पॅरिस ऑलिम्पिकचा आज समारोप

देश-विदेशातील १०० हून अधिक कलाकार करणार परफॉर्म

Story: न्यूूज डेस्क। गोवन वार्ता |
11th August 2024, 12:13 am
पॅरिस ऑलिम्पिकचा आज समारोप

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकला मागील महिन्यात २६ जुलै रोजी प्रारंभ. ज्याचा उद्घाटन समारंभ जगभरात चर्चेचा विषय बनला होता. दरम्यान, या स्पर्धेचा समारोप समारंभ ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. उद्घाटन समारंभाच्या वेळी सीन नदीवर अॅथलीट्सची परेड आयोजित करण्यात आली होती.
पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप समारंभ फ्रान्समधील सर्वात मोठे स्टेडियम स्टेड डी फ्रान्समध्ये होणार आहे. या स्टेडियममध्ये एकाच वेळी ८० हजार लोक बसू शकतात. हा सोहळा भारतात १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२:३० वा. सुरू होईल, जो किमान २ तास चालणार आहे.
समारोप समारंभाच्या आयोजकांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात १०० हून अधिक कलाकार परफॉर्म करणार आहेत. यामध्ये अॅक्रोबॅट्स, नर्तक आणि सर्कस कलाकारांचाही समावेश असेल. एक संगीत कॉन्सर्ट होईल ज्यामध्ये स्नूप डॉग, सेलीन डीओन, बिली इलिश आणि रेड चिली पेपर्स नावाचा रॉक बँडचेही सादरीकरण केले जाणार आहे.
समारोप समारंभात सार्मिएन्टोचे गायन
पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात पाच वेळा ग्रॅमी विजेती आणि ‘हर’ म्हणून प्रसिद्ध असलेली गॅब्रिएला सार्मिएन्टो विल्सन परफॉर्म करताना दिसणार आहे. २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी ‘हँडओव्हर’चा भाग म्हणून ती स्टेड डी फ्रान्समध्ये अमेरिकेचे राष्ट्रगीत गाणार आहे. ‘हर’ने तिच्या शानदार कारकिर्दीत ऑस्कर, एमी आणि ग्रॅमी पुरस्कार पटकावले आहेत.
मनू भाकर, श्रीजेश भारताचे ध्वजवाहक
पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन समारंभाच्या वेळी पीव्ही सिंधू आणि शरथ कमल यांना भारतीय संघाचे ध्वजवाहक बनवण्यात आले होते. तर समारोप समारंभात भारतीय संघाचे ध्वजवाहक मनू भाकर आणि पीआर श्रीजेश असतील. भाकरने २०२४ ऑलिम्पिकमध्ये २ कांस्यपदके जिंकली आहेत, तर पीआर श्रीजेश कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा एक भाग होता आणि त्याने यादरम्यान हाॅकीतून निवृत्ती देखील जाहीर केली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकचे भारताचे पदक विजेते
नीरज चोप्रा : रौप्यपदक (भालाफेक)
मनु भाकर : कांस्यपदक (१० मी. नेमबाजी)
मनू भाकर-सरबज्योत सिंग : कांस्यपदक (मिश्र संघ, १० मी. नेमबाजी)
स्वप्नील कुसाळे : कांस्यपदक (५० मी. नेमबाजी)
भारतीय हॉकी संघ : कांस्यपदक (पुरुष, हॉकी)
अमन सेहरावत : कांस्यपदक (५७ किलो कुस्ती)
पदकतालिकेत भारत ६९ व्या स्थानी
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील पदकतालिकेत भारत १ रौप्य आणि ५ कांस्यपदकासह ६९ व्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान एका सुवर्णापदकासह ५९ व्या स्थानावर आहे. चीन (३५ सुवर्ण, २७ रौप्य, २३ कांस्य) पहिल्या स्थानावर, अमेरिका (३३ सुवर्ण, ४१ रौप्य, ३९ कांस्य) दुसऱ्या, आणि आॅस्ट्रेलिया (१८ सुवर्ण, १६ रौप्य, १४ कांस्य) तिसऱ्या स्थानावर आहे.