।

तुळसीमाळा गळा कर ठेवुनि कटी । 

कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी ।

देव सुरवर नित्य येती भेटी । 

गरुड हनुमंत पुढे उभे राहती || जय ।। २ ।।

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा । 

सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।

राई रखुमाबाई राणीया सकळा । 

ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। जय ।। ३ ।।

ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती । 

चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।

दिंड्या पताका वैष्णव नाचती । 

पंढरीचा महिमा वर्णावा किती || जय ।। ४ ।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती । 

चंद्रभागेमध्ये स्नाने जें करिती ।

दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती । 

केशवासी नामदेव भावे ओवाळिती || जय ।। ५ ।।


श्री दत्ताची आरती संत जनार्दन स्वामींनी रचली...

श्री दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा |

त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा |

नेति नेति शब्द न ये अनुमाना |

सुरवरमुनिजन योगी समाधि न ये ध्याना || १ ||

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता |

आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव || धृ ||

सबाह्य अभ्यंतरी तूं एक दत्त |

अभाग्यासी कैची कळे न ही मात |

पराही परतली तेथे कैचा हा हेत |

जन्ममरणाचा पुरलासे अंत || जय || २ ||

दत्त येवाेनियां उभा ठाकला |

सद् भावें साष्टांगे प्रणिपात केला |

प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला |

जन्ममरणाचा फेरा चुकविला || जय || ३ ||

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान | हारपले मन झाले उन्मन |

मीतूंपणाची झाली बोळवण | एका जनार्दनी श्रीदत्तध्यान  || जय देव || ४ ||

आता गणपतीच्या आरतीनंतर म्हटली जाणारी सर्वांत लोकप्रिय प्रार्थना म्हणजे घालीन लोटांगण. प्रार्थनेतील चार कडव्यांचे कवी हे वेगवेगळे आहेत. ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत. पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते. सर्व कडवी कृष्णाला उद्देशून आहेत. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही. वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे. महाराष्ट्र, गोवा व उत्तर कर्नाटकात चतुर्थीत किंवा देवळात म्हटली जाते. या आरतीच्या सर्वात शेवटी येणारा 

हरे राम हरे राम |

राम राम हरे हरे |

हरे कृष्ण हरे कृष्ण |

कृष्ण कृष्ण हरे हरे |

हा सोळा अक्षरी मंत्र 'कलीसंतरणं' या उपनिषदातील आहे.

काही प्रचलित आरत्या आणि त्यांच्या निर्मात्यांबद्दल जाणून घेऊया 

* 'सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची' ही समर्थ रामदासांची निर्मिती आहे.

* 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा' ही संत नामदेवांची निर्मिती आहे 

* 'दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी' ही नरहरी सोनारांची निर्मिती आहे. 

* 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी' ही मारुतीची आरती समर्थ रामदासांची निर्मिती आहे.

* ‘लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा' ही महादेवाची आरतीदेखील समर्थ रामदासांची निर्मिती आहे. 

(समर्थांनी खंडेराय, दत्तात्रय, विठ्ठल, श्रीकृष्ण, दशावतार अशा विविध देवांच्या आरत्या रचल्या आहेत.)

*'येई हा विठ्ठले माझे माऊलिये' ही विठ्ठलाची आरती  विष्णूदासनामा यांनी रचली आहे. 

* 'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी' ही संत तुकारामांची निर्मिती आहे. 

* 'नाना परिमळ दूर्वा शेंदूर' व 'शेंदूर लाल चढायो' या दोन्ही गोसावी नंदन किंवा मोरया गोसावी यांची निर्मिती आहेत. 

*'त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा' ही संत जनार्दनांची रचना आहे. 

* पसायदान ही ज्ञानेश्वरांची रचना आहे. 

गणेशोत्सव किंवा कोणताही उत्सव हे लोकांना एकत्र आणण्याचे निमित्त. आपण रस्त्याने जाताना नुसते 'गणपतीबाप्पा…' म्हटले की कुणीतरी हमखास 'मोरया' म्हणून साथ देतोच. या उत्सवांमुळेच हे माणसामाणसांमधले भावबंध टिकून राहतात.आरत्या, अभंग किंवा तत्सम गोष्टी या समाजाला एकसंध बांधून ठेवणारी साधने आहेत. 

प्रार्थना

घालीन लाेटांगण वंदीन चरण,

डाेळ्यांनी पाहिन रुप तुझें।

प्रेमे आलिंगिन, आनंदे पुजिन, 

भावें आेवळिन म्हणे नामा।।

त्वमेव माता च पिता त्वमेव, 

त्वमेव बधुश्च सखा त्वमेव।

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, 

त्वमेव सर्वं मम देव देव ।।

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा, 

बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात।

कराेमि यद्यत सकलं परस्मै, 

नारायणयेति समर्पयामि।।

अच्युंत केशवं रामनारायणं, 

कृष्णदामाेदरं वासुदेव हरिम।

श्रीधरं माधवं गाेपिकावल्लभ, 

जानकीनायकं रामचंद्र भजे।।

हरे राम हरे राम राम राम हरे हरे।

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।।

हेही वाचा