पियुषची विशेष काळजी घेणारी आई... सुचिता योगेश पै

विशेष मुलं ही स्वत:ची ओळख निर्माण करू शकत नाहीत, त्यामुळे विशेष मुलांच्या पालकांची जबाबदारी आहे की अशा मुलांचं अस्तित्व त्यांच्याच पालकांनी निर्माण करावं हे सुचिता यांना पूर्णपणे माहीत आहे.

Story: तू चाल पुढं |
24th August, 03:26 am
पियुषची विशेष काळजी घेणारी आई... सुचिता योगेश पै

मडगावच्या सुचिता पै या पेशाने वकील. २००३ साली त्यांनी वकिलीला सुरुवात केली. परंतु जेव्हा त्यांना समजले की आपण आई होणार आहोत, तेव्हा त्यांनी आपल्या बाळाच्या जन्माआधी काही महिने गॅप घेण्याचे ठरवले. यथावकाश एका गोड बाळाने त्यांच्या पोटी जन्म घेतला. त्याचे नाव पियुष. पियुषच्या जन्मानंतर त्याचे लाड आणि पालन-पोषण करण्यात त्यांचे दिवस कसे गेले ते त्यांना समजलेच नाही. परंतु पियुषच्या जन्मानंतर जेव्हा आठ नऊ महिन्यांनी तो रांगत का नाही? उजवा हात जास्त वापरत का नाही? हे लक्षात आल्यावर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्याबाबत चिकित्सा केली.  एमआरआयचा रिपोर्ट जेव्हा आला, तेव्हा त्यांना पियुषला सेरेबल पाल्सी सहित डिस्टोनिया आहे हे समजले. सुचिता यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठीही हा फार मोठा धक्का होता. पण या कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हते. त्यांना त्यांची जाऊ, बहिणी, भाऊजी, मित्र, शेजारी सर्वांनी त्यांना मानसिक आधार दिला. त्या नंतर त्यांनी डॉ. नंदिता डिसोझा यांच्याकडे सल्लामसलत केली, तेव्हा डॉ. नंदिता यांनी त्यांना छानपैकी समजावले. अशा विशेष मुलांच्या पालकांनी कसं खंबीर राहायचं याची जाणीव करून देताना त्यांना वेळोवेळी उपयोगी सल्ले दिले. त्यानंतर त्यांनी त्यासाठी पूर्ण ट्रिटमेंट म्हणजे फिजिओथेरेपी, स्पीचथेरेपी यावर भर दिला. हे सर्व करताना सुचिता या मनाने अतिशय खंबीर राहिल्या. 

प्रत्येक विशेष मुलांच्या आई वडिलांना हा मोठा यक्षप्रश्न नेहमी समोर उभा राहिलेला असतो की, आपण जो पर्यन्त आहोत, तोपर्यन्त ठीक आहे आपण आपल्या या विशेष मुलाची विशेष काळजी घेऊ, पण आपल्या मागे आपल्या मुलाचे काय? अजून गोव्यात रेसिडेंशियल स्कूल फॉर सेरेबल पाल्सी नाही आणि गोव्याबाहेर आहेत, पण त्यांची भरमसाठ फी आहे. विशेष मुलांना सांभाळताना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. त्यांना सांभाळण्यासाठी एक माणूस सदैव त्यासाठी तत्पर राहावा लागतो. विशेष मुलांवर जे उपचार करायचे असतात त्याचा खर्चही फार मोठा असतो. अशा मुलांना बाहेर ने-आण करण्यासाठी व्हिलचेयर सगळीकडे नेऊ शकत नाही.

सेरेबल पाल्सी आणि डिस्टोनिया याचा सुचिता यांनी खूप अभ्यास केल्यावर त्यांना समजलं, की या आजाराला औषध नाही आणि फिजिओथेरेपी, स्पीचथेरेपीमुळे फक्त सुधार होऊ शकतात पण मूल पूर्णत: बरे होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्यानंतर ठरवले की, पियुषवर उपचार करतानाच त्याच्या पालकत्वाचा मिळेल तितका गोड अनुभव घ्यायचा. मग जेव्हा जेव्हा ते पियुषला फिजिओथेरेपीसाठी पणजी येथे घेऊन जायचे तेव्हा तिकडून मग हॉटेल, बोटींग, देवळांचे दर्शन यासाठी जिथे जिथे जायचे, तिथे पियुषलाही सोबत न्यायचे. पियुषला या जगाची ओळख व्हावी, येथील माहिती थोड्या प्रमाणात का होईना त्याला समजावी, हा त्यांचा प्रयत्न होता.  

