श्रावणातला घननीळ मेघश्याम

घनश्याम सुंदरा, शाम सुंदरा अशी ही कृष्णाची नावे त्याच्या सावळ्या रंगाचे निर्देशन करतात पण त्याच्या रंग, रुपापेक्षा त्याच्या कर्तव्य गुणांचे, त्याच्यावरच्या भक्तीचे पारडे नेहमीच जड राहिले आहे.

Story: मनातलं |
24th August, 02:20 am
श्रावणातला घननीळ मेघश्याम

श्रावण म्हटला की पावसाच्या अधेमधे कोसळणाऱ्या सरींवर सरी, जरासा उन्हाचा शिडकावा आणि मध्येच भरून आलेलं घननीळ असं आभाळ. हे चित्र मनात उमटतं आणि श्रावण म्हटला की त्याच्या जोडीने येणारे सणवार, उत्सव, पूजाअर्चा, समारंभ, देवदेव असं धार्मिकतेने भारलेले वातावरण. हे सर्व आपल्या जीवनाशी निगडित असलेले आहे. 

मनाला उत्साह देणाऱ्या उत्सवांनी भरलेला हा मास म्हणजे मनाची मरगळ दूर करणारा, नवा उत्साह अंगात संचार करायला लावणारा असा असतो. गोडधोड, पंचपक्वान्न यांची रेलचेल त्यामुळे तृप्त आणि शांत झालेलं तन आणि पूजाअर्चा करून शांत, स्थिर झालेलं मन यांची सांगड असते. याच महिन्यात धरेवर अवतरतो तो घननीळ मेघश्याम आणि जन्म घेतो तो कृष्ण मेघश्याम. श्री कृष्ण जन्माची अद्भूत लीला या धरेवर  घडते. प्रत्यक्ष विष्णूच्या आठव्या अवताराने जन्म घेतला तो दिवस जन्माष्टमीचा आपण साजरा करतो. जन्मताच बंदिवासातली तुरुंगाची कड्या कुलपे तोडून त्याने आपले अस्तित्व सिद्ध करत आपली मुक्तता करून घेतली, आपल्या माता पित्याची मुक्तता केली. जन्मापासूनच्या त्याच्या अगाध लीला आपल्याला आकर्षित करत आल्या आहेत. त्याच्या देवत्वापेक्षा त्याने केलेल्या चमत्कारांनी आपण भारून जातो. त्याच्या जन्मदिनी आबाल वृद्धाच्या अंगात संचारणारा उत्साह हा बघण्यासारखा असतो. जगाचा पालनहार, दुखिताचा तारणहार, हाकेला धावून येणारा, प्रसंगी मदत करणारा असा विश्वात्मा.

प्रत्येकाच्या मनात तो वेगवेगळ्या रूपात प्रिय असतो. बाल चमूना तो खट्याळ, खोड्या करणारा, अवखळ किशोर, मित्रांसोबत दही लोणी चोरून खाणारा, मस्ती करणारा, खेळ खेळणारा, दहीहंडी फोडणारा माखन चोर म्हणून आवडत असेल. कुणाला सुदामासारख्या गरीब मित्रावर पण तेवढीच कृपादृष्टी ठेवणारा सखा म्हणून आवडतो, प्रेमीजनांच्या हृदयात तो रासक्रीडा करणारा गोपिकांना भुलवून रात्रीच्या चंद्रप्रकाशात गरबा दांडिया खेळणारा, जीवलग प्रेमवीर वाटत असेल, राधेच्या मनावर राज्य करणारा प्रेमी असेल, प्रसंगी द्रौपदीची लाज रखणारा रक्षण कर्ता भाऊ असेल, सोळा सहस्त्र स्त्रियांना बंदिवासातून सोडवून त्यांचा उद्धार करणारा शूर वीर असेल, युद्धात स्वत: शस्त्र हाती न घेता अर्जुनाला उपदेश करून युद्धाला तयार करणारा मुत्सद्दी सारथी असेल, कंसाचा वध करून आपल्या मातापित्यांना राज्य मिळवून देणारा प्रेमळ पुत्र असेल, तर साऱ्या जीवनाचे सार सांगणारी भगवत गीता सांगणारा बुद्धिमान तत्वज्ञानी असेल. कुणाला कुठले, तर कुणाला कुठले त्याचे रूप आवडत असते. पण तरीही त्याच्या प्रती असलेली श्रद्धा मात्र सर्वांची सारखीच असते. घननीळ मेघाच्या वर्षावाने जशी तप्त धरा तृप्त होते, तसे आपले मन श्री कृष्णाच्या भक्तीभावाने प्रसन्न आणि तृप्त होऊन जाते. 

अशा कृष्ण भक्तीने स्वत:चे जीवन समर्पित करणाऱ्या व्यक्तींची अनेक उदाहरणे पौराणिक कथांमध्ये वाचायला मिळतात. मीराबाई लहानपणापासून कृष्ण आपला पती आपला सर्वेसर्वा आहे असेच मानून जीवन जगली. राधा ही पण अशीच कृष्ण भक्तीने पावन झालेली एक भक्त. वृंदा ही कृष्ण भक्त समर्पित जीवन जगणारी. आपण लहानपणापासून पौराणिक कथांतून श्री कृष्णाच्या चमत्काराच्या लीला वाचत आणि ऐकत मोठे झालो. पुतनेचा वध, कालिया मर्दन, अरिष्टासुराचा वध, केशीचा वध असे अनेक दाखले देत त्याने आपल्या पराक्रमाच्या विजयाचे झेंडे या भूमीत रोवले. वृंदावनात रासक्रीडा रचून प्रेमाची महती जगाला शिकवली की प्रेम हे शारीरिक आकर्षण नसून ती आत्म्याला जोडणारी शक्ती आहे. हरीदासांची कृष्ण भक्ति इतकी श्रेष्ठ होती की ते तल्लीन होऊन भजन गायला बसले, की प्रत्यक्षात श्री कृष्ण त्यांच्या समोर येऊन बसायचे. मी पूर्वी वृंदावन येथे गेले होते तेव्हा ऐकलेली गोष्ट म्हणजे, इथे एक रंग महल आहे. तिथे कृष्ण आणि राधा रोज येतात. सकाळी दार उघडल्यावर सर्व वस्तु विस्कळित झालेल्या दिसतात पण हे कुणी पाहिलेले नाही कारण लपून पाहणारा आंधळा किंवा वेडा होतो असा समज आहे. कथा असेल किंवा दंतकथा असेल.   

