अर्जुना, "अंतकाळी माझे स्मरण नाही झाले तर? तर मग पुढे त्याची गती काय?" तर माझे ऐक - जो नित्य नेमाने खऱ्या अर्थाने माझी उपासना करतो त्याची अंतकाळी सेवा मीच करतो.
सर्व द्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च। मूर्ध्न्याधायात्मन: प्राण-
मास्थितो योगधारणाम्।। १२।।
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् । य: प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ।। १३।।
सरळ अर्थ : हे अर्जुना, सर्व इंद्रियांच्या द्वारांना आवरून अर्थात इंद्रियांना विषयांपासून रोखून धरून तसेच मनाला हृदयदेशी स्थिर करून व आपल्या प्राणाला मस्तकात स्थापन करून योगधारणेत स्थित होऊन; जो पुरुष ॐ अशा या एक अक्षररूप ब्रह्माचे उच्चारण करीत आणि त्याचा अर्थस्वरूप असे माझे चिंतन करीत शरीराला सोडून जातो तो पुरुष परम गतीप्रत पावतो.
विस्तृत विवेचन : इंद्रियांची सगळी दारे बंद करून व मनावर निर्बंध घालून जेव्हा अखंड जीवन संयमित होते तेव्हाच मन हृदयात बुडण्यासारखी स्थिती निर्माण होते. जसे एखाद्या पांगळा असलेल्या माणसाला त्याच्या पांगूळपणामुळे कुठेही ये जा न करता येता एकाच जागी बसून रहावे लागते, तसे मन अंतरात कोंडले (म्हणजे त्याला बाहेर भराऱ्या मारूच दिल्या नाहीत) तर ते हळूहळू तिथेच अंतरात निवांत रहायला शिकते. आणि असे झाले की चित्त आपोआपच स्थिरावते! अशा वेळी मग अर्जुना, अशा शांत झालेल्या चित्ताने आपला श्वास सुषुम्नेच्या मार्गे मूर्धन्याकाशात आणून तिथे तो 'ॐ'कार - नादात मिळवून टाकावा. त्यावेळी अकार, उकार आणि मकार या तीन मात्रा अर्धबिंबात म्हणजे आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र (सहस्त्रदल) यांच्या सीमेवर स्थिर होतात. हे साधेपर्यंत तो प्राणवायू धारणेच्या बळे (म्हणजे मन एकाच विषयावर स्थिर करून ठेवण्याच्या अभ्याससाध्य क्षमतेने) शून्यात मिळतोय न मिळतोय अशा पातळीवर नेऊन ठेवावा. असे करता करता एक वेळ अशी येते की जेव्हा तो वायू 'बिंबात ॐकार विराजल्यासारखा' चिदाकाशात स्थिरावतो. वायू चिदाकाशात स्थिरावल्यावर जेव्हा प्राण महाशून्यात लीन होतो तेव्हा ॐकार - स्मरणाची पूर्णता होते.
ॐकाराला प्रणव म्हणतात. ॐ हे ध्वनीचे मूळ रूप होय. हा अत्यंत नैसर्गिक सहज-ध्वनी आहे. अ, उ, म या तीन वर्णांचा संयोग यात दिसतो. यातूनच सर्व वेदादि वाङमयाचा आणि विश्वाचाही विस्तार झाला असे समजले जाते. परब्रह्माचे सर्वश्रेष्ठ प्रतीक म्हणून याचे ध्यान करतात. प्रणव, उद्गीथ या शब्दांनी ॐकाराचाच बोध होतो. नामजप सुध्दा ॐकार जपातूनच निर्माण झाला. ॐ म्हणजे परब्रह्मवाचक शब्द. ईश्वरविषयक सर्व कल्पना ॐ मध्ये अंतर्भूत आहेत.
