जिनेव्हा : हिंडेनबर्गने गेल्या काही अवघ्या दीड-दोन वर्षांपूर्वी एका धक्कादायक अहवालाद्वारे भारतीय शेअर बाजारात खळबळ माजवली होती. यामुळे अदानी समूहाचे प्रचंड नुकसान झाले. गेल्या जुलै-ऑगस्टमध्ये देखील असाच काहीसा प्रकार झाला पण भारतीय शेअर्स बाजार काही डगमगला नाही. दरम्यान सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांचावर देखील हिंडेनबर्गने बरेच गंभीर आरोप केले आहेत. आता पुन्हा हिंडेनबर्गने आपला मोर्चा अदानी समूहाकडे वळवला आहे.
(Adani Hindenburg Report). हिंडेनबर्गने नवीन अहवाल जारी केला आहे. स्विस बँकेत असलेले अदानी समूहाचे खाते गोठवण्यात आल्याचे नमूद करत, यामागील कारण अदानी समूहाच्या एका उच्च पदस्थ व्यक्तीचा मनी लॉन्ड्रिंगमध्ये आढळून आलेला सहभाग आहे असे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार; स्विस बँकेत अदानी समूहाशी निगडीत अनेक खात्यांमध्ये जमा तब्बल ३१० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम गोठवण्यात आली आहे. भारतीय चलनात ही रक्कम २६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. स्विस अधिकाऱ्यांनी मनी लाँड्रिंगच्या आरोपांच्या चौकशीचा भाग म्हणून ही खाती गोठवली आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या स्विस फौजदारी न्यायालयाच्या नोंदींच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे. मात्र, अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, याबाबत ट्विट करत हिंडेनबर्गने म्हटले आहे की २०२१ मध्ये ही तपासणी सुरू झाली आहे. हिंडेनबर्गने त्याच्या अधिकृत X हँडलवरून याबद्दल एक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे,
“स्विस अधिकाऱ्यांनी अदानी विरुद्ध मनी लाँड्रिंग आणि सिक्युरिटीज फसवणुकीच्या गुंतवणुकीच्या आरोपांच्या चौकशीचा भाग म्हणून एकाधिक स्विस बँक खात्यांमधील ३१० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम गोठवली आहे. "अदानी समूहाच्या उच्च पदस्थ व्यक्तीने अदानीच्या मालकीचे सर्व शेअर्स हे ऑपेक BVI/मॉरिशस आणि बर्म्युडा फंडांमध्ये कशी परस्पर गुंतवणूक केली याचा तपशील अभियोक्त्याने दिला आहे."
दरम्यान ज्या मीडिया आऊटलेटच्या हवाल्याने हिंडेनबर्गने आपला अहवाल जारी केला त्या स्विस मीडिया आउटलेट गोथम न्यूजने या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. आउटलेटने लिहिले,
“हिंडनबर्गने अदानी समूहाविरुद्ध आरोप लावण्यापूर्वीच जिनिव्हा सरकारी वकील कार्यालय स्वित्झर्लंडमधील मनी लाँड्रिंग आणि सिक्युरिटी फ्रॉड गुंतवणुकीच्या प्रकरणाची चौकशी करत होते. २ वर्षांच्या अथक चौकशीनंतर फेडरल क्रिमिनल कोर्टाच्या (FCC) निर्णयाने हे उघड झाले आहे. अब्जाधीश गौतम अदानी समूहाची ३१० दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त रक्कम ६ स्विस बँकांमध्ये जमा आहे. हे प्रकरण माध्यमांमध्ये उघड झाल्यानंतर स्वित्झर्लंडच्या ऍटर्नी जनरलच्या कार्यालयाने (ओएजी) तपास हाती घेतला आहे.
दरम्यान, हिंडेनबर्ग आणि स्विस मीडिया आऊटलेट्सच्या दाव्यानंतर अदानी समूहानेही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या अधिकृत प्रवक्त्याने म्हटले आहे,
“आम्ही हे निराधार आरोप पूर्णपणे फेटाळून लावतो. अदानी समूहाचा स्विस न्यायालयाच्या कोणत्याही खटल्याशी संबंध नाही किंवा आमच्या कंपनीचे कोणतेही खाते कोणत्याही प्राधिकरणाने जप्त केलेले नाही. "याशिवाय, या आदेशातही, स्विस न्यायालयाने आमच्या समूहातील कंपन्यांचा उल्लेख केलेला नाही किंवा आम्हाला अशा कोणत्याही प्राधिकरण किंवा नियामक संस्थेकडून स्पष्टीकरण किंवा माहितीसाठी कोणतीही अधिकृत विनंती प्राप्त झालेली नाही."
जानेवारी २०२३ मध्येही हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत मोठा दावा केला होता. त्यांनी आरोप केला होता की, अदानी समूह शेल कंपन्यांच्या माध्यमातून स्वत:च्याच कंपन्यांमध्ये स्वत:चे पैसे पुन्हा गुंतवून शेअरच्या किमती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. या आरोपामुळे अदानी समूहाच्या समभागांना १५० बिलियन डॉलर्सचे नुकसान झाले. सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी या प्रकरणाची चौकशी करत आहे.
१० ऑगस्ट रोजी हिंडेनबर्गने या प्रकरणात सेबीलाही ओढले . सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी स्वत: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळेच अदानी समूहाबाबतचा तपास मंद गतीने सुरू आहे. तपास त्वरीत झाला तर माधबी बुच स्वत:ही यात अडकू शकतात, असा दावा करण्यात आला होता.