नैसर्गिक रंग वापरून गणेश मूर्तीचे रंगकाम करण्याची गरज आहे. हवा, ध्वनी, जल प्रदूषणाला निमंत्रण देणारे आपले सण उत्सव पर्यावरणासाठी पूरक आणि पोषक कसे होतील यादृष्टीने लोकाश्रय लाभावा म्हणून गणेशोत्सव मंडळांनी सक्रिय व्हायला हवे.
भारतीय लोकमानसाला श्रीगणेश लोकदैवताविषयी पूर्वापार विलक्षण प्रेम आणि भक्तीची भावना असून, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज्य आणि स्वातंत्र्यासंदर्भात इथल्या सर्वसामान्य जनतेत जागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून वापरले. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा भाऊसाहेब लक्ष्मण जावळे म्हणजेच ख्यातनाम वैद्य भाऊ रंगारी यांनी १८९२ साली पुणे येथे सुरू केली. १८९३ साली लोकमान्य टिळकांनी केसरीमधून पुणे येथे सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाविषयी प्रशंसोद्गार आपल्या लेखात काढले होते. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारतीय लोकमानसात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण होऊन, तत्कालीन 'तोडा आणि फोडा'द्वारे भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्याबरोबर त्यांच्यात संघटन भावना वाढीस लागावी यासाठी प्रयत्न केले. ब्राह्मण आणि अब्राह्मण समाजाला एकात्मतेच्या धाग्यात गुंफण्यासाठी टिळकांनी गणेश या दैवताची निवड समुळपणे केली असल्याची नोंद रॉबर्ट ब्रावन यांनी आपल्या लेखात केलेली आहे. त्याकाळी मुंबईत प्रकाशित होणाऱ्या बॉम्बे गॅझेटमध्ये १८८६ साली आग्नेलो दी गुबेरनाटीस यांनी आपल्या लेखात गणेशोत्सवाची यथोचित शब्दांत दखल घेतली होती. गणेशोत्सवाची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वकाळापासून प्रचलित होती आणि त्याला शिवकाळात तसेच पेशवे काळात उजाळा मिळाला असे मानले जाते. लोकमान्य टिळकांनी लोकदैवत या नात्याने श्रीगणेशाचे उच्चभ्रूपासून सर्वसामान्य समाजात असलेले स्थान अचूकपणे हेरले होते. हिंदू समाजात एकोपा निर्माण व्हावा म्हणून टिळकांनी गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याला प्राधान्य दिले. तत्कालीन वरिष्ठ ब्रिटिश अधिकारी हिंदू समाजाची अवहेलना करत होते. हिंदू समाजाचा वारंवार तेजोभंग केला जात होता आणि त्यासाठी जाती जमातीत विखुरलेल्या बाधवांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांतून विशेष भर दिला.
पेशवाईत महाराष्ट्रात भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून दशमीपर्यंत गणेशोत्सवाचे आयोजन धार्मिक त्याचप्रमाणे कथा कीर्तनादी कार्यक्रमांद्वारे केले जायचे. सवाई माधवरावांच्या कालखंडात गणेशोत्सव शनिवारवाड्यातील गणेशमहालात भव्यरित्या संपन्न होऊ लागला. पेशव्यांप्रमाणे पटवर्धन, दीक्षित, मुजुमदार सरदारांनी गणेशोत्सवाला प्राधान्य दिले. वैद्य भाऊ रंगारी, गणपतराव घोटवडेकर आणि नानासाहेब खासगीवाले यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला लोकमान्य टिळकांनी १८९४ साली विंचूरकरांच्या वाड्यात स्वतः सार्वजनिक गणपतीची स्थापना करून नवा आयाम मिळवून दिला. त्यांच्या नियोजनामुळे उत्सवाला अल्पावधीत अखिल भारतीय स्वरूप लाभले आणि परदेशात स्थायिक भारतीयांनी देखील राष्ट्रीय प्रवृत्तीची जोपासना व्हावी म्हणून तो सुरू केला. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीला ऊर्जा लाभावी म्हणून कल्पकनेते उपयोग केला.