ॐ मधील अ, उ, म याना मात्रा म्हणतात; मात्र ॐ मध्ये या तीन मात्रांशिवाय चौथी 'अर्धमात्रा' (अव्यक्त) आहे. ती ँ या चिन्हाने दर्शवितात. यातील मात्रांचे अनेक अर्थ उपनिषदांतून दिलेले आढळतात. जसे - अ म्हणजे विष्णू, उ म्हणजे शिव, म म्हणजे ब्रह्मा आणि एकत्रित ॐ म्हणजे परब्रह्म किंवा अ म्हणजे पृथ्वी, उ म्हणजे अंतरिक्ष, म म्हणजे स्वर्ग आणि एकत्रित ॐ म्हणजे विश्वाचे मूळ परब्रह्म. अर्धमात्रा ही मूळमायेची निदर्शक समजतात.
तो ॐकार, प्रणव चिदाकाशांत स्थिरावलेला असताना प्राण महाशून्यात लीन झाल्यावर त्या प्राणाच्या दृष्टीने साहजिकच ज्यात स्वतः पूर्णतः लीन झालोय असे एकच महाशून्य उरते. म्हणून ज्याला एकाक्षरी ब्रह्म म्हणतात तेच माझे श्रेष्ठ रूप आहे. अंतकाली तेच आठवत देह ठेवल्याने जी माझ्या स्वरूपाची नि:शंक प्राप्ती होते ती दुसऱ्या कुठल्याही साधनाने होत नाही.
आणि अर्जुना, अंतकाळी माझे स्मरण होईलच हे कशावरून? ते होणारही नाही एखादेवेळेस! जीवनाचे सुख संपत आलेय, इंद्रियांमध्ये अस्तित्वाच्याच लढ्याची खळबळ चालू झाली आहे, अंतर्बाह्य मृत्यूची लक्षणे दिसायला लागली आहेत; अशा वेळी अशा परिस्थितीत अंतकाळी इंद्रियांना रोधून शांतचित्ताने बसून प्रणव म्हणजे ॐकार आठवणे हे कुणाला आणि कसे सुचेल? आणि मग ते नाही आठवले, तर मग पुढे त्याची गती काय? अशी शंका जर तुझ्या मनात येत असेल, तर माझे ऐक - या अशा संशयाला तुझ्या मनात थारा देऊ नकोस. कारण जो नित्य नेमाने खऱ्या अर्थाने माझी उपासना करतो त्याची अंतकाळी सेवा मीच करतो.
अनन्यचेता: सततं यो मां स्मरति नित्यश:।
तस्याहं सुलभ: पार्थ नित्ययुक्तस्य योगिन: ।। १४ ।।
मामुपेत्य पुनर्जन्म दु:खालयमशाश्वतम्।
नाप्नुवन्ति महात्मान: संसिध्दिं परमां गता: ।। १५।।
सरळ अर्थ : हे पार्था, जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्यचित्ताने स्थित होत सदा सर्वदा निरंतर माझे स्मरण करतो त्या निरंतर माझ्या ठिकाणी युक्त झालेल्या योग्याला मी सुलभ आहे (अर्थात सहजच त्याला प्राप्त होत असतो) आणि ते परम सिध्दीला प्राप्त झालेले महात्माजन मला प्राप्त झाल्यावर दु:खाचे स्थानरूप व अशाश्वत अशा पुनर्जन्माला प्राप्त होत नाहीत.
विस्तृत विवेचन : हे पार्था, आपल्या मनाच्या सगळ्या बाह्य प्रवृत्तींना निरोधून व विषयांना तिलांजली देऊन मला आपल्या हृदयात साठवून जे माझे भक्त माझ्या योग-सुख-भोग-समाधानात क्षुधा-तृषा विसरून नित्य तल्लीन होतात, तिथे या नेत्रेंद्रिय, घ्राणेंद्रिय, स्पर्शेंद्रिय, इत्यादींची पर्वा कोण करणार? असे जे आपल्या अंतरात पूर्ण सामरस्याने माझी उपासना करत माझ्या ठायी तल्लीन होऊन मीच होऊन राहतात, त्यांनी अंतकाळी माझे स्मरण करावे आणि त्यावर मी त्यांना उध्दरावे यात माझी थोरवी ती काय गणायची अर्जुना?
(क्रमशः)
मिलिंद कारखानीस
(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)
मो. ९४२३८८९७६३