राष्ट्रीय पोषक आहार दिन

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
01st September, 12:00 am
राष्ट्रीय पोषक आहार दिन

आज राष्ट्रीय पोषक आहार दिन आहे. आपल्या शरीराची योग्य वाढ होण्यासाठी, उंची वाढण्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी, शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी, शरीराला ताकद मिळण्यासाठी, हाडं मजबूत होण्यासाठी सकस अन्नाची आवश्यकता असते. अश्या आहाराला पोषक आहार असं म्हटलं जातं. 

आपल्या प्रत्येकाच्या घरी असा पोषक आहार आपली आई-आजी बनवत असतात. पण आपल्यापैकी काही जणांना फक्त दूध भात, दही भात, किंवा फक्त मासे असं खायला आवडतं. काहींना केवळ गोड तर काहींना केवळ तिखट पदार्थ रोज पाहिजे असतात. पण शरीराला पोषण मिळण्यासाठी सहा चवींचे पदार्थ जेवणात असावे म्हणजेच गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट. 

आता तुम्ही म्हणाल आम्हाला कडू - तुरट आजिबात आवडत नाही. कडू - तुरट चवी आवडत नसल्या तरी त्यांचे शरीराला अनेक फायदे आहेत आणि कडू-तुरट खूप नाही खायचं फक्त  थोड्या प्रमाणात असे पदार्थ घ्यावे. उदा. कारल्याचे पदार्थ, चटणी, मेथीची भाजी इ. 

आवळा हा ५ चवींनी युक्त आहे त्यामुळे रोज आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ आपण खाऊ शकतो. 

साधे सहज उपलब्ध होतील, घरी बनवता येतील असे पुढील पदार्थ तुम्ही नित्य आहारात सेवन करू शकता. 

सकाळी भूक लागेल तेव्हा चपाती - भाजी, उपमा, पोहे, घावन, भाकरी, थालीपीठ असे पदार्थ खावे 

दुपारी - भाताचे वेगवेगळे प्रकार, वरण, आमटी, वेगवेगळ्या भाज्या, कापं, कोशिंबीर, लोणचं, सोलकढी.

संध्याकाळी भूक लागली तर एखादं फळ, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, चुरमुऱ्यांचा/ लाह्यांचा/ मखान्याचा चिवडा, घरी बनवलेली भेळ असे पदार्थ खावे.

रात्री ७:३० पर्यंत जेवावे. पेज, भाकरी, भाजी किंवा चटणी, मूगडाळ तांदळाची खिचडी असे पदार्थ थोड्याच प्रमाणात खावे. 

पदार्थ पोषक तर असावेत पण ते भूक लागेल तेव्हाच आणि योग्य वेळी खाणे याला खूप महत्त्व आहे. काहीवेळा खेळता खेळता काहींना भूक लागलेली समजतंच नाही आणि त्यामुळे आईने हाक मारली तरी जेवायला जात नाहीत आणि मग शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही. 

बऱ्याचदा स्ट्रीट फूड पाणीपुरी, शेवपुरी, मिरची पाव, रस ओमलेट, सॉफ्ट ड्रिंक्स, पिझ्झा, बर्गर, चिकन, पनीर असे पदार्थ, गोबी मंचुरियन असे अनहेल्दी पदार्थ खाण्याचा हट्ट परत परत केलात तर असे पदार्थ खाऊन पोषण तर होणार नाहीच शिवाय आजारी पडून आरोग्याचं नुकसान होणार. 

त्यामुळे आजपासून आपल्या शरीराचं नीट पोषण व्हावं म्हणून पोषक आहार त्याचबरोबर योग्य वेळी आहार सेवन व जेवताना टिव्ही, मोबाईल बंद, एका जागी बसून अन्नावर लक्ष केंद्रित करून सावकाश, वेगवेगळ्या पदार्थांची चव घेत जेवायचा संकल्प करूया.