आनंदोत्सव झेंडावंदनाचा..

स्वातंत्र्यानंतर देश बदलला खरा, परंतु खऱ्या स्वातंत्र्याची उणीव आजही प्रत्येकाला लहान-मोठ्या प्रसंगात भासत आहे. सोळा-सतरा वर्षांपूर्वीचे आमच्या प्राथमिक शाळेतले स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे दिवस आठवले की आपसूकच आताच्या मुलांवर नजर जाते. मात्र तो आनंदोत्सव आताच्या प्राथमिक स्तरावरच्या मुलांमध्ये आढळत नाही. स्वातंत्र्य दिनानिमित्त प्राथमिक शाळेतील मुलांशी अनुभव शेअर करण्यासाठी म्हणून गेले असता झेंडावंदनाला दिलेल्या वेळेत विद्यार्थी येणार, त्याच्या अगोदर नाही असं तिथे काम करणाऱ्या बाईकडून‌ समजले तेव्हा माझ्या प्राथमिक शाळेतील आम्ही साजरे केलेले स्वातंत्र्य दिन आठवू लागले.

Story: सय अंगणाची |
17th August 2024, 04:37 am
आनंदोत्सव झेंडावंदनाचा..

एका आठवड्यापूर्वीच आम्ही आनंदाने न्हाऊन जायचो. शाळेत असताना चांगल्या सुख-सुविधा आम्हाला लाभल्या नसल्या, तरी चांगल्या विचारांचे बीज मात्र आमच्यामध्ये कायमस्वरूपी रुजवले गेले होते. गणेश चतुर्थीला जशी घराची साफसफाई करून गणेशाच्या आगमनाची आपण वाट पाहतो, तशी वाट आम्ही स्वातंत्र्य दिनाची पाहायचो. किती फरक ना, आताच्या मुलांमध्ये आणि कितीतरी वर्षे मागे गेल्यानंतर आमच्यामध्ये! स्वातंत्र दिनाचे भाषण, आपली वेशभूषा यात रमलेली ही मुलं आणि भाषणातील प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घेऊन ते बोलणे, मध्येच विसरलो तरीही वाणी बंद होतं नसे. नुसतं पाठांतर नसायचे, ते आतून आलेले शब्द भिडायचे. कितीतरी दिवस अगोदर स्वातंत्र्य विषयीच्या गोष्टी गुरुजी वर्गात सांगताना अंगावर शहारे यायचे. प्रत्येक स्वातंत्र्य वीरांसाठी नयनी अश्रू वाटायचे त्या बालवयात. परंतु आज बदलत्या देशात भावनांचा त्याग झालेला दिसतो.

शाळेच्या भिंतीवर असलेल्या स्वातंत्र्य वीरांची नावे सांगताना त्यांची नावे आदरभावाने घेण्याची शिकवण आमच्यामध्ये रुजली खरी परंतु आज ती प्रत्यक्षात एखाद्याच्या वाणीतून क्वचितपणे दिसत आहे. तो भगतसिंग, तो सावरकर अशी नावे ऐकताना ते नुसते इतिहास लिखित आणि फोटो मध्येच राहिल्याचे जाणवते. आजही त्यांच्यासाठी 'ते' हे सन्मानाने मुखी येते. ऐकणाऱ्याला हे एखाद्या टिंबासारखं वाटणार परंतु आजवर या वीरांना नुसते नावांनी नाही तर त्यांच्या संघर्षांची जाणीव घेऊन जगणाऱ्या माझ्यासारख्या कितीतरी जणांना ते वेदनादायी वाटू‌ लागते.

जाणिवेकडून नेणिवेकडे जाणाच्या मार्गात आज सोपस्कर मार्ग तयार झालेले आहेत. आज देशभर साजरा होणाऱ्या स्वातंत्र्यदिनात मन दुखावतं, कारण आपण आताची पिढी डिजीटल युगात वावरत आहे त्यांना सर्वकाही माहीत आहे. गुगल सर्व काही देतं या भ्रमात राहून हे विसरतो की डिजीटल युगात भावनांचं बटनच नाही आहे.

