इंफाळ : धार्मिक व जातीय तेढ, मूलभूत हक्कांची गळचेपी आणि इतर अनेकविध कारणांमुळे १९६० पासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये आता पुन्हा हिंसाचारची ठिणगी पडली आहे. यावेळी कुकी अतिरेक्यांनी गावात ड्रोनने हल्ला केला आहे. अतिरेक्यांनी डोंगरमाथ्यावरुन खालच्या भागात कोत्रुक आणि कडंगबंद खोऱ्याला लक्ष्य करत सर्वप्रथम अंदाधुंद गोळीबार केला आणि नंतर ड्रोनच्या माध्यमातून बॉम्ब फेकले. अचानक झालेल्या हल्ल्याने गावात घबराट पसरली आणि लोक आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित जागा शोधू लागले. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांसह नऊ जण जखमी झाले.
दरम्यान कोत्रुक गावच्या पंचायत अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास सशस्त्र अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला होता. अतिरेक्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारामुळे अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. गोळीबार आणि बॉम्बस्फोट सुरू झाले तेव्हा गावकरी आपापल्या घरात होते. स्थानिक रहिवासी लीशांगथम रोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील स्वयंसेवकांना या भागातून परत बोलावल्यानंतर अवघ्या १० दिवसांनी हा हल्ला झाला. राज्य सुरक्षा दलाच्या सल्ल्यानुसार येथून स्वयंसेवकांना परत पाठवण्यात आले होते. एका महिलेचा गोळ्यांमुळे मृत्यू झाला आणि तिची मुलगीही जखमी झाली.
इंफाळ पश्चिम जिल्ह्यात कर्फ्यू
मणिपूर गृह विभागाने कुकी अतिरेक्यांच्या या कृत्याचा निषेध केला, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने इंफाळ पश्चिम जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. राज्य सरकारने शांतता प्रस्थापित करण्याबाबत अनेक आश्वासने देऊनही आम्ही सुरक्षित नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. स्थानिक महिला देखरेख गटाच्या सदस्या निंगथौजम तोमाले यांनीही सरकारच्या नियोजनावर ताशेरे ओढत त्यांना जाणवत असलेल्या समस्यांचा पाढा वाचला.
मणिपूरमध्ये ३ मे २०२३ रोजी पहिल्यांदा हिंसाचार झाला. आरक्षणाच्या अनुषंगाने कुकी आणि मेतेई समाजामध्ये वाद सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत २६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ६५ हजारांहून अधिक लोकांनी आपली घरे सोडली आहेत. मणिपूरमधील मेईतेई लोकसंख्या सुमारे ५३ टक्के आहे, ती प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात राहते. तर नागा आणि कुकीसह आदिवासी समुदाय सुमारे ४० टक्के आहेत आणि ते प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.