अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक साप

मानवाच्या ‘उचलली काठी की हाणली सापाच्या डोक्यात’ अशा वागण्याने या अन्नसाखळीतील महत्वाचा घटक संकटात सापडतो आहे. त्याला संकटमुक्त करून या नागपंचमीच्या निमित्ताने हे गैरसमज दूर करून आपण सापाचे मित्र झालो तर ते आपल्यासाठीच चांगले होईल.

Story: विचारचक्र |
09th August, 11:52 pm
अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक साप

जनमानसात श्रावण महिन्याला फार मोठे महत्व आहे. त्यासाठी अनेक लोक वेगवेगळी पथ्ये पाळतात. काही अट्टल दारूडे दारूला हातही लावत नाहीत, तर अधूनमधून प्रसंगानुरूप दारूचा ग्लास हातात धरणारेही श्रावण महिन्यात या सगळ्यापासून दूर राहतात. ज्या गोवेकरांना काट्याशिवाय गोटा (माशाशिवाय भाताचा एक कण) जात नाही म्हणतात, ते वीर गोवेकर काटेकोरपणे शाकाहारी राहतात. मांसाहार करणारे बहुतेक लोक चिकन, अंडी यापासून दूर राहतात. काही लोक या महिन्यात वेगवेगळ्या रानभाज्या खाण्याचा संकल्प करतात तर काही लोक या महिन्यात कुणाला न दुखावण्याचा संकल्प करतात. असे अनेक स्वत:साठी घालून दिलेले कायदे असतात, ज्याचे स्वत: तेच पालनकर्ते असतात.

 या सगळ्याचे प्रमुख कारण म्हणजे बहुतेक धार्मिक सण या महिन्यात येतात. त्यामुळे या महिन्याला पवित्र महिना म्हणून मानले जाते. शिवाय या दरम्यान माशांचा प्रजनन काळ असल्याकारणाने त्यांना मारणेही बरोबर नसते. त्यांचे इकोसिस्टममध्ये संतुलन बाळगण्यासाठी त्यांची संख्या सांभाळणे गरजेचे असते. कदाचित आपल्या जाणत्या मंडळींना याचे महत्व माहीत होते. त्यामुळे पूर्ण महिना माशांना संरक्षण लाभावे, या कारणास्तव या महिन्याचे पावित्र्य जन्मास घातले गेले असावे.

 या महिन्याचा प्रथम सण हा नागपंचमी. सापाचे पर्यावरणीय महत्व आपल्या मनावर बिंबवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. एरवी दिसला साप की उचलली काठी, अशी आपली मानसिकता असताना या दिवशी मात्र सापाला दुधाची वाटी हातात घेऊन वारुळाची वाट चालताना महिला दिसतात. साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे असे म्हणतात. त्याचे कारण साप उंदीर, घुशी खाऊन पिकाची नासाडी रोखतात. उंदीर आणि त्याच्या कुटुंबातील प्रजातींची संख्या खूप वेगाने वाढते. त्यामुळे त्यांना नियंत्रित करणे फार जिकिरीचे काम असते. त्यासाठी सापाचे असणे फार महत्वाचे आहे. नागपंचमीच्या निमित्ताने सापाविषयी असलेल्या अंधश्रद्धा नाहीशा करणे, गरजेचे आहे. 

साप हा फक्त शेतकऱ्याचा मित्र नसून पूर्ण मानवजातीचा मित्र आहे. आजच्या घडीला मानवाचे आजार दूर करण्यासाठी तयार केलेल्या बहुतेक औषधांमध्ये सापाचे विष वापरतात. अल्प प्रमाणात हे जालीम विष मानवाला पुनर्जीवन देऊ शकते. त्यामुळे साप हा उपयुक्त प्राणी आहे.

 लहान असताना घरातील जाणती मंडळी आम्हाला सापाच्या गोष्टी रंगवून सांगायची. एकदा सापाला आपल्यामुळे जखम झाली किंवा सापाला मारताना तो पळून गेला की, तो डूक धरून परत मागे येतो. रात्री घरी येतो, इथे तिथे दृष्टीस पडतो. मनात डूक धरतो. पण वैज्ञानिकदृष्ट्या बघितले तर हे चुकीचे आहे. मनोरंजन वा एक गोष्ट म्हणून या घटना रंजक वाटतात. पण सत्य हे आहे की सापाला दिसत नाही. माणूस ओळखणे आणि त्याला लक्षात ठेवण्याइतपत त्याचा मेंदू विकसित झालेला नसतो. तो बदला वगैरे कधीच घेत नाही. त्यामुळे या डूक धरण्याच्या गोष्टी फक्त मनोरंजनासाठी आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

