नवी दिल्ली : 'भारतात काही तरी मोठं होणार आहे..' या आशयाचे क्रिप्टिक पोस्ट करत हिंडनबर्ग या यूएसच्या शॉर्ट सेलर फर्मने देशातील इन्वेस्टर्सच्या काळजात पुन्हा धडकी भरवली आहे. आज पहाटे ५:३४ वाजता ट्विटरवर हिंडनबर्गच्या हॅंडलद्वारे क्रिप्टिक पोस्ट करण्यात आली होती. दीड वर्षांपूर्वी गौतम अदानी यांच्या अदानी उद्योगसमूहाच्या अनेक अंतर्गत बाबी उघड केल्यानंतर गौतम अदानी यांना तब्बल १५० अब्ज डॉलर्सच्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते.
आता बऱ्याच दिवसांनी या कंपनीने भारताला उद्देशून एक पोस्ट केली आहे. यावेळी देखील हिंडनबर्ग काही मोठा खुलासा करू शकेल असे मानले जात आहे. मात्र नेमके काय होणार आहे याबाबत पोस्टमध्ये माहिती देण्यात आलेली नाही.
जानेवारी २०२३ मध्ये, अदानी एंटरप्रायझेसने शेअर ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी, हिंडेनबर्गने एक अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या विपरीत परिणामामुळेच अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. त्यांचे बाजार भांडवल सुमारे ८६ अब्ज डॉलरने घसरले होते. याव्यतिरिक्त, या आरोपानंतर समूहाच्या फॉरेन लीस्टेड शेअर्सचीदेखील विक्रमी विक्री झाली. यावेळी कोणती कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चच्या निशाण्यावर येते हे पाहण्यासारखे असेल.
वर्षाच्या सुरुवातीपासूनच जगभरात विविध क्षेत्रांत बरीच उलथापालथ झाली आहे. व्यापार-वाणिज्य क्षेत्रात मंदी, अन्य धान्य तुटवडा, जागतिक महागाई, विविध देशांत असलेली युद्धजन्य स्थिती व प्रगतीशील तसेच अतिप्रगत देशांत उसळलेल्या व उसळत असलेल्या दंगली पाहता गेल्या ७८-८० वर्षांचा शांततेचा काळ समाप्त होऊन जग पुन्हा आराजकतेत धुमसणार अशी चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.