पहिला दिवस मुशीर खान-अक्षर पटेलच्या नावावर

दुलीप ट्रॉफी : तिन्ही कर्णधार अपयशी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
05th September, 11:53 pm
पहिला दिवस मुशीर खान-अक्षर पटेलच्या नावावर

मुंबई : दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेला गुरुवार, ५ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला. या स्पर्धेतील पहिल्या दिवशी स्टार फलंदाज अपयशी ठरले. दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूने पदार्पणात शानदार शतक ठोकत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.
तर टी २० वर्ल्ड कप २०२४ विजयी संघातील ऑलराउंडरने टीमसाठी संकटमोचकाची भूमिका बजावत अर्धशतक झळकावले. टीम इंडियाचा फलंदाज सरफराज खान याचा भाऊ मुशीर खान याने पहिल्याच दिवशी शतक झळकावले. तर अक्षर पटेल याने ८६ धावांची खेळी करत टीमची लाज राखली. यासह या दोघांनी बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी दावा मजबूत केला आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेनंतर टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेत स्थान मिळवण्यासाठी दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरी निर्णायक ठरणार आहे. निवड समितीचे या स्पर्धेकडेही बारीक लक्ष आहे. त्यामुळे या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून कसोटी मालिकेसाठीच्या संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूचा आहे. मात्र पहिल्याच दिवशी मुशीर खान आणि अक्षर पटेल या दोघांनी आपली दावेदारी मजबूत केली आहे.
या स्पर्धेत एकूण ४ संघ सहभागी आहेत. पहिल्याच दिवशी चारही संघ आमनेसामने होते. पहिल्या सामन्यात इंडिया ए विरुद्ध इंडिया बी आमनेसामने होते. तर दुसऱ्या सामन्यात इंडिया सी विरुद्ध इंडिया डी खेळत आहेत. पहिल्या सामन्यात इंडिया बी कडून यशस्वी जयस्वाल याने ३० तर सरफराज खानने ९ धावा केल्या. रेड बॉल क्रिकेटमध्ये २० महिन्यांनी कमबॅक करणाऱ्या ऋषभ पंतला ७ धावाच करता आल्या. मात्र त्यानंतर मुशीरने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. मुशीर खान तिसर्‍या स्थानी बॅटिंगसाठी आला आणि दिवसाचा खेळ संपल्यानंतर नाबाद परतला. मुशीरने २२७ चेंडूत १०५ धावा केल्या. मुशीरच्या या खेळीत १० चौकार आणि २ षटकार खेचले. टीमने पहिल्या दिवशी ७ विकेट्स गमावून २०२ धावा केल्या.
दुसऱ्या सामन्यात इंडिया सी ने इंडिया डी चा पहिला डाव १६४ धावांवर गुंडाळला. कॅप्टन श्रेयस अय्यर ९ आणि एस भरत याने १३ धावा केल्या. देवदत्त पडीक्कल याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर ऑलराउंडर अक्षर पटेल याने संकटमोचकाची भूमिका बजावली. अक्षरने ११८ चेंडूमध्ये ८६ धावा केल्या. अक्षरच्या या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. अक्षर पटेल आऊट होताच इंडिया डीचा डाव आटोपला. इंडिया डी ने १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंडियाने सीकडून कॅप्टन ऋतुराज गायकवाड ५ आणि साई सुदर्शन याने ७ धावा केल्या. तर खेळ संपेपर्यंत इंडिया सीने ४ विकेट्स गमावून ९१ धावा केल्या. त्यामुळे इंडिया सी आणखी ७३ धावांनी पिछाडीवर आहे.बॉक्स
कर्णधारांची निराशाजनक कामगिरी
शुबमन गिल आणि अभिमन्यू इश्वरन हे दोघे अनुक्रमे इंडिया ए आणि इंडिया बी चे कर्णधार आहेत. पुणेकर ऋतुराज गायकवाड इंडिया सी संघाचा कॅप्टन आहे. तर मुंबईकर श्रेयस अय्यर याच्याकडे इंडिया डी ची धुरा आहे. शुबमन गिल याची बॅटिंगची वेळ आली नाही. मात्र ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि अभिमन्यू इश्वरन हे तिघेही अपयशी ठरले. अभिमन्यू इश्वरन याने ४२ चेंडूमध्ये १ चौकारासह १३ धावा केल्या. श्रेयस अय्यरला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. श्रेयस १६ चेंडूमध्ये ९ धावा करून बाद झाला. तर ऋतुराज गायकवाडने १९ चेंडूत ५ धावा केल्या.