वन्यजीवाशी मैत्री पहावी करुन!

वन्यजीव आपला शत्रू नसून मित्र आहे हे पटवून देण्यासाठी काही पथके सक्रियपणे काम करतात. वन्यजीव संरक्षण ही फक्त प्राणीमित्र व सर्पप्रेमींची जबाबदारी नसून सर्वांचे योगदान गरजेचे आहे. वन्यजीवांशी मैत्री केल्यास तो आपला सर्वात घनिष्ठ मित्र बनू शकतो आणि म्हणूनच वन्यजीवांशी एकदा मैत्री पहावीच करुन!

Story: साद निसर्गाची |
11th August 2024, 04:50 am
वन्यजीवाशी मैत्री पहावी करुन!

एखादा साप दिसला की बहुतांश लोक लगेच घाबरुन जातात. सापापासून स्वतः चे रक्षण करण्यासाठी त्याला ठार मारणे हा एकमेव पर्याय असल्याचा गैरसमज उरी बाळगणारे लोक मग लगेच त्याला काठीने किंवा दंडुक्याने ठार मारतात. मग तो घरात असो किंवा घराबाहेर. तो विषारी असो किंवा बिनविषारी. साप दिसला की मागचा पुढचा विचार न करता त्याला ठार मारण्याकडे लोकांचा जास्त कल असतो. पण दिसला की मारला हे तंत्र वापरण्याइतका हा सरपटणारा प्राणी भयानक आहे का? 

गोव्यातील पश्चिम घाटाच्या रांगेत सापाच्या एकूण ४५ ते ५० प्रजाती सापडतात; पैकी फक्त १०-१५ टक्के विषारी तर उरलेले साप हे मध्य-विषारी व बिनविषारी गटात मोडतात. आपण सगळे सजीव मनुष्य, प्राणी, पशु-पक्षी, जलचर, उभयचर,  कीटक, नभचर एका विशिष्ट प्रणालीमध्ये बांधलेलो आहोत. मनुष्याला जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्याची गरज असते हे आपण जाणतोच. पण पर्यावरणाचा समतोल सांभाळणे व अन्नसाखळीचे संतुलन बिघडू न देणे हेही माणसाच्या सुरळीत जीवनासाठी तितकेच महत्त्वाचे असते ही गोष्ट आपण विसरतो. आणि म्हणूनच माणसाच्या हातून प्राण्यांवर अत्याचार करणे, मागचा-पुढचा विचार न करता सापांना ठार मारणे, जंगलतोड, नदी प्रदूषण यासारखे कारनामे घडतात. 

मागच्या महिन्यात सापांच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या गोव्यातील 'सेव्ह' या बिगरसरकारी संस्थेने साप व इतर वन्यजीव संरक्षणार्थ आयोजित जनजागृती व मार्गदर्शन शिबिराला हजेरी लावण्याचा योग आला. त्याआधी सापांचे अंग बुळबुळीत-गुळगुळीत असते, मण्यार उडी मारुन चावा घेतो, नाग सुड उगवतो, हरयाळी डोक्यावर फुंकर मारते यासारखे गैरसमज दूर करण्यासाठी हे शिबिर माझ्यासारख्या कित्येकजणांना मार्गदर्शक ठरले. मुख्य म्हणजे आम्हाला इथे बिनविषारी साप हाताळण्याची संधी मिळाल्याने मनात सापांबद्दल असलेली भीतीही दूर झाली. सोबत उपस्थितांच्या असंख्य  शंकांचे निरसन व अंधश्रद्धेचे निर्मूलनही झाले. 

नागपंचमीच्या दिवशी नागोबाला दूध पाजण्याची प्रथा आहे. नागोबा खरंच दूध पितो का? 

साप हा मांसाहारी प्राणी आहे. तो उंदीर, बेडूक, छोटे-मोठे किडे खाऊन आपला उदरनिर्वाह करतो. नागोबाला दूध कधीच आवडत नाही. उलट नागाला दूध पाजल्यास तो आजारी पडू शकतो कारण साप दूध नीट पचवू शकत नाही.

सर्पाच्या डोक्यात मौल्यवान खडा असतो असे म्हणतात ते खरे आहे का? 

साप हे इतर प्राण्यांप्रमाणे पेशी आणि स्नायूंनी बनलेले असतात. त्यांच्या शरीरात कोणताही हिरा किंवा मौल्यवान खडा नसतो. तसेच ते कोणाला संमोहितही करू शकत नाहीत. सापाच्या डोक्यात नागमणी असतो म्हणतात ती गोष्ट साफ चुकीची आहे. या अंधश्रद्धेमुळे वर्षाकाठी कितीतरी सापांना आपले प्राण गमवावे लागतात.

सूड उगवण्यासाठी साप एखाद्या व्यक्तीचा मागोवा घेत त्याच्या घरापर्यंत पोहोचतो असे म्हणतात ते खरे आहे का? 

सापाचा मेंदू स्मरणशक्ती टिकवून ठेवण्याइतपत विकसित झालेला नसतो. त्यामुळे साप बदला घेतो किंवा सूड उगवतो म्हणतात ते चुकीचे आहे. साप कधीच सूड घेऊ शकत नाही. 

पासको/नानाटो या सापाला मारल्यास सात साप सूड घेण्यासाठी घरात येतात असा समज आहे. यात काही तथ्य आहे का? 

सात हा अंक बरोबर नसेल कारण कितीही नानाटे येऊ शकतात. मिलन कालावधीत नानाटो मादी साप ठार मारल्यास असे होण्याची शक्यता असते. मिलन कालावधीत मादी सापाला मारल्यास ही मादी ताणामुळे फेरोमोन्स नामक द्रव्य सोडते. हे तेच द्रव्य असते जे ती मिलन कालावधी दरम्यान नर सापाला आकर्षित करण्यासाठी सोडते. नर साप बदल्याच्या भावनेने नव्हे तर फेरोमोन्सचा वास उग्र असल्याने घराजवळ आकर्षित होत असतो. 

