मडगावच्या जोडीने रचला गिर्यारोहणात इतिहास

लडाखमधील माऊंट कांग यात्से १, २ सर करणारे गौतम, राहुल बनले पहिले गोमंतकीय

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd September, 09:54 pm
मडगावच्या जोडीने रचला गिर्यारोहणात इतिहास

पणजी : गौतम वेर्लेकर आणि राहुल प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखाली लडाखमधील माऊंट कांग यात्से १ आणि २ वर गोव्याची पहिली दुहेरी शिखर मोहीम नुकतीच यशस्वी झाली. २३ व २७ ऑगस्ट रोजी १०० तासांत (पाच दिवस) ६२०० मीटरपेक्षा अधिक उंचीची दोन शिखरे सर करणारे प्रभुदेसाई हे  गोव्याचे पहिले नागरिक ठरले.

गोवा अल्पाइन क्लबने आवश्यक असलेला पाठिंबा दिला आणि ‘बूट्स अँड क्रॅम्पन्स’च्या सदस्यांसह मोहिमेला प्रोत्साहन दिले ज्यांनी नायमलिंग येथे ५,१०० मीटरवर तळ उभारला.

लेह ते नायमलिंग असा पाच दिवसांचा ट्रेक केल्यानंतर पथकाने उपकरणांच्या तपासणीसाठी दोन दिवस विश्रांती घेतली. त्यानंतर या पथकाने २२ ऑगस्टच्या रात्री कांग यात्से २ चे शिखर गाठण्यासाठी प्रयत्न केले आणि २३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ४३ मिनिटांनी नऊ तासांच्या खडतर अर्धतांत्रिक चढाईनंतर व यानंतर तीन तासांच्या खडतर उतरणीनंतर शिखर गाठले.


तब्बल ४८ तासांनंतर परत सज्ज होताच पथकाने २५ ऑगस्ट रोजी ५७०० पेक्षा अधिक मीटर उंचीच्या कठड्यावर कॅम्प उभारला आणि वार्याच्या थंडीत रात्र काढली. २६ ऑगस्ट रोजी वेर्लेकर यांना हाय अल्टिट्यूड पल्मोनरी लक्षणे (एचएपीई) झाली आणि त्यांनी सुरक्षित स्थळी परतण्याचा निर्णय घेतला, तर प्रभुदेसाई यांनी सपोर्ट स्टाफ आणि टीमच्या इतर सदस्यांसह प्रवास सुरू ठेवला.

२६ ऑगस्ट रोजी सायंकाळी काही तासांच्या विश्रांतीनंतर पथकाने कांग यात्से १ वर पुन्हा चढाई सुरू केली. २७ तारखेला सकाळी ९.०१ वाजता प्रभुदेसाई आणि त्यांच्या पथकाने शिखर गाठले.

गोव्यातील गिर्यारोहकांसाठी हे वर्ष एक पथदर्शक ठरले असून पंकज नार्वेकर हे माऊंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले गोव्याचे ठरले, त्यानंतर करिश्मा वेर्लेकर यांनी माऊंट मेरासाठी एकट्याने मार्गदर्शित चढाई केली होती.