गोव्यात विषयांना तोटा नाही. सोशल मीडिया नामक माध्यमातून विचारांची देवाणघेवाण करताना गोमंतकीय आपले सडेतोड विचार मांडत असतो. अनेक संकेतस्थळे, यूट्यूब, फेसबुक, व्हाट्सएप आदींचा वापर करून मते मांडण्यात गोमंतकीय मागे नाही, हेच दाखवून देत असतो.
भ क्तगणांमध्ये सर्वाधिक प्रिय असलेली देवता म्हणून श्रीगणेशाकडे पाहिले जाते. गणपती आपल्या घरी वर्षातून एकदाच येत असला तरी त्याच्या आगमनाची प्रतीक्षा कायम केली जाते. जणू आपल्या घरचा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पाहुणाच येणार असल्याची भावना यामागे असल्याने श्रावण संपतो, न संपतो तोच गणपतीच्या स्वागताची तयारी करताना सर्वत्र मंगलमय वातावरण असते. घराची झाडलोट आणि स्वच्छता होतेच, शिवाय पवित्र आणि उत्साही अशा लहरी लहानथोरांमध्ये निर्माण झालेल्या आढळतात. श्रीगणेशाचे आगमन अतिशय अनुकूल आणि शुद्ध वातावरणात व्हावे, यासाठी प्रारंभापासून भक्तगण सतर्क राहतो. ठरलेल्या ठिकाणाहून मूर्ती आणताना, आपण निवडलेली, पसंत केलेली तीच मूर्ती आहे ना, यापासून ही देवता किती सुंदर आणि तेजस्वी दिसते याची चर्चा होत राहते. आदल्या दोन दिवसांत रात्री जागून केलेली सजावट, माटोळी आणि एकंदरीत आसनव्यवस्था देवतेला साजेशी आहे ना, याचाही विचार भक्तांच्या मनात सुरू असतो. अशा पार्श्वभूमीवर होणारी देवाची प्राणप्रतिष्ठा म्हणजे प्रत्यक्ष श्रीगणेशाचे आगमन मानले जाते. मूळ गावी परतलेले रहिवासी घरी आल्यावर घर कसे भरून जाते. गोवा आणि कोकणात तसेच उर्वरित महाराष्ट्र व अन्य काही राज्यांत श्रीगणेशाचा हा उत्सव मोठ्या थाटात साजरा होतो. देशी-परदेशी वास्तव्य असलेले भक्तगण नातेवाईकांनी केलेल्या तयारीची प्रशंसा करीत त्या वातावरणात रमून जातात.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गावात, घरी परतलेले भक्तगण परिचितांची विचारपूस करताना दिसतात. हा सण अनेकांना या निमित्ताने एकत्रित आणतो. अनेक महिने न भेटलेले आप्तेस्ट आणि गावचे लोक यांच्या गप्पा रंगतात, त्या या सणाचे वैशिष्ट्य मानता येतील. दुसरा दिवस हा जणू भेटीगाठींसाठीच राखून ठेवल्याप्रमाणे चर्चांचे फड आपोआप आयोजित केले जातात. आपले अनुभव, वास्तव्य करीत असलेल्या गावांची, शहरांतील घटना सांगण्यात जणू स्पर्धाच लागून राहते. नेमेची येतो मग पावसाळा... या उक्तीप्रमाणे चर्चा आणि गप्पाटप्पा हा वार्षिक उपक्रम ठरतो. यंदाही अशाच विषयांवर चर्चा होतील. गोव्यात विषयांना तोटा नाही. त्यातही आपण गोमंतकीय सुशेगाद म्हणून हिणवले जात असलो तरी अलीकडे जोरदार मतप्रदर्शन करत असतो. सोशल मीडिया नामक माध्यमातून विचारांची देवाणघेवाण करताना आपले सडेतोड विचार मांडत असतो. अनेक संकेतस्थळे, यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सएप आदींचा वापर करून मते मांडण्यात गोमंतकीय मागे नाही, हेच दाखवून देत असतो. उत्सवानिमित्त एकत्र आल्यावर अशा विषयांना प्रत्यक्ष चर्चांचे स्वरूप येत असते. जगातील कोणताही विषय अशा चर्चांना वर्ज्य असत नाही, मग देशातील राजकारण ते गोव्यातील घडामोडी यावर खमंग चर्चा झडते. बेरोजगारी, भूरूपांतरे असे विषय जिव्हाळ्याचे ठरतात. सोयीस्करपणे केली जाणारी भूरूपांतरे, त्यासाठी वाकवला जात असलेला कायदा हा तर सर्वांचा आवडता विषय ठरतो. एखादे नवे बांधकाम करण्यासाठी कोटी-कोटी खर्च झालेले जनतेला चालतात, पण दुरुस्तीवर साठ-सत्तर कोटी वाया जावेत, हे मात्र सोसायला सुशेगाद गोंयकार तयार नसतो. कोण कसे काम करतो यापासून प्रशासनात कसा कारभार चालतो, याची घरबसल्या माहिती भक्तगणांना मिळते. राजकीय डावपेच कसे खेळले जातात, कोण कोणावर मात करणार आहे याचे आडाखे येथेच बांधले जातात. राजकीय तज्ज्ञ नसलेली एखादी व्यक्ती राजकारणाचे विश्लेषण करताना दिसते.
गोव्यातील वाढत्या इमारतींच्या बांधकामांमुळे निसर्ग कसा नष्ट होणार आहे, याबद्दलची कळकळ राजकारणी व्यक्त करतात, मात्र सकस जमिनीपासून ते डोंगरापर्यंत ते कशी धडक देत आहेत, याचे खुमासदार वर्णन अशाच बैठकीत ऐकविले जाते. हजारो कोटींची कंत्राटे दर्जाहीन ठरतात हे सांगण्यासाठी रखडत काम चाललेल्या राजधानी स्मार्ट सिटीचे उदाहरण दिले जाते. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम हे खेळाचे केंद्र न बनता, कधी तरी होणारे व्यापारी उपक्रम आणि राजकीय सभांसाठी कसे वापरले जाते. तेही ठासून एखादा पणजीकर सांगतो. गोव्यातील अनेक योजना आणि घोषणा यामुळे हे राज्य विकसित आणि स्वयंपूर्ण होईल, अशी अपेक्षा करण्यापेक्षा, हे राज्य पूर्ववत हरितच राहू दे, गोवा गोवाच राहावा, अशी मागणी त्या बुद्धिदात्याजवळ करण्याची संधी गोमंतकीय कशी सोडतील?