आपल्या सगळ्यांना रक्तगटांचे ए, बी, एबी आणि ओ हे चार प्रमुख प्रकार माहीत आहेत. प्रत्येक व्यक्तीमधील रक्तगट हा त्याच्या जनुकांनुसार निश्चित होतो व आई-वडिलांकडून अनुवंशिकतेने येतो. याचसोबत यामध्ये आरएच फॅक्टर नावाचे एक प्रथिन असते व त्यानुसार रक्तगटांचे ८ प्रकार ठरतात.
आरएच फॅक्टर म्हणजे काय?
‘आरएच’ किंवा ‘र्हिसस’ फॅक्टर हे प्रथिन अनुवंशिकतेने रक्तामध्ये येते आणि लाल रक्तपेशींवरील पडद्याच्या पृष्ठभागावर ते आढळले जाते. रक्तात हे प्रथिन असल्यास ती व्यक्ती आरएच पॉझिटिव्ह (+) असते, तर रक्तामध्ये हे प्रथिन नसलेली व्यक्ती आरएच निगेटिव्ह (-) असते. रक्तामध्ये आरएच प्रथिन असणे किंवा नसणे ही एक सामान्य अवस्था असते व त्याच्या असण्या-नसण्याचा अर्थ त्या व्यक्तीला कोणता आजार आहे असा होत नाही किंवा याचा आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही. पण कोणत्याही वैद्यकीय स्थिती दरम्यान रक्तसंक्रमण करताना, रक्तदान करताना आणि प्रामुख्याने प्रसूती दरम्यान बाळा संबंधित गुंतागुंत टाळण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा आरएच घटक जाणून घेणे आवश्यक असते.
गर्भावस्थेत आरएच फॅक्टर तपासणे का आवश्यक?
गरोदरपणात सुरूवातीलाच प्रत्येक गर्भवती स्त्रीच्या इतर रक्त चाचण्यांसोबत आरएच घटकासाठीची चाचणी झालेली असणे आवश्यक आहे. एखादी महिला आरएच पॉझिटिव्ह असल्यास तिच्या व बाळामध्ये असलेली आरएच विसंगतता त्रासदायक ठरत नाही. पण त्याऐवजी ती महिला आर एच निगेटिव्ह असल्यास, गरोदरपणात आणि प्रसूतीच्या दरम्यान बाळाला त्रास उद्भवण्याची संभावना असते. एखादी महिला आरएच निगेटिव्ह व तिचा नवरा आरएच पॉझिटिव्ह असल्यास, बाळ आरएच पॉझिटिव्ह असण्याची शक्यता असते. तसेच महिलेचा रक्तगट तिचा बाळाच्या रक्तगटाशी विसंगत असल्याचे बाळ जन्मल्याशिवाय कळत नाही, पण अशा स्थितीत तसे गृहीत धरून त्यानुसार खबरदारीचे उपाय करणे चांगले असते.
आरएच विसंगती काय असते?
शरीरात प्रवेश करणार्या कोणत्याही परकीय घटकांशी लढण्याची आपल्या शरीराची प्रवृत्ती असते आणि त्यासाठी शरीर अँटीबॉडीज तयार करतात. जर आरएच निगेटिव्ह आई, आरएच पॉझिटिव्ह बाळाला जन्म देत असल्यास, बाळाच्या रक्ताच्या संपर्कात आल्यावर आईच्या शरीरात आरएच अँटीबॉडीज तयार होतात. या स्थितीला आरएच कम्पॅटिबिलिटी किंवा विसंगती (डिस्क्रीपंसी) असे म्हणतात. ह्या विसंगतीमुळे आईच्या पहिल्या आरएच निगेटिव्ह गरोदरपणात कोणतीही चिंता उद्भवत नाही, पण तिची पुढील गर्भधारणा ही चिंताजनक असू शकते.
आईच्या पुढील गरोदरपणात बाळ परत आरएच पॉझिटिव्ह असल्यास, शरीरात तत्काळ अँटिबॉडीज तयार होतात. आरएच पॉझिटिव्ह बाळाची वार ओलांडून या अँटिबॉडीज गेल्या की, बाळाच्या लाल रक्तपेशींचे नुकसान होण्यास सुरुवात होते.
लाल रक्तपेशी शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी अत्यावश्यक असतात. पण आरएच विसंगतीच्या स्थितीत लाल रक्तपेशींचे वेगाने नुकसान झाल्याने अॅनिमियासारखी अवस्था निर्माण होऊन बाळासाठी प्राणघातक ठरू शकते. नवीन लाल रक्तपेशी निर्माण करण्याची बाळाच्या शरीराची क्षमता कमी होऊ शकते. पुढे कावीळ, हृदयविकार, यकृताचे काम मंदावणे या अवस्था येऊ शकतात आणि बाळासाठी हे प्राणघातक ठरू शकते.
आरएच विसंगतीचे निदान
बाळ आरएच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असण्याच्या विविध शक्यता समजून घेण्यासाठी, बाळाच्या आई बाबाच्या रक्तातील आरएच फॅक्टरच्या प्रकाराचे आधी विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर गरोदर स्त्रीची इनडायरेक्ट कुम्ब्स चाचणी ही साधी रक्तचाचणी करून या अवस्थेचे निदान करता येते. रक्तामध्ये पेशी नष्ट करणार्या अँटिबॉडीज आहेत की नाही, याचे निदान या चाचणीद्वारे करता येते आणि डॉक्टर यावर काय करायचे, त्याबद्दल सल्ला देऊ शकतात. बाळाची आई आरएच निगेटिव्ह असेल आणि बाबा आरएच पॉझिटिव्ह असेल तर इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन आईला देऊन तिच्या शरीरात आरएच अँटिबॉडीज तयार होणे रोखता येते. गरोदरपणाच्या २८ आठवड्यांपर्यंत हे इंजेक्शन दिले जाऊ शकते आणि बाळाचा रक्तगट पॉझिटव्ह असेल तर प्रसूतीनंतरही देता येते. या उपायांनी बाळाचे प्रभावीरित्या संरक्षण होऊ शकते.
आरएच विसंगती झालेल्या नवजात बाळाला उपचारांदरम्यान रक्त संक्रमण करणे, हायड्रेटिंग द्रव देणे, मेटाबॉलिजम नियमन करण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्स देणे, रक्तात बिलीरुबिनची अतिरिक्त निर्मिती टाळण्यासाठी बाळाला फोटोथेरपीत ठेवणे इत्यादी केले जाऊ शकते.
डॉ. श्वेता राऊत मुळगावकर