जन्माष्टमीच्या उत्सवात भगवान श्रीकृष्णाची मनोभावे पूजा केली जाते. त्यांच्या जन्माच्या वेळी पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो. त्यानंतर त्याला आवडता असलेला दही आणि खडीसाखरेचा प्रसाद वाटला  जातो. या दिवशी मध्यरात्री कृष्ण जन्मोत्सव साजरा करतात. दिवसभर उपवास करतात. संपूर्ण रात्र भजन कीर्तनात व्यतीत करतात. दुसरे दिवशी दही, दूध, पोहे यांचा काला करतात. तो प्रसाद देतात. दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव असतो. उंचावर दहीहंडी बांधतात, एकमेकांच्या खांद्यावर चढून तरुण मुलेही ‘गोविंदा आला रे आला’ म्हणत दहीहंडी फोडतात. महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि इतर काही राज्यातही दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मथुरा, वृंदावन, द्वारका या क्षेत्री जरी त्याची कर्मभूमि होती तरी सुद्धा देशभर आणि देशाबाहेरही कृष्णभक्तीचा प्रसार झालेला दिसतो. इसकॉन या संस्थेचे परदेशात बरेच भक्तगण आहेत जे कृष्णभक्ती करतात.

कदंब वृक्षाखाली बसून पावा वाजवणारा मुरलीधर, गाईगुरांची राखण करणारा गोपाल, बाजारात दही दूध घेऊन जाणाऱ्या गवळणीची वाट अडवणारा माखनचोर अशी अनेक मनमोहक रुपे घेऊन तो सर्वांना मोहित करत आला आहे. श्री कृष्णाच्या लीला सर्वांनाच ऐकायला आवडतात. युद्ध भूमीवर त्याने अर्जुनाला सांगितलेला उपदेश आणि कर्मयोग हे तर मानवी जीवनाचे सार सांगणारे तत्वज्ञान आहे. कर्म करत रहा पण फलाची अपेक्षा न करता. प्रत्येक माणसाने सतत क्रियाशील राहिलं पाहिजे हा कर्मयोग. फळ देणं न देणं हे परमेश्वराच्या हाती असतं. फलाची अपेक्षा केली की मन चिंताग्रस्त होत  राहतं. मन चंचल होतं. कर्म करण्यानेच माणसाचा विकास साध्य होतो. त्याला ज्ञान प्राप्ती होते. श्री कृष्णाच्या उपदेशाच्या अनुकरणाने आपले जीवन सफल होण्यास मदत होते. त्यांनी दाखवलेल्या लीला ह्या सर्वसाधारण नव्हत्या त्यात चमत्कार होता, देवत्व होतं आणि तरीही त्यातून ते अलिप्त होते म्हणूनच भगवान श्री कृष्णाला देव मानलं जातं. 

कृष्ण या शब्दाचा अर्थ जरी काळ्या रंगाशी संबंधित असला तरी, कृष्ण या शब्दाचा दुसरा अर्थ हा “जो सर्वांना प्रिय असतो तो” असा आहे. या अर्थाने श्री कृष्ण हे सर्वांना प्रिय असणारे दैवत आहे. काळ्या रंगाचा किंवा त्याच्या सावळेपणाचा संबंध नावापुरता आहे. घननीळ म्हणजे काळ्या ढगांचे विशेषण पण त्यात अर्थ आहे जो पाण्याने भरलेला असतो म्हणून काळा दिसणारा ढग असा होतो. मेघश्याम या नावातही तोच अर्थ दडला आहे. मेघ जो श्यामल म्हणजे काळ्या रंगाचा बनला आहे तो. ह्या विशेषणातही जल भरीत मेघ असाच अर्थ आहे, जल म्हणजे जीवन देणारा, जो कृष्णासाठीही वापरला जातो. आपल्या दयेच्या कृपेच्या अपार अशा जल वर्षावाने भक्ताला सुखी करणारा, जीवन देऊन तृप्त करणारा तो कृष्ण सखा म्हणूनच हे नाव त्याला सार्थ ठरतं. 

‘घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा’, ‘घनश्याम सुंदरा’, ‘शाम सुंदरा’ अशी ही कृष्णाची नावे त्याच्या सावळ्या रंगाचे निर्देशन करतात पण त्याच्या रंग, रुपापेक्षा त्याच्या कर्तव्य गुणांचे, त्याच्यावरच्या भक्तीचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. बहुतेक सगळ्याच देवांचा रंग आपण सावळा मानतो राम असो विठ्ठल असो कृष्ण असो त्यांच्या सावळ्या  रूपाचेच लोकांना वेड  लागते. ते त्यांच्या कृपा प्रसादामुळे. “त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे गं” असं एखादी गोपिका म्हणते त्यात श्रीकृष्णाची आकर्षित करण्याची भक्ती आणि शक्ती दोन्ही एकवटलेले दिसते.


प्रतिभा कारंजकर, फोंडा.