कराटेमध्ये पदकांची लयलूट करणारी सम्रता

Story: तू चाल पुढं |
17th August 2024, 03:34 am
कराटेमध्ये पदकांची लयलूट करणारी सम्रता

२४ वेळा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती, २९ वेळा राज्य सुवर्णपदक विजेती असलेली सम्रता गावंडे हिने  आंतरराष्ट्रीय खेळाडू –दुबई २०१७ येथे झालेल्या जागतिक कराटे फेडरेशन चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून तायक्वांडो, ज्युडो, कराटे, बॉक्सिंग, कुडो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, स्क्वे मार्शल आर्ट्स , क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाद्वारे आयोजित चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक प्राप्त करून गोव्याचे नाव उंच केले आहे. सम्रता भारतीय सैनी बटालियनमध्ये राष्ट्रीय कॅडेट कोर्प्स म्हणून सी प्रमाणपत्रधारक असून पेंचक सिलाट मार्शल आर्ट्समध्ये ३७ व्या राष्ट्रीय खेळामध्ये कांस्यपदक विजेता ठरली आहे. इतक्या पदकांची मानकरी असून ही सम्रता एक नम्र स्वभावाची मुलगी सर्वश्रुत आहे.

आजकाल जिकडे पहावे तिथे मुले मोबाईल घेऊन बसलेली असतात. त्यामुळे मुले आळशी होत चालली आहेत. “ आळशी झाल्याने शरीराचा व्यायाम होत नाही आणि अनेक आजारही मग पाठ सोडत नाहीत. परंतु मुलांनी शिक्षणाबरोबर खेळातही भाग घेऊन त्यात आपले कौशल्य दाखवावे. खेळ खेळल्याने शरीर तर सुदृढ राहते पण त्याचसोबत मनही सुदृढ राहण्यास मदत होते. त्यासाठी पालकांनी मुलांना शिक्षणासोबत खेळ खेळण्यास प्रवृत्त करायला हवे.”  असे मानणार्‍या  सम्रताला लहानपणापासूनच खेळाची खूप आवड.

तिने घाटामरड सरकारी प्राथमिक शाळा, शेणवी हायस्कूल आणि मग रोजरी महाविद्यालय येथून आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शाळेत असतानाच कबड्डी, क्रिकेट, अॅथलीट, कराटे या खेळात तिने प्रावीण्य मिळवले. वयाच्या बाराव्या वर्षी सम्रताने कराटे शिकायला सुरुवात केली आणि त्यानंतर तिच्यात खूप बदल झाला. आई वडिलांशिवाय बाहेर न फिरणारी सम्रता मग एकटीच निर्धास्त फिरू लागली.  कराटे शिकल्यामुळे तिच्यात संरक्षण तसेच इतरांचेही संरक्षण करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.

सम्रताच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच असली तरी तिच्या आईवडिलांनी तिला काही कमी पडू दिले नाही. तिच्या खेळासाठी लागणारे सर्व साहित्य, तिच्या प्रवासाचा खर्च त्यांनी उचलला. आपली लेक खूप शिकली पाहिजे आणि त्याचबरोबर तिने तिच्या आवडत्या खेळातही नाव कमावले पाहिजे ही तिच्या वडिलांची इच्छा होती. आणि त्यामुळेच ते सदैव सम्रताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी दिलेल्या सर्व सहकार्यामुळेच आज सम्रताने खेळात आपले नाव उंच केले. कराटेचे शिक्षण पूर्ण केल्यावर सम्रताने आके बायश पंचायत सभागृहात मुलींना कराटे प्रशिक्षण देण्याचे वर्ग सुरू केले. प्रत्येक मुलीला स्वत:चे रक्षण स्वत: करता यायला हवे, त्यासाठी प्रत्येक मुलीने कराटे शिकायला हवे, असे सम्रताला मनापासून वाटते.

सम्रताने त्यानंतर दिल्ली, केरळ, मध्यप्रदेश, कर्नाटक , महाराष्ट्र, गोवा अशा अनेक राज्यात पदके पटकावली. त्यानंतर २०१७ या वर्षी दुबई येथे झालेल्या वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये कराटेच्या स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपल्या भारत व भारतीय ध्वजाला दुबईमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला प्राप्त झाली.

कोणत्याही खेळात जर प्रावीण्य मिळवायचे असेल तर त्यासाठी अथक परिश्रम, कष्ट यासोबत योग्य आहार तसेच नियमित भरपूर व्यायामाची गरज आहे. सम्रताही आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी या सर्व गोष्टींकडे लक्ष देताना कसून मेहनत करत आहे. अगदी पहाटे सम्रताचा दिवस सुरू होतो. पहाटे ४:३० ते ५ः०० यावेळात धावणे, ५:३० ते ६ः०० यावेळेत योगा केल्यानंतर तिच्या रोजच्या कामाला सुरूवात होते.

शिक्षणासोबतच कराटे खेळामध्ये आपली चमक दाखवताना सम्रताने कधीच शॉर्ट कट वापरला नाही. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी त्यात जीव ओतून आपले सर्वस्व द्यावे या विचाराने प्रेरित झालेल्या सम्रताने भरपूर मेहनत करूनच हे यश प्राप्त केले आहे. सम्रता, तू चाल पुढं...


कविता प्रणीत आमोणकर, रावणफोंड, मडगाव