मांडूळ या सापाला दुतोंड्या असे संबोधले जाते. मांडूळाला खरंच दोन तोंड असतात का?  

इतर सापांप्रमाणे मांडूळालाही फक्त एकच तोंड असते. मांडूळ हा अत्यंत सावकाश चालणारा बिनविषारी साप आहे. शिकारी प्राण्यांपासून स्वतःचे रक्षण करता यावे म्हणून मांडूळाचे शेपूट नैसर्गिकरित्या त्याच्या तोंडासारके दिसते. याच शेपटीच्या सहाय्याने मांडूळ शिकारी प्राण्यांपासून स्वतःचे रक्षण करतो. पण वेळ पडल्यास हेच मांडूळ विषारी सापालाही वेटाळा घालून ठार मारु शकतो. 

पुंगीवाल्याने वाजवलेल्या पुंगीच्या आवाजाने नाग डोलायला लागतो का? 

नाही. नागाला बाह्य कान नसतात. ते शिकार करताना आवाजाच्या मदतीने नव्हे तर प्राण्याची हालचाल बघून त्याची शिकार करतात. ते कंपन जाणू शकतात. हाच तर्क वापरुन पुंगीवाला सापाला डोलावतो. पुंगीच्या आवाजाने पुंगीवाला सापाला नव्हे तर गिऱ्हाईकाला आकर्षित करत असतो. 

धामण हा साप घरात वास्तव्यास राहिल्यास घरात सोनं येतं असे म्हणतात यामागचे कारण काय? 

ही निव्वळ अफवा आहे. पूर्वीच्या काळात घरात धान्याचा साठा असायचा. घरात उंदीर असल्यास सगळे धान्य खाऊन टाके. धामण हा बिनविषारी साप घरात असल्यास तो उंदराच्या संख्येवर नियंत्रण ठेवू शकत असे आणि म्हणून जनमानसात कदाचित असा समज झालेला असावा. 

साप दिसला की काठी उचलून त्याला मारुन टाकणे ही माणसाची रोजची सवय झाली आहे. एखादा साप दिसताच आपण घाबरतो. मग तो विषारी आहे की बिनविषारी याची शहानिशा न करता सरळ काठी उचलून त्याला हाणतो. तुम्ही म्हणाल मग काय तो चावा घ्यायला येईपर्यंत आपण गप्प बसायचे का? तर नाही. साप कधीही उगाच माणसाच्या वाटेला जात नाही. त्याच्यावर पाय पडला, त्याची छेड काढली तरच तो स्वरक्षणासाठी उलट वार करतो. म्हणून काही प्रमाणात आपण काळजी घेणे गरजेचे आहे. 

सापांच्या बाबतीत आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे? 

* साप विषारी असो किंवा बिनविषारी, माहिती नसल्यास त्याला हात लावायला/पकडायला जाऊ नये. 

* घरात साप आल्यास प्राणीमित्र, सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा. 

* सर्पमित्र पोहोचेतोवर सापावर नजर ठेवावी. त्याला मारु नये. काठीने छेड काडू नये किंवा त्याच्या जवळ जाऊ नये. 

* तुम्ही जमिनीवर झोपत असल्यास भिंतीला लागून झोपू नये कारण साप घरात आल्यास भिंतीच्या कडांना लागून सरपटतो.

*  साप घरात शिरु नये म्हणून आजूबाजूचा परीसर स्वच्छ ठेवावा. उंदीर हे सापाचे आवडीचे खाद्य असल्याने उंदीर तिथे साप असणे स्वाभाविक आहे. 

* सर्पमित्राच्या नात्याने सापाला हात लावल्यास हात साबणाने स्वच्छ धुवावे. सापाच्या अंगावर कित्येक जीव-जंतू असतात. हे जंतू माणसाच्या संपर्कात आल्यास रोग होण्याची दाट शक्यता असते. 

* एखादा साप रस्ता ओलांडताना दिसल्यास गाडी थांबवून त्याला रस्ता ओलांडण्यासाठी वेळ द्यावा. 

*  काळोखात बाहेर पडताना, झुडपात हात घालताना, रानात जाताना टॉर्चचा वापर करावा. 

 * जंगल भ्रमंतीसाठी जात असल्यास डोक्यावर हॅट, पायांना गमबूट घालावे. 

* साप बिळात असल्याचे आढळल्यास धूर घालून किंवा काठी घालून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करु नये. धूराने साप मरण्याची शक्यता असते. काठी लागल्यास त्याला इजा होऊ शकते. 

वन्यजीव जनजागृती व पर्यावरणीय अभ्यास पथक (स्टडी ऍंड अवेरनॅस ऑफ वाईल्डलाईफ ऍंड ऍनवायरमेंट), वन्यजीव प्राणी बचाव पथक (एनिमल रेस्क्यू स्कॉड), यासारख्या बिगरसरकारी संस्था वन्यजीव संरक्षणाहितार्थ गोव्यात कार्यरत आहेत. वन्यजीव आपला शत्रू नसून मित्र आहे हे पटवून देण्यासाठी ही पथके सक्रियपणे काम करतात. वन्यजीव संरक्षण ही फक्त प्राणीमित्र व सर्पप्रेमींची जबाबदारी नसून सर्वांचे योगदान गरजेचे आहे. वन्यजीवांशी मैत्री केल्यास तो आपला सर्वात घनिष्ठ मित्र बनू शकतो आणि म्हणूनच वन्यजीवांशी एकदा मैत्री पहावीच करुन!


स्त्रिग्धरा नाईक