 साप दूध पितो असे म्हणतात. साप हा मांसाहारी प्राणी आहे. तो सस्तन प्राणी नाही. त्यामुळे तो लहान असताना सुद्धा दूध पीत नाही. त्यामुळे दूध हा त्याचा आहार नाही. तो दूध पितो असे म्हणणे खोटे आहे. दूध पचविण्यासारखी त्याची पचनसंस्था बनलेली नसते. हळद, पिंजर या गोष्टीही सापाच्या कातडीसाठी मारक ठरू शकतात. त्यामुळे सापाची पूजा करताना या गोष्टी करू नयेत. जिवंत सापाची पूजा करणे टाळावेच. 

सापाला कधीच दाढी किंवा केस येत नाहीत. जेवढे आपण प्रगत होत जातो तेवढे आपण अंधश्रद्धाळू होतोय की काय असा प्रश्न पडतो. खूपवेळा समाज माध्यमांवर या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार होत असतो. मागे एकदा मोठे केस असलेला साप सगळ्यांच्या मोबाईलवर फिरत होता. म्हाताऱ्या सापाला मिशा येतात, दाढी येते असे संदेश त्यासोबत फिरत होते. सापाच्या  त्वचेतून केस कधीही उगवू शकत नाहीत. काही मांत्रिक बकरी किंवा तत्सम कुणाचे केस काढून पाळलेल्या बिनविषारी सापाच्या त्वचेत सुईने टोचून ठेवतात. सापाला जखम होते. ती जखम भरली की हे मांत्रिक सापाला केस दाखवून लोकांकडून पैसे उकळतात.

 आपल्या अवतीभवती खूप साप राहतात. बहुतेक साप हे बिनविषारी असतात. काही मोजकेच साप विषारी आणि निमविषारी असतात. हे साप ओळखू न आल्याने माणूस सापाला घाबरतो व लगेच त्याला मारण्याचा पावित्रा घेतो. पण साप आपणहून कधीच चावत नाही. चुकून त्याच्यावर पाय पडला तरच तो आत्मसंरक्षणासाठी चावा घेतो. पाय जर स्थिर असेल, सापावर पडलेला नसेल तर साप पायावरून पलिकडे शांतपणे जातो. यावरून तो निरुपद्रवी प्राणी आहे, असे दिसते. 

चुकून साप चावला तर त्या रुग्णाला डॉक्टरकडे नेणे गरजेचे आहे. गरजेप्रमाणे डॉक्टर त्याला अँटिवेनम इंजेक्शन देतात. कधीही साप चावला की मांत्रिक, तांत्रिकांकडे जाऊन वेळ आणि जीव धोक्यात घालू नये. सापाचे विष कुठल्याही मंत्राने उतरत नाही.

नाग, मण्यार, घोणस, फुरसे असे मोजके साप विषारी असतात. विषारी सापांच्या डोक्यावरील खवले ही असमान लहान, मोठी असतात. एकसमान नसतात. तेच आपल्याला सहज दिसणारे अजगर, मालुंड, हेवाळे, दिवड, नानाट्टा, हरयाळी हे साप बिनविषारी असतात. या सापांच्या डोक्यावरची खवले ही छोटी आणि एकसमान असतात. त्यांच्या आकारात फरक नसतो. त्यामुळे सापाला न मारताही आपल्याला कळू शकते की, तो विषारी आहे की बिनविषारी. अशा काही गोष्टी लक्षात घेतल्या तर आपली सापाबाबतची भीती कमी होईल.

 सापाविषयी अनेक गैरसमज आपल्या मनात आसतात. पर्यावरणातील परिसंस्थेचे अस्तित्व हे विविध प्राण्यांच्या अन्नसाखळीवर अवलंबून आहे. या अन्नसाखळीचा साप हा महत्वाचा दुवा आहे. मानवाच्या ‘उचलली काठी की हाणली सापाच्या डोक्यात’ अशा वागण्याने या अन्नसाखळीतील महत्वाचा घटक संकटात सापडतो आहे. त्याला संकटमुक्त करून या नागपंचमीच्या निमित्ताने हे गैरसमज दूर करून आपण सापाचे मित्र झालो तर ते आपल्यासाठीच चांगले होईल. 


- नमन सावंत (धावस्कर)  

(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या व साहित्यिक आहेत.)