आपला पियुष हे विशेष बाळ आहे हे समजल्यावर सुचिता यांनी ही विशेष आई होऊन त्याचे सर्व संगोपन करत आहेत. पेशाने वकील असलेल्या सुचिता यांनी पियुषच्या जन्माआधी आपल्या वकिलीच्या व्यवसायात काही वेळ गॅप घेतला होता. पण पियुषच्या जन्मानंतर सत्य परिस्थितीला सामोरे जाताना त्यांनी आपले सर्व लक्ष पियुषवरच केंद्रीत करण्याचे ठरवले. पियुषला मोठ्या आवाजाची भीती आहे. तो खूपच दचकतो आणि त्याचा परिणाम त्याच्या झोपेवर होतो त्यामुळे त्याची खूप काळजी घ्यावी लागते. पियुषच्या सर्व हालचालींवर डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागते. तसेच त्याचे खाणे पिणे, त्याचे संगोपन यावरही जागरुकतेने लक्ष द्यावे लागते आणि हे सर्व सुचिता या विशेष आई होऊन त्याचे संगोपन करत आहेत. 

पियुष आता १४ वर्षांचा झाला आहे. त्याला आता खुपशा गोष्टी समजायला लागल्या आहेत. पियुषला सांभाळताना सुचिता यांनी आपल्या वकिलीच्या करियरला सोडून दिल्यासारखेच झाले होते. पण त्यांचे पती योगेश यांनी त्यांना त्यांच्या शिक्षणाचा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहित केले. पतीसोबत मित्र-मैत्रिणींनीही त्यांना मानसिक आधार दिला आणि त्यांनी घरीच चेंबर प्रॅक्टीस सुरू केली. त्यादरम्यान त्या मडगाव अॅडव्होकेट असोसिएशनमध्ये दाखल झाल्या. सुचिता यांनी वकिलीच्या व्यवसायात गॅप घेतल्यापासून या क्षेत्रात ऑनलाइन सिस्टीम, सब रेजिस्टार आदीमध्ये खूप बदल झाले होते. पण त्यांच्या मित्र मैत्रिणींनी त्यांना सांभाळून घेतले. काही कालावधीनंतर सुचिता यांना परत कोर्ट प्रॅक्टीस करावी असे वाटू लागले. आपल्या नवऱ्याकडे ही गोष्ट त्यांनी बोलून दाखवल्यावर त्यांनी सुचिताला पूर्णपणे सहकार्य देताना मी तुला आधार देईन असा आत्मविश्वास दिला. त्यामुळे फेब्रुवारी नंतर त्या पियुषला एकट्याला सोडून कोर्ट प्रॅक्टीससाठी बाहेर जाऊ लागल्या. आणि या जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या क्षेत्रात पूर्णपणे उतरायचे ठरवले आणि त्या अॅडव्होकेट सुधीर नाईक यांच्या मडगाव येथील कार्यालयात कामावर रुजू झाल्या. 

आता आपले काम सांभाळतानाच त्या पियुषची जबाबदारीही व्यवस्थित सांभाळत आहेत. त्यांना पियुषचा खूप आधार आहे. विशेष मुलं ही स्वत:ची ओळख निर्माण करू शकत नाहीत, त्यामुळे विशेष मुलांच्या पालकांची जबाबदारी आहे की अशा मुलांचं अस्तित्व त्यांच्याच पालकांनी निर्माण करावं हे सुचिता यांना पूर्णपणे माहीत आहे, म्हणूनच त्या आपल्या अस्तित्वासोबत आपल्या विशेष पियुषची विशेष काळजी घेताना पियुषचे अस्तित्व निर्माण करण्याच्या शोधात आहेत. त्याला भरपूर प्रेम आणि मानसन्मान देताना त्याला जबाबदार नागरिक बनवण्याच्या त्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश लाभो.


कविता प्रणीत आमोणकर, रावणफोंड, मडगाव