शाळेची मधली सुट्टी व्हायला अजून दहा मिनिटे बाकी होती. तरी बाईने मुलांना हात धुवून यायला सांगितले मुले पटापट हात धुवून वर्गात येऊन बसली व बाई काय सांगतात ते अगदी कान देऊन ऐकू लागली. “मुलांनो आज आपल्या सुदीपचा वाढदिवस.” असे म्हणून बाईंनी सुदीपला आपल्या टेबलापाशी बोलवले.
स्वच्छ आणि नीटनेटक्या गणवेशातील सुदीप थोडासा लाजला. बाई पुढे सांगू लागल्या, “त्याच्या आईने सर्वांसाठी अगदी तिने स्वतःच्या हातांनी घरी बनवलेला खाऊ पाठवला आहे. मुलांनो तुम्हाला माहीत आहे का? यावर्षी सुदीप आपला वाढदिवस कसा साजरा करणार आहे तो?” मुले आता अगदी कान देऊन बाईंचे बोलणे ऐकू लागली.
बाई पुढे सांगू लागल्या, “काल सुदीप आपल्या आईवडिलांसोबत शहराजवळच्या गोशाळेत जाऊन आला. त्यांनी त्या गोशाळेत गुरांना लागणारे खाद्य नेऊन दिले. शिवाय गोमातेची पूजा करून तिचे आशीर्वादही घेतले. आज संध्याकाळी तो आपल्या आईवडिलांसोबत आपल्या शहरातील मोठ्या बागेत फुलझाडे लावणार आहे. मुलांनो, तुम्हाला जर आवड असेल तर तुम्हीसुद्धा सुदीप समवेत आज संध्याकाळी आपल्या शहरातील बागेत, तसेच उद्या आपल्या शहराबाहेरच्या माळारानावर फुलझाडांचे आणि फळझाडांचे रोपण करणार आहेत, तिथे जाऊ शकता. तुम्हाला कुणाला जायचे असेल, तर मला सांगा. आपल्या शाळेतील विद्यार्थी जर सुदीपच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात हजर राहिले, तर सुदीपच्या आई-बाबांनाही खूप आनंद होईल. मुलांनो, तुम्ही साखरेने भरलेले केक, तेलकट चिप्स, पिझ्झा, बर्गर असे बाहेरचे विक्रीला ठेवलेले खाद्यपदार्थ खास वाढदिवसासाठी म्हणून आणता. पण सुदीपच्या आईने मात्र खास सुदीप वाढदिवसानिमित्त घरी बनवलेले पदार्थ आपल्यासाठी पाठवले आहेत. आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने, पण समाज उपयोगी कसा साजरा करायचा? याचे उदाहरण सुदीपच्या आई-वडिलांनी घालून दिलेले आहे.” असे सांगून बाईंनी सुदीपला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तसा लगेच सुदीप बाईंच्या पाया पडला. बाईंनी त्याला मनभरून आशीर्वाद दिला.
सगळ्या मुलांनी सुदीपसाठी वाढदिवस गीतगायन करून त्याला शुभेच्छा दिल्या. बाईंनी सर्व मुलांना एक एक बेसनाचा लाडू आणि गोडाच्या शिऱ्याचे काप त्यांच्या टिफिनमध्ये खाऊ म्हणून दिले. वर्गात देशी तुपाचा आणि वेलचीचा घमघमाट सुटला होता. सगळ्या मुलांनी रुचकर मिठाई अगदी मिटक्या मारीत खाल्ली. शाळा सुटल्यावर चौथीत शिकणारा सुदीप अगदी आनंदाने घरी परतला. आज त्याच्या आई-बाबांनी त्याच्यासाठी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती व त्याच्या आवडीच्या जेवणाचा बेत केला होता. संध्याकाळ होताच त्याचे बालमित्र त्याच्या घरी जमले. आईने सुदीपला वाढदिवसानिमित्त छान औक्षण केले. सगळ्यांनी पोटभर खाऊ खाल्ला व ते सगळे शहरातील बागेत गेले. सगळ्यांनी मिळून तिथे व शहराजवळच्या माळरानांवर झाडे लावली. जून महिना असल्याने पावसाची रिपरिप सुरू होती. आज सुदीप खूप आनंदात होता. त्याने वेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला होता.
शर्मिला प्रभू, फातोर्डा मडगाव