दरम्यान उत्तराखंडमधील नैनितालमध्ये एका सिलिंडरमधून क्लोरीन गॅस गळती झाल्याची माहिती समोर येत आहे
अंबरनाथ : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका रासायनिक कारखान्यात गॅसची गळती झाली आहे. हा रासायनिक कारखाना अंबरनाथ (AMBARNATH) येथे आहे. गॅस गळतीमुळे संपूर्ण शहरात धुके पसरले आहे. त्यामुळे दृश्यमानता खूपच कमी झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, लोक डोळे आणि घशात जळजळ झाल्याची तक्रार करत आहेत. सद्यघडीस अधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
या अपघातानंतर सोशल मीडियावर काही व्हिडिओही समोर आले आहेत. यात संपूर्ण परिसरात धुके दिसत आहे. परिसरातील लोक तोंड आणि नाक झाकताना दिसले. गॅस गळतीचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना १२ सप्टेंबर रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. अंबरनाथ अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना रात्री उशिरा या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर गॅस गळती लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. अंबरनाथ अग्निशमन दलाच्या मुख्य अधिकाऱ्याने गॅस गळती लक्षणीयरीत्या कमी झाली असल्याचे सांगितले आहे.
त्याचवेळी उत्तराखंडमधील नैनितालमध्ये एका सिलिंडरमधून क्लोरीन गॅस गळती झाल्याची माहिती समोर येत आहे. माहितीनुसार, नैनितालमधील सुखताल पंप हाऊसजवळ ही दुर्घटना घडली. येथे वॉटर इन्स्टिट्यूटमध्ये ठेवलेल्या सिलिंडरमधून क्लोरीन गॅसची गळती झाली. गॅस गळतीनंतर तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, पोलीस, प्रशासन आणि डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आसपासच्या लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढले.
नैनितालच्या जिल्हा दंडाधिकारी वंदना सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन जणांना उलटीच्या तक्रारीमुळे बीडी पांडे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, ५० किलो क्लोरीन गॅस सिलिंडरमधून गळती झाल्याने जवळपास २५-३० घरांमध्ये राहणाऱ्या सुमारे १०० लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार १२ सप्टेंबरच्या दुपारपासून त्यांना गॅसची दुर्गंधी येत होती. सायंकाळपर्यंत या परिसरात राहणे असह्य झाले. त्यानंतर स्थानिकांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी योग्य उपाय योजना आखत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.