आरजी कार रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी ज्युनियर डॉक्टर ३२ दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
कोलकाता : कोलकात्याच्या आरजी कार हॉस्पिटलमध्ये एका ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर निर्माण झालेला गोंधळ अजूनही थांबलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने कठोर आदेश देऊनही कनिष्ठ डॉक्टर अद्यापही कामावर रुजू झालेले नाहीत. प्रशासनाचे अथक प्रयत्न आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांच्या कडक सूचनांनंतरही महिनाभराहून अधिक काळ लोटला तरी कनिष्ठ डॉक्टर संप मिटवण्यास तयार दिसत नाहीत.
डॉक्टरांचा संप अजूनही सुरूच असल्याने रुग्णांचे सर्वाधिक हाल होत आहेत. रुग्ण उपचारासाठी घरोघरी भटकत आहेत. दररोज रुग्णालयाच्या फेऱ्या मारत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. उपचाराअभावी त्यांच्या समस्या वाढत आहेत.
आरजी कार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या काहींना श्वसनाचा तर काहींना हृदयरोगाचा आजार आहे. मात्र त्यांच्यावर उपचार होत नाहीत. डॉक्टरही नीट वागत नाहीत. रुग्णांनी काही विचारले तर ते शिव्या देतात. डॉक्टरांची अनेक तास वाट पाहून त्यांची प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांच्या आंदोलनाची कोणतीत्यांनाही अडचण नाही. त्यांनी आंदोलन करावे पण रुग्णांनाही त्यांची गरज आहे हे विसरू नये असे रुग्णाच्या परीजनांचे म्हणणे आहे.
कनिष्ठ डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये सध्या उपस्थित डॉक्टरांची संख्या सामान्यपेक्षा कमी आहे. याचा परिणाम रुग्णांवर होत आहे. पश्चिम बंगालमध्ये ३०० सरकारी रुग्णालये आणि २६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. येथे पूर्णवेळ काम करणाऱ्यांत तब्बल ९५,००० डॉक्टरांचा सहभाग आहे. या सर्व इस्पितळांत दररोज सुमारे ५ लाख रुग्ण उपचारासाठी येतात. पश्चिम बंगाल सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार कनिष्ठ डॉक्टरांच्या संपामुळे आतापर्यंत २३ लोकांचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे.
११ सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाने डॉक्टरांना ईमेलद्वारे नबन्नो येथील राज्य मुख्यालयात भेटायला बोलावले होते. मात्र कनिष्ठ डॉक्टरांनी भेटण्यास नकार दिला. डॉक्टरांनी पुन्हा मागणी मांडली आहे. या बैठकीला १०-१५ नव्हे तर ३० लोक जातील, बैठकीचे थेट प्रक्षेपण करावे लागेल आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बैठकीला उपस्थित राहावे लागेल, असे सांगण्यात आले आहे.