‘बाप’ माणूस

कालच बाप्पाची मूर्ती बघायला गेले होते. कारखान्यात बरीच गर्दी होती. मूर्ती पाहताना सहज लक्ष बाजूला गेले. एक मध्यम वयाचे गृहस्थ आपल्या मुलीसोबत मूर्ती निवडायला आले होते. भूतकाळात गेले मन...

Story: आठवणी |
24th August, 03:21 am
‘बाप’ माणूस

घरात मी मोठी. त्यामुळे बाबांची लाडकी. त्यांच्या प्रत्येक कामात माझी लुडबुड असे. माझे बाबा सरकारी नोकरीत. शिवाय घरचे नारळ, सुपारी. परिस्थिती तशी चांगली. चौसोपी घर, अंगण, विहीर सगळे नीटनेटके. त्यामुळे सगळ्यांचे लाड होत. बाबा त्यावेळचे मॅट्रिक. त्यात इंग्रजी फर्डे. आम्हाला कधीच क्लास लावावा लागला नाही. एरवी प्रेमळ असणारे बाबा शिक्षणासाठी एकदम कडक बनत. मुळात लहानपणी मला शाळेचा कंटाळा. बाबा रोज सकाळी सायकलवरुन मला शाळेत सोडून मग कामाला जात. हळूहळू मलाही शिक्षणात गोडी वाटायला लागली. एरवी थोडेसे कंजूष बाबा माझ्या शिक्षणासाठी पैसे खर्चायला मागेपुढे बघत नसत. पदवी घेतल्यावर आनंदाने मला कुशीत घेऊन रडणारे बाबा मला अजून आठवतात. 

बाबा तसे हरहुन्नरी, मस्तमौला स्वभावाचे. कपट माहीत नाही. त्यामुळे मित्रपरिवार मोठा. कोणालाही मदत करणे, गरजेला पैसे देणे रोजचे. अनेकजण गैरफायदा घेत. आई, आजी रोज ओरडत त्यांना, पण काहीच फरक पडत नसे. “आपल्याने होते ना, मग आपण करायचे!” असे ते सतत म्हणत. “देवा तुला रे डोळे” हे त्यांचे आणखी एक वाक्य. 

बाबांचा आवाज चांगला होता. गणपतीत आरत्या, भजन यात त्यांचा हातखंड. गावात त्यांना नाना म्हणत. चतुर्थीच्या मंचावर आधी भजनी मंडळाचा डेरा दिवसभर आमच्या घरी असे. बाबा खास सुट्टी काढत. थोडेसे उंचीने कमी असणारे बाबा आरत्या म्हणताना मात्र सगळ्यात पुढे. त्यांच्या खड्या आवाजाचे गावकर्‍यांना मोठे कौतुक. 

आरत्यांबरोबर बाबा गावच्या जत्रेत नाटकातही काम करीत. पौराणिक नाटके अणि नाट्यसंगीत हा त्यांचा खास प्रांत अणि हे सगळ्यांना मान्यही होते. नानाच्या नाटकाच्या तालमीत दुसरा कोणीही लुडबुड करत नसे. नाना करील ती पूर्व दिशा. ‘प्रिये पहा...’ हे त्यांचे आवडते गीत. भरपूर वन्स मोअर घ्यायचे ते ह्या गाण्यावर. बाबा थोडे उंचीला कमी त्यामुळं नाटकात हिरोईनचे काम करणारा स्त्री पार्टी कधीकधी थोडा उंच असे. संवाद म्हणताना हिरोची मान वर अणि हिरोईनची खाली असे बर्‍याचदा घडे. पण सुंदर अभिनयाच्या जोरावर बाबा ती उणीव भरून काढत.

