पॅरिसमध्ये नितेश कुमारचा ‘सुवर्ण स्मॅश’

पॅरालिम्पिकमध्ये भारताला दुसरे सुवर्ण : अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या बेथेलचा पराभव

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
02nd September, 09:45 pm
पॅरिसमध्ये नितेश कुमारचा ‘सुवर्ण स्मॅश’

पॅरिस : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताला दुसरे सुवर्णपदक मिळाले आहे. हे पदक पॅरा-बॅडमिंटनपटू नितेश कुमारने पुरुष एकेरी बॅडमिंटन एसएल-३ मध्ये जिंकले. यासह आता या पॅरालिम्पिकमध्ये भारताची एकूण ९ पदके झाली आहेत. 

पॅरा-बॅडमिंटन पुरुष एकेरी एसएल-३ स्पर्धेच्या अंतिम फेरीत नितेश कुमारचा सामना ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलशी झाला. दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा झाली आणि शेवटी नितेशकुमार विजयी झाला.


चुरशीच्या लढतीत नितेशचा विजय

नितेश कुमार आणि ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेल यांच्यात सुवर्णपदकाच्या लढतीत चुरशीची स्पर्धा झाली. सामन्याचा पहिला सेट नितेश कुमारच्या नावावर होता. त्याने हा सेट २१-१४ असा जिंकला. त्याचवेळी दुसऱ्या सेटमध्ये दमदार कामगिरी करूनही त्याला १८-२१ ने पराभवाचा सामना करावा लागला. एकावेळी हा सेट १६-१६ असा बरोबरीत होता, पण इथे नितेश कुमार मागे पडले.

यानंतर त्याने तिसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन करत सामना २३-२१ असा जिंकला. मात्र हा सेट जिंकण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली. दोन्ही खेळाडू प्रत्येकी एका गुणासाठी शेवटपर्यंत लढत होते. काही प्रसंगी, ग्रेट ब्रिटनचा डॅनियल बेथेल पुढे आला, परंतु नितेशने संयम राखला आणि सुवर्णपदक जिंकले. नितेशचे पॅरालिम्पिकमधील हे पहिले पदक आहे.