विकासाची कास धरणारे धोरण

ब्रुनेई

Story: विश्वरंग |
09th September 2024, 11:11 pm
विकासाची कास धरणारे धोरण

ब्रुनेई हा भारताच्या 'अॅक्ट ईस्ट' धोरण आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अनेक बाबतींत महत्त्वाचा भागीदार आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतीय पंतप्रधानांची पहिली द्विपक्षीय भेट. भारत आणि ब्रुनेई यांच्यातील ४० वर्षांच्या राजनैतिक संबंधातील मैलाचा दगड या भेटीने अधोरेखित केला आहे.      

संरक्षण, व्यापार, ऊर्जा आणि अंतराळ तंत्रज्ञान या चार महत्त्वाच्या कारणांमुळे ब्रुनेई भारतासाठी खास आहे. याशिवाय अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही ब्रुनेई हा भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे. भारत आता स्वतःच उपग्रहांची निर्मिती करून ते प्रक्षेपित करतो.  त्यांच्या ट्रॅकिंगसाठी भारताने अनेक ठिकाणी ग्राउंड स्टेशन्स तयार केले आहेत. भारताने २०१८ मध्ये ब्रुनेईसोबत सामंजस्य करार केला होता. त्याला कोऑपरेशन इन एलिमेंटरी ट्रॅकिंग अँड कमांड स्टेशन फॉर सॅटेलाइट असे नाव देण्यात आले. त्या बदल्यात भारत ब्रुनेईच्या लोकांना अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित प्रशिक्षण देत आहे.      

अंतराळ क्षेत्राप्रमाणेच ब्रुनेई हा ऊर्जा क्षेत्रात भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे. ब्रुनेई भारताला तेल निर्यात करतो. मात्र, अलीकडच्या काळात रशियाकडून वाढत्या तेल आयातीमुळे ब्रुनेईबरोबर भारताच्या तेल खरेदीत घट झाली आहे. संरक्षण क्षेत्राचा विचार करता भारतीय नौदलाची जहाजे ब्रुनेईला भेट देत असतात. आता ही भागीदारी पुढे नेत भारत ब्रुनेईसोबत संरक्षणविषयक संयुक्त कार्यगट स्थापन करणार आहे.      

भारताने ब्रुनेईच्या हायड्रोकार्बन क्षेत्रात २७० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. नैसर्गिक वायूशी निगडित गरजा पूर्ण करण्यासाठी भारत यात आणखी वाढ करू शकतो. यावेळी भारत म्यानमारमधील परिस्थितीवरही चर्चा करेल. सागरी सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्य यासारख्या क्षेत्रात ब्रुनेईसोबत सहकार्य वाढवण्यावर भारत भर देईल.      

नोव्हेंबर २०१४ मध्ये १२ व्या आसियान-भारत शिखर परिषदेत हे धोरण सुरू करण्यात आले. सध्या, म्यानमारमधील अॅक्ट ईस्ट धोरण हे लुक ईस्ट धोरणाचाच विस्तार आहे. पूर्वेकडे पहा धोरण १९९२ मध्ये लागू करण्यात आले. लुक ईस्टच्या विपरीत भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणाचा उद्देश आशिया-पॅसिफिकमधील शेजारी देशांसोबत परस्पर धोरणात्मक, आर्थिक सहकार्य आणि सुरक्षा सहकार्याला प्रोत्साहन देणे आहे. या धोरणांतर्गत, हिंद महासागरात चीनच्या वाढत्या सागरी क्षमतेला तोंड देण्यासाठी भारताने दक्षिण चीन समुद्र आणि हिंदी महासागरात सामरिक भागीदारी तयार केली आहे.

ऋषभ एकावडे