ज्या स्वच्छ भारत अभियानाची विरोधकांनी केवळ बदनामीच केली, त्या अभियानामुळेच पाच सहा लाख नवजात अर्भकांना जीवदान मिळाल्याचा दावा अभ्यासातून करण्यात आला आहे. असे असेल तर या अभियानाचे ते मोठे यश म्हणावे लागेल.
केंद्रात सत्तेवर आल्याआल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानास येत्या दोन ऑक्टोबर रोजी म्हणजे गांधी जयंतीदिनी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत निर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्रातील सरकारने केलेल्या कार्याचा तपशील नियमितपणे जनतेसमोर येत असला तरी या अभियानातून आपण नेमके काय साध्य केले, याची माहिती अखेर ब्रिटनमधील एका प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित अशा विज्ञान पत्रिकेतून प्रसिद्ध झाली तेव्हा कुठे या अभियानास मिळालेले यश जगासमोर आले आहे. स्वच्छ भारत अभियानास आरंभ झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ टीकेचे धनी बनले होते आणि राहुल गांधी यांच्यापासून अखिलेश यादव आणि सोनिया गांधींपासून जयराम रमेश यांच्यापर्यंत सर्वांनीच स्वच्छ भारत अभियानावर टीका करताना हे अभियान म्हणजे आपल्या बहुमूल्य वेळेचा होणारा अपव्यय कसा आहे आणि पंतप्रधान मोदी यांनी आपल्या प्रचारासाठीच या योजनेचे साधन कसे बनवले आहे, असाच आरोप सातत्याने करत स्वच्छ भारत अभियानाची बदनामी कशी होईल यावरच प्रामुख्याने भर दिला. पण आता 'नेचर' या ब्रिटनमधील विज्ञान पत्रिकेने केलेल्या अभ्यासातून बाहेर आलेल्या माहितीमुळे त्याचे यश अधोरेखित झाले आहे आणि हा निष्कर्ष तमाम विरोधकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा ठरावा असाच असल्याचे म्हणता येईल.
स्वच्छ भारत अभियानातून नेमके काय साध्य केले यावर केलेल्या अभ्यासातून ब्रिटनमधील 'नेचर' विज्ञान पत्रिकेचे जो निष्कर्ष प्रसिद्ध झाला आहे तो पाहता विरोधकांनीही आता या अभियानात खुल्या मनाने सहभागी होण्याची कशी गरज आहे हेच एका परीने दाखवून दिले आहे. ज्या अभियानाची मागील दशकभर विरोधकांनी केवळ बदनामीच सातत्याने केली, त्या अभियानामुळेच किमान पाच सहा लाख नवजात अर्भकांना जीवदान मिळाल्याचा दावा या अभ्यासातून करण्यात आला आहे. दरवर्षी किमान साठ सत्तर हजार नवजात अर्भकांना जीवदान मिळत असेल तर मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचे ते खूप मोठे यश म्हणावे लागेल. दहा वर्षांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची सुरुवात केली तेव्हा अर्थातच आपल्या खंडप्राय देशात त्यातून काही फार मोठे साध्य होऊ शकेल अशी अपेक्षा खुद्द पंतप्रधानांनीही केली नसावी पण आज या अभियानातून आपण काय मिळवलंय हे पाहताना आपल्याला आता अधिकच गांभीर्याने हे अभियान पुढे न्यावे लागेल, अशी भावना प्रत्येकाच्या मनात तयार झाली तर ती खूप मोठी गोष्ट ठरावी. या अभियानाचा प्रभाव देशात सगळीकडे तसा अजिबात दिसून आला नाही. काँग्रेस वा अन्य विरोधी पक्षांची सरकारे जेथे आहेत वा होती त्या राज्यांनी तर या अभियानाची तशी दखलही घेतली नाही आणि राजकीय कारणासाठी त्याकडे कानाडोळा केला. या उप्परही अभियानास मिळालेले यश देशवासीयांना आणि विशेष करून राहुल गांधी कंपनीला समर्पक असा संदेश देणारे आहे.
