दक्षिण कोरियला ३-१ ने चारली पराभवाची धूळ : उपांत्य फेरीतील स्थान पक्के
मोकी : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. भारताने दक्षिण कोरियाचा ३-१ असा पराभव करत स्पर्धेत सलग चौथा विजय नोंदवला.भारताने सामन्याच्या ८ व्या मिनिटाला अरिजित सिंग हुंदलच्या गोलने आपले खाते उघडले आणि त्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला हरमनप्रीत सिंगच्या पेनल्टी कॉर्नरने आघाडी दुप्पट केली. यानंतर ३० व्या मिनिटाला कोरियाने पलटवार केला. कोरयाकडून यांगने गोल केला. पहिल्या हाफपर्यंत भारत २-१ ने आघाडीवर होता. उत्तरार्धात हरमनप्रीतने आणखी एक गोल केला आणि भारताची आघाडी ३-१ अशी केली. ही आघाडी सामना संपेपर्यंत कायम राहिली आणि भारताने सलग चौथा विजय मिळवला.
भारताकडून अरिजित सिंग हुंदलने एक (८’) तर कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल(९’, ४३’) केले. हरमनप्रीतचे दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवरून झाले तर अरिजितने मैदानी गोल केला.
आता भारतीय हॉकी संघ १४ सप्टेंबरला शेवटच्या राऊंड रॉबिन सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तानशी भिडणार आहे. दरम्यान, भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान आधीचे निश्चित केले आहे. याआधी टीम इंडियाने आपल्या पहिल्या सामन्यात यजमान चीनचा ३-० असा तर दुसऱ्या सामन्यात जपानचा ५-१ असा पराभव केला होता. तर तिसऱ्या सामन्यात भारताने मलेशियाचा ८-१ ने धुव्वा उडवत विजयाची नोंद केली होती.
पाकिस्तानचा चीनवर विजय
दुसऱ्या सामन्यात यजमान चीनविरुद्ध ५-१ असा विजय मिळवून पाकिस्तान गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. साखळी फेरीत आणखी एक दिवसाचा खेळ शिल्लक असताना पाकिस्तान उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम आहे.रहमान अब्दुल (२३’), अहमद नदीम (३६’, ५६’) आणि हन्नान शाहिद (४६’, ६०’) यांनी पाकिस्तानच्या विजयात गोल केले, तर चीनसाठी एकमेव गोल जिशेंग गाओ (४८’) याने केला.प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या चौथ्या दिवसाच्या अखेरीस, भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे, तर पाकिस्तान दुसऱ्या, कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे. आजच्या विजयानंतर चीनला मागे टाकण्यात मलेशियाला यश आले आहे. सुरुवातीला अब्दुलने २३व्या मिनिटाला मैदानी गोल करून पाकिस्तानला १-० अशी आघाडी मिळवून दिली.३६व्या मिनिटाला नदीमने गोल केल्यानंतर त्यांनी आघाडी २-० अशी वाढवली. या क्वार्टरमध्ये त्यांना पेनल्टी स्ट्रोक मिळाल्यावर त्यांची आघाडी आणखी वाढवता आली असती, परंतु चीनचा गोलरक्षक वेहाओ वांगने शानदार बचाव केल्याने स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या घरच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.मात्र, ४६ व्या मिनिटाला पीसीवर विजय मिळवत पाकिस्तानला तिसरा गोल करण्यात यश आले. पाकिस्तानने त्यांची आघाडी ३-० अशी वाढवली आणि वांगला रोखण्याची संधी नव्हती. दोन मिनिटांनंतर, चीनने ४८ व्या मिनिटाला पीसीद्वारे गोल करून चाहत्यांना आनंद दिला. परंतु पाकिस्तानने ५६ व्या आणि ६० व्या मिनिटाला नदीम आणि हन्नानच्या माध्यमातून दोन गोल केले आणि सामना ५-१ असा जिंकला.
मलेशियाची जपानवर मात
याआधीच्या सामन्यात गुरुवारी मलेशियाने जपानविरुद्ध ५-४ असा विजय मिळवला. सय्यद चोलन (१२’, ४०’), नॉर्स्याफिक सुमंत्री (२१’), सियारामन मॅट (४७’) आणि कमाल अबू अझराई (४८’) यांच्या गोलच्या जोरावर मलेशियाने विजय मिळवला आणि गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले . बुधवारी त्यांच्या मागील सामन्यात भारताकडून १-८ ने पराभूत झाल्यानंतर गुणतालिकेत तळाशी असलेल्या मलेशियाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कोणत्याही किंमतीवर विजय मिळवणे आवश्यक होते आणि त्यांनी जपानविरूध्द सामना जिंकत आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत.