परोपकारी चिमी

Story: छान छान गोष्ट |
01st September, 04:57 am
परोपकारी चिमी

बेलवडे आज्जी दुपारच्या वेळी गॅलरीत फेऱ्या मारत होत्या. फेऱ्या नुसतं निमित्त पण त्या कोण येतंय जातंय का बघत होत्या. घरातला वायफाय कसा तो सकाळपासून बंद होऊन इंटरनेट चालू होत नव्हते आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या अमेरिकेतल्या मुलाशी व्हिडिओ कॉलवर बोलता येणार नव्हते म्हणून त्या बेजारल्या होत्या. आता त्यांना काही त्यातलं कळेना. घरात नीट रेंज नाही म्हणून वायफाय घेतलेला. आणि आता तोच बंद म्हटल्यानंतर त्यांना अगदी कासावीस झाले होते. रोज संध्याकाळी चार ते पाच दरम्यान त्यांचा लाडका मुलगा अबीर त्यांना व्हिडिओ कॉल करायचा. इकडचे संध्याकाळचे चार-पाच म्हणजे तिकडे अमेरिकेत त्यांचे सकाळचे सात-आठ. त्यामुळे ऑफिसला जायच्या आधी त्याच्या आईशी तो भरपूर बोलून घेत असे. नाहीतरी त्याचे बाबा गेल्यापासून इकडे भारतात आईसोबत घरात कुणीच नसायचे. सकाळ-संध्याकाळ चार-पाच पोळ्या बनवून द्यायला येणारी नारायणी आणि अधूनमधून कधीतरी अज्जींची ख्यालीखुशाली विचारायला येणारा साहिल दादा. साहिल दादा म्हणजे आज्जींच्या बहिणीचा मुलगा. 

तर आज्जी अश्या येरझारा घालत असताना चिमी त्यांच्या नजरेस पडली. चिमी आपल्या डान्स क्लासला जायला म्हणून निघालीच होती इतक्यात आजीने “चिमे...” म्हणून हाक मारून तिला बोलावून घेतलं. चिमीला आज्जी खूप आवडायच्या. कारण त्या हसल्या की कुक्कूक करून छान आवाज यायचा आणि त्यांच्या दोन्ही गालांवर छान खळ्याही पडायच्या. चिमीला हाक मारताच चिमी धावत धावत आजीच्या गॅलरीखाली उभी राहिली आणि तिने आज्जीला खुणेनेच काय? म्हणून विचारलं. “अगो वायफाय काय तो चालेना कि गो. तुझ्या मंजूताईला जरा बोलावतेस का? दुपारपासून इथे फेऱ्या मारतेय, याला त्याला थांबवून हेच सांगतेय पण कोणीच थांबे ना की गो.” आजीने सांगितलं तशी चिमी डोक्यावर हात मारत म्हणाली, “अलेsss देवा! मंजू ताई आली कुठे कॉलेजवरून... अजून आलीच नाही ती.” आजीने पण इकडे डोक्यावर हात मारून घेतला आणि त्यांनी तोंड एवढुस्सं केलं. आता काय करावं म्हणून त्या अजूनच चिंतीत झाल्या. चिमीसुद्धा तोंड पाडून विचार करू लागली. “आज्जी आयडीया!!! दादाचा फोनच ना लावायचाय, मी देते ना लावून.” असं म्हणून चिमीने आज्जीला चल माझ्यासोबत म्हणत तयार व्हायला सांगितलं. 