त्यामुळे १८९४ पासून सार्वजनिक गणेशोत्सवाची संख्या वाढत गेली. कसबा, जोगेश्वरी, दगडूशेट हलवाई, मंडई असे गणपती स्थापन होऊ लागले आणि विस्कळीत समाजाला त्यांच्यातला दुजाभाव नष्ट करून एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना यश मिळू लागले. राजकीय अडथळे दूर करणारा देव म्हणून टिळक गणपती दैवताकडे पाहत असल्याने, त्यांनी गणेशोत्सवाच्या वेळी एकत्र येणाऱ्या गर्दीचे रूपांतर व्यापक स्वरुपाच्या राजकीय मेळाव्यात करण्याची भाषा ८ सप्टेंबर १८९६ रोजी केसरीत लिहिलेल्या लेखाद्वारे स्पष्ट केली. उत्सवाच्या माध्यमातून एकत्र येणाऱ्या समाजाला विधायक आण राष्ट्रभक्तीच्या अभिवृद्धीसाठी वापरण्याच्या विचाराला टिळकांनी केलेले दिशादर्शन देशभरातल्या गणेशभक्तांना प्रेरणादायी ठरले. श्रीमंत दगडूशेट हलवाई प्रतिष्ठापनामार्फत पुणे येथे स्थापन केलेल्या गणेशोत्सवाला २०१७ साली १२५ वर्षे पूर्ण झाली. या मंडळामार्फत दीनदुबळ्यांना अन्नछत्र देण्याबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांना आर्थिक पाठबळ देण्याची कामगिरी समर्थपणे केली जाते.
१९३४ साली मुंबईतल्या लालबाग बाजारपेठेतल्या कोळी समाजाने लालबागच्या गणपतीची स्थापना केली. नवसाचा देव म्हणून विशेष मान्यता लाभल्याने गणेशोत्सवात दरदिवशी लाखो गणेशभक्तांचा महासागर लालबागला लोटायचा. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर या गणेशोत्सव मंडळाने निर्बंध घातलेले आहेत. आज मुंबई परिसरात गणेशोत्सव मंडळांची संख्या दीड लाखांवर पोहचलेली आहे. त्यामुळे अपप्रवृत्तीचे प्रस्थ निर्माण झालेले आहे. लोकमान्य टिळक, भाऊ रंगारीसारख्या लोकनायकांनी गणेशोत्सवाला जो विधायक स्वरूपाला वाव दिला होता, त्यात आज विलक्षण परिवर्तन झालेले आहे, ही चिंतेची बाब आहे. निसर्ग आणि पर्यावरणाला हानी पोहचवणाऱ्या प्रवृत्तींना गणेशोत्सवाच्या माध्यमातून चालना लाभलेली आहे. ध्वनी प्रदूषणाच्या कहराने गणेशोत्सव मंडळांचा परिसर संत्रस्त झाल्याने सर्वसामान्यांना गोंगाट, गोंधळापासून मुक्तता मिळावी म्हणून न्यायालयांची द्वारे ठोठावी लागलेली आहेत. हवा, ध्वनी प्रदूषणाला रोखण्यासाठी आज न्यायालयांनी मंडळांना कानपिचक्या देण्याबरोबर पोलिसांना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश देण्याची पाळी आलेली आहे.
गणपतीच्या एकेकाळी मृण्मयी मूर्तीचे विसर्जन केले जायचे, त्यांची संख्या कमी होती. आज प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती मूर्ती रासायनिक रंगांनी रंगवलेल्या असल्याने, त्यांच्या विसर्जनामुळे ठिकठिकाणी जलस्रोतांचे प्रदूषण वाढू लागलेले आहे. त्यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयाने २००४ साली दिलेला निकाल क्रांतिकारक असाच आहे. परंतु असे असताना सण-उत्सवांच्या माध्यमातून पर्यावरणाला बाधा निर्माण करण्याच्या अपप्रवृत्तीने आपले बस्तान बासवले आहे. त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने वैश्विक तापमान वृद्धी आणि हवामान बदलाचे संकट सक्रिय झालेले ओळखून लोकमानसाला पर्यावरणस्नेही सण उत्सव साजरे करण्यास प्रवृत्त करण्याची नितांत गरज आहे. गोमय आणि माती एकत्र करून गणपती मूर्ती करण्याची गुजराती पध्दत लोकचळवळ करण्यास प्रयत्न झाले पाहिजे. नैसर्गिक रंग वापरून मूर्तीचे रंगकाम करण्याची गरज आहे. हवा, ध्वनी, जल प्रदूषणाला निमंत्रण देणारे आपले सण उत्सव पर्यावरणासाठी पूरक आणि पोषक कसे होतील यादृष्टीने लोकाश्रय लाभावा म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सक्रिय होण्याची गरज आहे.
प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५