पावसाळ्यातील केसांची काळजी आणि केश धूपन

आपले केस सुंदर, काळे, सिल्की शाईनी असावे अशी बऱ्याच जणांची इच्छा असते. सुंदर केस व्यक्तीचे सौंदर्य खुलवतात. बाह्य वातावरण, आहार, ऋतुबदल, प्रदूषण, पाणी इ. अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या केसांवर होत असतो. वेगवेगळ्या ऋतूनुसार केसांच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. आत्ता सुरू असलेल्या पावसाळ्यातील केसांच्या काही समस्या व त्यावरील उपाय आपण बघुया.

Story: श्रावण |
10th August 2024, 06:20 am
पावसाळ्यातील केसांची काळजी आणि केश धूपन

पावसाळ्यात डोक्यात कोंडा होऊन खाज येते?

पावडर सारखा रुक्ष कोंडा आणि डोक्याची त्वचा तेलकट होऊन निर्माण होणारा चिकट कोंडा असे दोन प्रकार सामान्यतः दिसतात.

केसांची स्वच्छता न पाळणे, कंगवा साफ न करता वापरणे, अति प्रमाणात तेलकट, चिकट पदार्थ, आंबवलेले पदार्थ दुधाचे पदार्थ सेवन करणे, उशी स्वच्छ नसणे, केस धुतल्यानंतर नीट न सुकवणे इत्यादी कारणांमुळे कोंडा तयार होतो, बऱ्याचदा डोके धुतल्यानंतर नीट पुसले नाहीत किंवा अती घाम आल्याने, पावसात डोके भिजून ओलसर राहिले असता फंगल ग्रोथ होऊन सुद्धा कोंडा होतो व डोक्याला खाज सुटते.

डोक्यावर पुरळ येणे, फंगल इन्फेक्शन होऊन खपल्या निघणे, तीव्र खाज येणे : 

दमट हवामानात केसांची नीट स्वच्छता ठेवली नाही किंवा ज्यांना फंगल इन्फेक्शन झालं आहे त्यांचा कंगवा, टॉवेल, त्यांनी  स्टायलिंगसाठी वापरलेली प्रसाधने वापरल्याने या फंगल इन्फेक्शनचा संसर्ग होतो. 

वरील केसांच्या समस्या उद्भवू नये म्हणून खालील उपाय घरच्या घरी करता येतील

शिरोभ्यंग - डोक्यावर, केसांच्या मुळांशी खोबरेल / तीळ तेल जिरवणे. डोक्यात खाज येत असल्यास मेथी, कडुनिंब या वनस्पती घालून तयार केलेलं सिद्ध तेल वापरावं. 

नस्य - रोज आकाश निरभ्र असताना पावसाळ्यात अणूतेल किंवा तीळ तेल २-२ थेंब नाकात घालणे. 

केसांची व केशभूमीची स्वच्छता ठेवणे. केस धुण्यासाठी सौम्य शॅम्पू वापरणे. अंथरूण, उशी, टॉवेल स्वछ ठेवावे.

केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरणे.

मऊ सुती टॉवेल बांधून केस सुकवणे. केस सुकवण्यासाठी सतत ड्रायरचा वापर, केस झटकणे टाळावे. 

पावसाळ्यात केशभूमीचा ओलावा कमी व्हावा यासाठी एक विशेष उपक्रम आयुर्वेदात सांगितला आहे तो म्हणजे केश धूपन.

नैसर्गिक औषधी द्रव्यांच्या साहाय्याने धूर करणे म्हणजे धूपन. शास्त्रोक्त निर्जंतुकीकरण करण्याची पद्धत म्हणजे धूपन.

देवाची पूजा करताना आपण देवाला धूप अर्पण करतो. हा पूजेतील उपचार आरोग्यदायी आहे. आयुर्वेदानुसार एखादी खोली निर्जंतुक करायची असेल तर तिथे धूपन केलं जातं, सूतिकागार-बाळंतिणीची खोली,  औषधीगृह-जिथे औषधं ठेवली जातात, शस्त्रक्रिया कक्ष सुद्धा धूपन करून निर्जंतुक केले जात असे. 

शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर धूपन सांगितले आहे उदा.योनीधूपन, गुदधूपन, कर्णधूपन, व्रणधूूपन, सर्वांगधूपन इ. 

यातील केश धूपन हे पावसाळ्यात विशेष उपयुक्त आहे. केश धूपन म्हणजे केसांना व केशभूमीला धुपविणे. 

केश धूपनाचे फायदे :- 

केसांतील ओलावा नाहीसा होतो, ओलावा नष्ट झाल्यामुळे तिथे फंगल ग्रोथ होणार नाही आणि इन्फेक्शन सुद्धा होणार नाही. 

केसांतील कोंडा कमी होतो. 

डोक्यात पुरळ उठून, त्यात पू होणे असा त्रास असेल तर कमी होतो

डोक्यातील खाज कमी होते. 

धूपनासाठी सुगंधी द्रव्ये वापरली असता केसांना  छान सुगंध येतो. 

केश धूपन कसे करावे?

गोवऱ्यांचे छोटे तुकडे करावे व धूपन पात्रात ठेवावे त्यावर थोडेसे साजूक तूप घालवून ते तुकडे पेटवावे, त्यातून धूर यायला लागला की धूपन द्रव्यांची भरड - धूप, कापूर, हळद, कडुनिंब, वेखंड, वावडिंग, कढीपत्त्याची पाने यांपैकी जे उपलब्ध असेल ते गोवऱ्यांवर थोडे थोडे घालावे यातून निर्माण होणारा धूर केस मोकळे सोडून केसांना व केशभूमिला धुपविणे.  आत्ता चांगल्या प्रतीचे नैसर्गिक धूप कप्स सुद्धा मिळतात, ते सुद्धा केश धूपनासाठी वापरू शकता. 

केश धूपन कधी करावे?

डोक्यावरून आंघोळ केली की डोके व केस सुती टॉवेलने पुसावे व नंतर केश धूपन करावे. 

केश धूपन झाल्यानंतर केस सुकले की नीट विंचरावे. ज्यांना डोक्यात फंगल इन्फेक्शनचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून किमान तीन वेळा धूपन करावे, ज्यांना त्रास नाही त्यांनी आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा केश धूपन करावे. असे हे केश धूपन एकदा तरी नक्की करून बघा.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य