मणिपूर : सात दिवसांत चौथ्यांदा उडाला हिंसेचा भडका; जिरीबाममध्ये ५ ठार, इम्फाळमध्येही तणाव

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th September, 12:05 am
मणिपूर : सात दिवसांत चौथ्यांदा उडाला हिंसेचा भडका; जिरीबाममध्ये ५ ठार, इम्फाळमध्येही तणाव

इम्फाळ : मणिपूर गेल्या दीड वर्षांपासून जातीय तेढ आणि इतर कारणांमुळे सुरू असलेल्या हिंसाचारात होरपळत आहे. कुकी आणि मैतेई समुदायांतील अनेकांचे बळी या रक्तरंजीत संघर्षाने घेतले आहे. अशातच गेल्या ७ दिवसांपासून पुन्हा सक्रिय झालेल्या कुकी अतिरेक्यांनी चौथ्यांदा हिंसाचाराच्या विस्तवात तेल टाकण्याचे काम केले असून जिरीबाममध्ये ५ जण ठार झालेत तर इम्फाल खोऱ्यामध्येही तणाव आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी, ७ सप्टेंबर जिरीबाम जिल्ह्यात एका वृद्धाची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी डोक्यात गोळी झाडून हत्या केली. यांनंतर जिरीबामच्या डोंगराळ भागात दोन समुदायांमध्ये गोळीबारही झाला. यात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, इम्फाळमधील मणिपूर रायफल्सच्या मुख्यालयावर जमावाने हल्ला केला, त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांना गोळीबार करावा लागला.

शुक्रवारी रात्री एका जमावाने इंफाळ पश्चिम आणि इंफाळ पूर्व जिल्ह्यांमधील मणिपूर रायफल्सच्या मुख्यालयावर हल्ला केला. जमावाचा हेतू सुरक्षा दलांकडून शस्त्रे हिसकावून घेण्याचा होता. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलीस आणि सीआरपीएफने मिळून पेलेट गनने गोळीबार केला. याशिवाय जमावाला पांगवण्यासाठी मॉक बॉम्ब आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. यात ५ जण जखमी झाले असून, त्यांना जेएनआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. मणिपूरच्या इंटिग्रिटी कमिटी (COCOMI) ने कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात सरकार अयशस्वी ठरल्याचा आरोप करत काम थांबवण्याची आणि सार्वजनिक कर्फ्यूची मागणी केली आहे. तेव्हापासून इम्फाळच्या सर्व बाजारपेठा आणि रस्त्यांवर शांतता आहे. गेल्या ७ दिवसात मणिपूरमध्ये ४ मोठ्या हिंसक घटना घडल्या आहेत. १ सप्टेंबरपासून आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल १७ जण जखमी झाले आहेत. आजच्या घटणेपूर्वी आणखी तीन हिंसक घटना घडल्या होत्या यात तीन जण ठार आणि १२ जण जखमी झाले होते.

१ सप्टेंबर रोजी मणिपूरमध्ये पहिल्यांदाच हिंसाचारात ड्रोन हल्ला झाला. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कोत्रुक गावातील पर्वताच्या शिखरावरून अतिरेक्यांनी ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात २ जणांचा मृत्यू झाला असून ९  जण जखमी झाले आहेत. यानंतर ३ सप्टेंबरला सेजम चिरांग गावात आणखी एक ड्रोन हल्ला झाला, त्यात ३ जण जखमी झाले. या हल्ल्यांमध्ये छतावर बॉम्ब टाकून अनेक घरांचे नुकसान झाले. ६ सप्टेंबर रोजी मणिपूरचे माजी मुख्यमंत्री मायरामबम कोईरेंग यांच्या घरावर रॉकेट बॉम्बने हल्ला करण्यात आला. हा हल्ला मोइरांगमध्ये झाला, यात एका वृद्धाचा मृत्यू झाला तर ५  लोक जखमी झाले. कोईरेंग हे मणिपूरचे पहिले मुख्यमंत्री होते आणि त्यांनी १९६३ ते १९६७ या काळात हे पद भूषवले होते. 

सततच्या हिंसाचारामुळे राज्यात तणावाचे वातावरण आहे . मणिपूर सरकार आणि केंद्र सरकार हिंसाचारावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा दलांनी अलीकडे नवीन उपकरणे आणि शस्त्रे वापरली आहेत. दरम्यान, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

हेही वाचा