बेळगावात १ लाखाची बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू जप्त

दोन वाहने जप्त, एकास अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th September 2024, 12:13 am
बेळगावात १ लाखाची बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू जप्त

बेळगाव : बेळगाव शहरात गणेशोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना परिसरात तस्करी होत असलेली गोवा बनावटीची दारू जप्त करण्यासाठी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या हालचाली सुरू असल्याने बेकायदा दारू विक्रेते सक्रिय झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी बेळगाव उत्पादन शुल्क पथकाने १ लाखाची गोवा बनावटीची दारू, दोन वाहने जप्त केली असून एकाला अटक केली आहे.
उत्पादन शुल्क खात्याला माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बेळगाव येथील जुना पीबी रोडच्या रेल्वे ओव्हर ब्रिजखाली छापा टाकण्यात आला. या कारवाईत उत्पादन शुल्क पथकाला सुमारे ६५ लिटर गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या बेकायदा ८७ दारूच्या बाटल्या सापडल्या. सदर दारू टाटा इंडिका जीए ०७ के २०४६ आणि होंडा एक्टिवा केए २२ इएल ९५२४ मधून शहरातील बेकायदा दारू विक्रेत्यांना पुरवली जात होती. सदर दारू व दोन्ही वाहने जप्त करण्यात आली असून सुभाष सुधीर डे या संशयितालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान,जप्त केलेल्या दारूची किंमत अंदाजे १ लाख रुपये असून सदर वाहनांची किंमत १ लाख ५० हजार रुपये असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.