राजकुमारची हॅटट्रिक : आज दक्षिण कोरियाशी करणार दोन हात
मोकी : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचा विजयी सिलसिला कायम आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा कांस्य पदकाची कमाई करून परतलेल्या भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील राउंड रॉबिन फेरीतील लढतीत सलग तिसरा विजय नोंदवला. तिसऱ्या लढतीत भारतीय पुरुष हॉकी संघाने मलेशियाचा ८-१ असा बुक्का पाडला.
भारताकडून राजकुमार पालने ३ गोल डागत हॅटट्रिकची किमया साधली. त्याच्याशिवाय कर्णधार हरमनप्रीत सिंग याने १, जुगराज सिंग १, उत्तम याने १ आणि अरिजीत सिंग हुंडल याने २ गोल डागले. भारताने आक्रमक खेळ दाखवत पहिल्याच क्वॉर्टरमध्ये मलेशियावर दबाव टाकला. हॉफ टाइमपर्यंत भारताने ५ गोल नोंदवले होते. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये भारतीय संघाने आणखी ३ गोल आपल्या खात्यात जमा केले.
चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने यजमान चीनला पराभूत करत या स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात केली होती. चीनला भारताने ३-० असा दणका दिला होता. दुसऱ्या लढतीत भारतीय संघाने जपानला ५-१ असा शह दिला होता. पहिल्या दोन विजयानंतर तिसऱ्या लढतीत भारतीय संघाने मलेशियाला मोठ्या फरकाने पराभूत करण्याचा खास रेकॉर्डही आपल्या नावे जमा केला.
पाकिस्तानसोबत १४ रोजी सामना
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एकूण सहा संघांचा समावेश आहे. पहिल्या तीन लढतीनंतर १२ सप्टेंबरला भारतीय संघासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान असेल. त्यानंतर १४ सप्टेंबरला भारतीय संघ पाकिस्तान विरुद्धच्या हायहोल्टेज लढतीसाठी मैदानात उतरेल. भारतीय संघ या स्पर्धेतील गत चॅम्पियन असून यंदाच्या वर्षीही भारतीय संघच प्रबळ दावेदार आहे.