धैर्य, शांतता, वैविध्यता, प्रगती या शब्दांनी अफाट नावीन्य निर्माण करणाऱ्या आपल्या तिरंगी ध्वजाचे रंग प्लास्टिकवर भरारी घेत कुठेतरी तुडवून जाताना दिसत आहेत. संवेदनावर आळा घालता येणार नाही अशा गोष्टी घडत असताना. शालेय जीवनातील स्वातंत्र्यदिन आठवून भारतमातेकडे आमच्या आठवणीतील ते दिवस पुन्हा मागून घ्यावेसे वाटतात.

वर्षभरात आनंदाचे तीन दिवस म्हणजे झेंडावंदनाचे असायचे. वर्गात एका प्रकारच्या उत्सवाची तयारी असायची. जणू तो दिवस कधी येईल आणि ‘जयोस्तुते’चा आवाज कधी गावात पोहचेल यासाठी मने उतावीळ व्हायची. स्वातंत्यदिनाच्या पूर्वसंध्येला गावभर फिरून फुले गोळ्या करण्यातील आनंद तर गगनी भिडायचा. ध्वज फडकवताना जणू कुणीतरी नभातून फुलांचा वर्षाव आपल्यावर करतंय असे वास्तविक चित्र डोळ्यांसमोर असायचे. वर्ग फुलांच्या रांगोळीने सजायचे. कुठल्याही माईकची गरज नसताना राष्ट्रगीताने अवतीभोवतीचा परिसर गुणगुणायचा. वाटेवरच्या गाड्या काही सेंकदासाठी थांबल्या जायच्या. सगळीकडे सामसूम. जणू खरीच श्रध्दांजली माझ्या भारतमातेच्या वीरपुत्रांना वाहिली जायची. त्यांच्या प्रतिमांना फुलं वाहून पूजन केले जायचे. हे स्वातंत्र्याचे संस्कार आमच्यामध्ये रुजले गेले. कुठलीही वेशभूषा न करता मुखातून पडणारे शब्द बाहेर पडतानाचा आवाज, आतून येताना कितीतरी वेळा स्वातंत्र्यवीरांविषयी व्यक्त होताना भावुक व्हायला व्हायचे. हें खरे भावनेतून‌ व्यक्त होणारे झेंडावंदन म्हणजे आनंदोत्सव असायचा.

एखाद्या सणासुदीला मुलांना पैसे दिले जायचे. आमच्या घरात वर्षातून तीन वेळा माझ्या हाती ३ रुपये आनंदाने बाबा ठेवायचे. स्वातंत्र्य दिन, मुक्ति दिन, प्रजासत्ताक दिन. यासाठी एक-एक रुपया ठरलेलाच. स्वातंत्र्यदिनादिवशी चॉकलेटपेक्षा सुख प्राप्त व्हायचे ते हातावर पडलेल्या गोडधोड पदार्थाचे. त्याच्यातील सुख हे आनंदोत्सवाचा भाग होता. स्वातंत्रदिनी भेटलेल्या एका रुपयाचे नवीन पेन घेतानाचा आनंद व्यक्त न करता येणारा. 

तिरंगी झेंड्याच्या रंगाचे फुगे फुलवून सजावट कधी आम्ही केलीच नाही आणि कधी ते करण्याची कल्पना स्वतः मध्ये रुजणेही शक्य होणार नाही. ‘ज्या मातीत रक्त मिसळले, तेथे फुलांनाच महत्त्व पुन्हा बहरण्यासाठी’ हे गावातील एक आजोबा आम्हाला नेहमी सांगायचे...


ओनिता रामा वरक, पाल-ठाणे‌, सत्तरी.