आजीचं आणि काय ते आवरायचं? चावी घेऊन, हातात रुमाल घेऊन आज्जी दारापाशी आली तोवर चिमी वर त्यांच्या दारापर्यंत जिने चढून पोहोचली. “चल आज्जी आमच्याकडे जाऊयात. ताईच्या लॅपटॉपवरून तुला फोन लावून देते. तुला शिकवलाय ना दादाने कसा लावायचा व्हिडिओ कॉल तो? नाहीतर आई लावून देईल चल.” आज्जी जरा बावरलीच. “अगं नको गं चिमे... तुझी ताई तुला ओरडेल हा. मोठ्यांच्या महागड्या वस्तूंना हात लावू नये आपण. आई पण निवांत वेळी आराम करत असेल नं आता? नको हो बाळ, तू जा हो...” आजी म्हणाली. “अगं नाही गं आज्जी. मम्मी काही झोपली-बिपली नाहीये अशीच आहे हॉलमध्ये उश्यांचे अभ्रे बदलतेय. आणि मम्मी करेल की मदत तुला. मी थोडीच हात लावणारे ताईच्या लॅपटॉपला. चल बघू तू अशी!” असं म्हणून चिमी ओढत ओढतच तिला वरच्या मजल्यावर घेऊन जाऊ लागली. “अगं थांब गं बयो... चावी तरी करू दे एवढी घराला.” आज्जीने घराला चावी केली आणि चिमी त्यांचा हात धरून निघाली सुद्धा जिना चढायला. 

घरी जाताच आईने दार उघडलं आणि चिमीला अज्जीसोबत पाहून जरा घाबरली. “काय हो आज्जी काय झालं? बरं आहे ना तुम्हाला? चिमीने काही खोड्या केल्या की काय?” आईने प्रश्नांच्या फैरी झाडल्या. आज्जी मात्र शांतपणे म्हटली, “अगो शैलू असं काहीच नाही गं, का बिचाऱ्या चिमीला नाव लावतेस? आणि मी पण ठणठणीत आहे हो! अगो अब्याचा व्हिडिओ कॉल येतो नव्हे का संध्याकाळच्या वेळी, आणि आमच्या घरातला वायफाय गेलाय कसा तो! चिमी म्हणाली आमच्याकडे ये व्हिडिओ कॉल करून देते. म्हणून आले हो!” 

 आई हसत म्हणाली, “असं होय! या या काकू, आत बसा. आधी तुम्हाला गरमागरम कॉफी आणते. मग काय तो व्हिडिओ कॉल करून देते. हे बघा तुमच्या आवडीची गाणी लावते.” असं म्हणून आईने आजींना टीव्हीवर युट्युबवर गीतरामायण लावून दिलं. आणि काही वेळात कॉफी घेऊन पण आली. आजीने गरमागरम कॉफी घेतली, सोबत चिवडा होता तोही खाल्ला. आता आजींना थोडं बरं वाटलं. मघापासून गॅलरीत येरझारा घालून त्याही दमल्या होत्या. मग आईने ताईचा लॅपटॉप आणून दिला. आजीकडून दादाचा नंबर घेऊन त्याला व्हिडिओ कॉल केला. आज्जीच्या डोळ्यात पाणी आलं आणि चेहऱ्यावर आनंदाचं हसू पसरलं. “ताईच्या खोलीत निवांत बसून तुम्ही बोलत बसा” असं म्हणून आई  बाहेर आली. 

चिमी गीतरामायणातली गाणी ऐकत तिथेच बसून होती. “आई किती छान ना गं गाणी!” चिमी आईला म्हणाली. “अगं हो गं. बघ किती बरं वाटतं ना ऐकल्यावर? हे गीत रामायण आधी रेडिओवर यायचं. माझी आई सांगायची. ग. दि. माडगूळकर यांनी ते लिहिलं आणि श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलं तसंच गायलं सुद्धा. बरं चिमे, तुला एक गोष्ट सांगू? आज ना मला तू केलेलं काम खूप आवडलं. बेलवडे आजींना केलेली मदत खूप महत्त्वाची होती. बेलवडे आजी आपल्या घरात एकट्याच राहतात ना, मग त्यांच्याकडे लक्ष द्यायची जबाबदारी आपण त्यांचे शेजारी म्हणून आपली आहे. हे तुला मनापासून वाटलं म्हणून तू त्यांना मदत केलीस. अशीच विचारी बन बाळा. तुला इतरांबद्दल कळवळा वाटतो, तू इतरांचा विचार करतेस हे पाहून मला खूप बरं वाटलं. गुणाची आहे ती माझी बाय!” असं म्हणून आईने चिमीला जवळ घेतलं आणि तिचे खूप खूप पापे घेतले.


स्नेहा सुतार