देशभक्तीचा अनोखा ओटीटी कंटेंट


11th August, 02:47 am
देशभक्तीचा अनोखा ओटीटी कंटेंट

१५ ऑगस्ट अर्थात भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन सोहळा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलाय. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटलेल्या अगणित क्रांतिकारकांच्या स्वाभिमानी बलिदानाची गौरवशाली गोष्ट सांगणारा हा दिवस. आपल्या घरातल्या इडियट बॉक्सवर तर या दिवशी देशभक्तीपर सिनेमांना महापूरच आलेला असतो. खरं तर काही ठराविकच सिनेमांची वर्षानुवर्षे या टीव्ही चॅनल्सवर चलती असते. जणू काही प्रेक्षकांना त्यांच्या आवडीचा किंवा वेगळ्या धाटणीचा देशभक्तीपर कंटेंट बघण्याचं स्वातंत्र्यच नसतं! चला तर या स्वातंत्र्यदिनी, थोडा वेगळा पर्याय निवडूया. हा पर्याय आहे ओटीटी माध्यमांचा आणि अर्थातच वेगवेगळ्या वेबसिरीजेसचा

 ‘स्पेशल ऑप्स’

रॉ ही भारताची गुप्तचर संस्था. देशाच्या संरक्षण विभागावचा हा जणू मेंदूच. सिनेमात ही संस्था म्हणजे फक्त कागदी घोडे नाचवणाऱ्या काही निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांचं ऑफिस वाटावं अशी दाखवली जाते. या अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये बसून निव्वळ कारकुनी काम करणं आणि ‘लार्जर दॅन लाईफ’ करामती करू शकणाऱ्या हिरोला महत्त्वाच्या मिशनवर पाठवणं अशीच कार्यप्रणाली या सिनेमांमध्ये दाखवली जाते. पण या संस्थेचं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं ते ‘स्पेशल ऑप्स’ या मालिकेत. नीरज पांडे दिग्दर्शित या मालिकेत के. के. मेनन मुख्य भूमिकेत आहे. रॉ आपल्या मोहिमांचं नियोजन कशी करते, त्यामागचे आर्थिक-सामाजिक-राजकीय-प्रशासकीय पडसाद काय असतात, रॉ एजंट्सला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा या सिरीजमध्ये रंजकतेने मागोवा घेण्यात आलेला आहे.

वेबसिरीज: स्पेशल ऑप्स ( २ सीझन्स), ओटीटी: सोनी लिव्ह

‘द फॅमिली मॅन’

‘रॉ’सारख्या मोठ्या संस्थेबरोबरच अनेक वेगवेगळ्या गुप्तचर संस्था देशभरात कार्यरत असतात. ‘एनआयए’ ही अशीच एक देशांतर्गत दहशतवादविरोधी कारवायांना आळा घालणारी संस्था. ‘द फॅमिली मॅन’मध्ये याच संस्थेचा एक भाग असलेल्या ‘टास्क’ नावाच्या उपसंस्थेचं जग प्रेक्षकांना पाहायला मिळतं. राज आणि डीके या जोडगोळीने दिग्दर्शित केलेल्या या सिरीजमध्ये मनोज वाजपेयीने श्रीकांत ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. आपल्या देशाची एखाद्या कुटुंबासारखी काळजी घेणारा श्रीकांत आणि स्वतःच्या कौटुंबिक घडामोडींना तोंड देणारा श्रीकांत ही तारेवरची कसरत या सिरीजमध्ये रंजकतेने मांडलेली आहे. एका देशप्रेमी, कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याचं सामान्य माणूस म्हणून जगणं काय असतं, याची प्रचिती ही सिरीज बघून येते.

वेबसिरीज: द फॅमिली मॅन (२ सीझन्स), ओटीटी: ऍमेझॉन प्राईम व्हिडीओ


द टेस्ट केस

भारतीय सैन्यात सहभागी होऊन देशसेवा करण्याचं उदात्त स्वप्न कित्येकांनी लहानपणापासूनच पाहिलेलं असतं. यातलेच काही ध्येयवेडे पुढे अतोनात कष्ट करून जिद्दीने भारतीय सैन्यात भरती होतात. पुढे त्यांच्या कौशल्यांच्या जोरावर त्यांना योग्य ती जबाबदारी सोपवली जाते. ‘स्पेशल कॉम्बॅट फोर्स’ हाही असाच एक भारतीय सैन्याचा विभाग, जिथं अत्यंत कुशल, निडर आणि धाडसी सैनिकांचा समावेश असतो. प्रामुख्याने पुरुषांची संख्या जास्त असलेल्या या विभागात स्त्रियांचा समावेश तसा विरळाच. आजघडीला कित्येक स्त्रियांनी स्पेशल फोर्समध्ये भाग घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी लागणाऱ्या खडतर प्रशिक्षणप्रकियेत मात्र त्या तग धरू शकलेल्या नाहीत. अशाच एका जिगरबाज महिलेची गोष्ट विनय वैकुळ आणि नागेश कुकनूर दिग्दर्शित ‘द टेस्ट केस’मध्ये पाहायला मिळते. या सिरीजमध्ये निमरत कौरने साकारलेली कॅप्टन शिखा शर्मा ही स्पेशल फोर्सेसमध्ये पात्र झालेली एकमेव स्त्री आहे. शिखाच्या पुरुष सहकाऱ्यांना तिचं एक स्पेशल फोर्स अधिकारी म्हणून कौतुक वाटणं तर दूरच, पण ती एक स्त्री असल्यामुळे तिच्याविषयी त्यांच्या मनात अविश्वासाची, अनादराचीच भावना उफाळून येत असते. या सगळ्याचा सामना शिखा कशी करते? ती तिच्या पुरुष सहकाऱ्यांचा दृष्टिकोन बदलण्यात यशस्वी ठरते का? स्पेशल फोर्सच्या सर्व निकषांना पुरून उरते का? भारतीय सैन्य स्त्री आणि पुरुष या भेदभावाच्या पलीकडे जाऊन कसं काम करतं? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या सिरीजच्या माध्यमातून उमगत जातात.

वेबसिरीज: द टेस्ट केस (१ सीझन), टीटी: जियोसिनेमा


प्रथमेश हळंदे