मडगाव : बेकायदेशीररीत्या तीन म्हशी घेऊन शेल्डेवरुन सुरावलीच्या दिशेने जाणार्या गाडीवर फातोर्डा पोलिसांनी कारवाई केली. संशयित बेनेडिट डिकॉस्टा (रा. माडेल, मडगाव) याच्यावर प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करत चौकशीसाठी नोटीस जारी केली आहे.
फातोर्डा पोलिसांनी म्हशींची वाहतूक करणार्या टेम्पोचालकाकडे सदर वाहतुकीसाठी कोणतीही कागदपत्रे नसल्याचे लक्षात येताच कारवाई केली. मडगाव व कुडचडे येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शेल्डे ते सुरावली अशी म्हशींची विनापरवाना वाहतूक केली जात असल्याची माहिती दिली. त्यानुसार फातोर्डा चौगुले महाविद्यालयानजीक शनिवारी केलेल्या तपासणीवेळी मिनी ट्रकमध्ये साधारण तीन ते चार वर्षे वयाच्या म्हशींची वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. वाहन चालकाकडे वाहतूक करण्यासाठी परवाना किंवा इतर कागदपत्रे देण्याची मागणी केली असता त्याच्याकडे काहीही आढळले नाही. यासंदर्भात पवन जाधव (रा. रुमडामळ दवर्ली) यांनी फातोर्डा पोलिसांत यासंदर्भात तक्रार नोंद केली आहे. फातोर्डा पोलिसांनी बेकायदा म्हशींची वाहतूक केल्याप्रकरणी संशयित बेनेडिट डिकॉस्टा याच्याविरोधात प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद केला. तसेच चौकशीसाठी नोटीसही जारी केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अतिकेश खेडेकर पुढील तपास करत आहेत.