कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या दगडफेकीनंतर दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. तोडफोड आणि जाळपोळ झाल्याची घटना घडली आहे. परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मंड्या : येथे गणेश विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर परिस्थिती बिघडली. दोन गटात हाणामारी झाल्यानंतर जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली . सध्या या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मात्र, परिसरात तणाव कायम आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंड्या जिल्ह्यातील नागमंगला भागात ही घटना घडली. बदरीकोप्पलू गावातील तरुण गणेश विसर्जनासाठी मिरवणूक काढत होते. दरम्यान नागमंगला येथे गणेश विसर्जन मिरवणूक मुख्य रस्त्यावरून एका मशिदीजवळून जात असताना मशिद परिसरातून मिरवणुकीवर दगडफेक सुरू झाली.
दगडफेकीनंतर परिस्थिती हळूहळू चिघळू लागली आणि दोन गटात हाणामारी सुरू झाली. हल्लेखोरांनी दुकानांची तोडफोड आणि वाहने पेटवून दिली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, इतर जिल्ह्यातून अतिरिक्त फौजफाटा मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले.
गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर काही लोकांनी पोलीस स्थानकात निदर्शने करत या घटनेला जबाबदार असलेल्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. मंड्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या ठिकाणी कर्फ्यू देखील लावण्यात आळा आहे.