स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यामागे अर्थातच पंतप्रधान मोदी यांचा स्पष्ट असा उद्देश होता. पाच वर्षांत म्हणजे २०१९ पर्यंत स्वच्छ आणि खुल्या शौचमुक्त भारताचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवूनच हे अभियान सुरू केले होते. दहा वर्षांनंतर आपण हे उद्दिष्ट कितपत गाठू शकलो हा चर्चेचा विषय असला तरी जे काही साध्य केले तेही थोडेथोडके म्हणता येणार नाही. स्वच्छ भारत अभियानास जे यश मिळाले आहे ते विविध प्रकारे मोजले जाऊ शकते. मागील दहा वर्षात दहा कोटींहून अधिक शौचालये बांधली गेली आहेत आणि त्यामुळेच शौचालय कव्हरेज ३८ टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत वाढले आहे याची दखल नाही म्हटले तरी घ्यावीच लागेल. अशी अनेक गावे आणि शहरे आहेत की त्यानी स्वतःला उघड्यावर शौचमुक्त घोषित केले आहे. लोकांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत वाढलेली जागरूकताही तेवढीच महत्वाची आहे. स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत सर्वसामान्य लोकही आता बोलताना, त्यावर चर्चा करताना दिसत आहेत हेही या अभियानाचेच यश म्हणता येईल. सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे वा घाण करणे यापासून लोक आज दूर राहणे तर पसंत करतात पण त्याबरोबरच इतरांनाही त्यावर दोन शब्द सुनावण्यात मागे राहात नाहीत, हे चित्रही ठिकठिकाणी दिसते हे नाकारता येणार नाही.
देशात सगळीकडेच लहान मोठ्या शहरात आणि मोठ्या गावातही कचरा एकत्र करण्याचे काम अगदी सुनियोजित रितीने चालले आहे हे तर मान्य करायला हवेच. ही व्यवस्था तर निश्चितच स्वच्छ भारत अभियानाची एक मोठी देणगी आहे, याचा विसर कोणाला पडू नये. आपल्या खंडप्राय देशात स्वच्छतेच्या आघाडीवर अजूनही खूप काही करता येईल आणि 'नेचर' विज्ञान पत्रिकेने आपल्या अभ्यासानंतर जाहीर केलेल्या निष्कर्षांनुसार तर अजून बरीच आव्हाने स्वीकारता येतील. विरोधक 'नेचर'ने काढलेल्या निष्कर्षांवर कितपत विश्वास ठेवतील याबाबत संदेहच आहे. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्यातच धन्यता मानणाऱ्या विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानाचे स्वागत करून खुल्या दिलाने त्यास पाठिंबा दिला असता तर मागील दहा वर्षांत आपण याहून खूप काही अधिक साध्य केले असते. सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात आजधे चित्र दहा वर्षांआधीच्या चित्राच्या तुलनेत खूप समाधान देणारे आहे. शौचालय निर्माण करण्यावर दिलेला भर खूप महत्वाचा ठरला आणि सहा सात लाख बालकांचे प्राण वाचवण्यात व्यवस्थेला यश आले. नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण हजारामागे वीस बावीसवरच आणणे हे या अभियानाचे ठळक यश आहे. अजूनही या आघाडीवर बरीच आव्हाने आपल्यासमोर आवासून उभी आहेत. प्लास्टिक हा तर मोठा शत्रू होऊन उभा ठाकला आहे. त्याविरोधात केली जाणारी उपाययोजना केवळ कागदोपत्रीच अडकून पडलेली दिसते. स्वच्छतागृहे आणि पायाभूत सुविधांची स्वच्छता तसेच कार्यक्षमता राखणे हेही मोठे आव्हान असून प्रभावी कचरा व्यवस्थापन प्रणाली टिकून राहिली तर या आघाडीवर अजून खूप मोठे यश आम्ही संपादन करू शकू. अभियानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आम्हाला अजून खूप काही करता येईल.
वामन प्रभू
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत)
मो. ९८२३१९६३५९