नोकरी, शेती अणि इतर अवांतर गावकीच्या बाबी सांभाळताना त्यांचे घराकडे बारीक लक्ष असे. आईला ते कुठलीही गोष्ट कमी पडू देत नसत. काही सांगितले अणि ते झाले नाही असे आमच्या घरात कधीच होत नव्हते. तेच मुलांकरता. आम्हाला कळत नव्हते पण अतिशय बारीक लक्ष होते त्यांचे मुलांवर. खाण्यापिण्याचे लाड करणारा हा माणूस काही बाबतीत खूप कडक होता. आम्ही एक भाऊ आणि चार बहिणी. प्रत्येकीचे सगळे ऐकत बाबा. पण संस्कार, शिक्षण याबाबत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. आम्ही पुढील आयुष्यात व्यवस्थित सेटल झालो याचे बरेच श्रेय त्यांनाच जाते.

घरात पाहुणे खूप असत. आमचा घरोबा खूप मोठा. त्यामुळे सतत कोणाचे ना कोणाचे येणेजाणे असायचेच घरी. बाबांना माणसांची आवड. गप्पा हा प्रकार आवडीचा. रविवारी मैफल असे घरी. वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा होई. आमच्या कानावरही काही गोष्टी पडत. आयुष्यात मला याचा खूप उपयोग झाला शिक्षिका झाल्यावर. वर्तमान पत्र रोज वाचणे बंधनकारक होते आम्हाला. वाचनाने मेंदू तल्लख होतो असे ते नेहमीच म्हणायचे. 

आमचे आजोबा देवभक्त. पण बाबांना तसा कंटाळा कर्मकांडाचा. त्यात मासे व मत्स्याहार हा जिव्हाळ्याचा विषय. बाबांना माश्यांची चांगली पारख होती. आणणेही भरपूर. पूर्वी फ्रीज नसे, मग आणलेले मासे हळद लाऊन ठेवावे लागत. बाबा ते काम आईबरोबर माझ्यावर ढकलत. मी पदवीधर होणारी घरातील पहिली व्यक्ती. त्यामुळे माझा त्यांना कायम गर्व. शिक्षिका झाले तो पर्यंत ते निवृत्त झाले होते नोकरीतून. पण कष्ट सुटले नव्हते. बागेच्या देखभालीसाठी सतत जावे लागे. त्यात आम्ही ४ बहिणी. त्यांची लग्न, जावई, नातवंडे सगळ्या गोष्टी त्यांनी हसतमुखाने केल्या. तक्रार नाही.

अल्पशा आजाराने काही दिवसापूर्वी त्यांचे निधन झाले. आमचा आधारवड गेला पण त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आमची प्रगती झाली हे मात्र मी विसरले नाही. 

आता कोण म्हणतील, की काय ह्या लेखात एवढे? एक सामान्य सरळसोट आयुष्य जगलेला, आपल्या आयुष्यातील इतिकर्तव्य पार पाडलेला एक बाप. त्यात काय लिहायचे? उगाच कॉलम अडवायचे. पण खरं सांगू? आयुष्य सरळ जगणे अणि ते ही आपल्या आवडीनिवडी योग्यरित्या सांभाळून, आलेली आव्हाने सहज पेलून सतत सुखी राहणे व आपल्या कुटुंबाला, आप्तांना सुखी करणे हे काही कमी आव्हानात्मक नाही. पण असा बाप कायम दुर्लक्षित राहतो. आज सगळीकडे अगदी आमचा बाप दारिद्र्यातून कसा वर आला, ते अगदी आमचे वडील किती मोठे होते यावरच रकानेच्या रकाने भरतात. पण म्हणून सर्वसामान्य माणूस यशस्वी बाप नसतो? आपल्या पुढील पिढीच्या जडणघडणीत त्याचा वाटा नसतो? अरे खरा तर तोच बाप, जो सामान्य परिस्थितीत खूश राहतो व ठेवतो. अश्या वडिलांना, बाबांना खरा सलाम अणि ह्यासाठीच हा पंक्ती प्रपंच.


रेशम जयंत झारापकर, मडगाव.