ब्रेस्ट पंपींग म्हणजेही स्तनपानच का  ?

ऑगस्टचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान दिवस. स्तनपानासाठी भारतातही पंपींगचा वापर महिलांमध्ये वाढला असला तरी लोकांमध्ये यासंबंधात खूप न्यूनगंड आहे. अन् खरंच ब्रेस्ट पंप हा एक उत्तम पर्याय असला तरीही याचा वापर करणे योग्य आहे की नाही असा प्रश्न प्रत्येकीलाच पडू शकतो. त्यामुळे आज आपण ब्रेस्ट पंपींग याबद्दल अधिक माहिती घेऊयात.

Story: आरोग्य |
03rd August 2024, 03:13 am
ब्रेस्ट पंपींग म्हणजेही स्तनपानच का  ?

सध्याच्या बिझी लाइफस्टाइल अन् धकाधकीच्या जगात जास्त अशा स्त्रिया नोकरी व्यवसाय करणाऱ्या असतात. यामुळे प्रसुतिपश्चात अनेक स्त्रियांना तीन -सहा महिन्यांचीच रजा असल्याने, परत कामाला सुरूवात करण्याची त्यांना घाई असते. अशा वेळेस आपल्या बाळाला पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. यातही जर बाळ आईच्या अंगावर स्तनपान करत असेल तर दिवसभर सोबत नसल्याने, प्रत्येकवेळी स्तनपान करण्यासाठी वेळ काढणे शक्य होत नाही. कधीकधी इच्छा असूनही आई बाळाला स्वत:चे दूध पाजण्यात असमर्थ ठरते. किंवा अजून दुसऱ्या कारणास्तव बाळाला दूध पाजणे शक्य नसते. मग नाईलाजाने बाळाचे पोट भरण्यासाठी फॉर्म्युला मिल्कचा आधार घ्यावा लागतो. अशा स्थितीत उपयोगी ठरते, ब्रेस्ट पंपींग. याद्वारे बाळाला पाजण्यासाठी आई आपले दूध पंपींगचा वापर करून काढते व साठवून ठेवते. मग हे दूध बाळाला गरज असते त्या वेळेस सहजपणे देणे शक्य असते. 

ब्रेस्ट पंप हे एक असे यंत्र आहे ज्याच्या मदतीने आई आपल्या स्तनातून दूध काढून ते साठवून ठेवू शकते. ब्रेस्ट पंप मॅन्युअल आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही प्रकारचे असतात, जे वॅक्युमच्या दबावानुसार काम करते. मॅन्युअल ब्रेस्ट पंपमध्ये पंपाला हाताने दाबून दूध काढले जाते. इलेक्ट्रॉनिक ब्रेस्ट पंपमध्ये पंप स्तनाला लावताच दूध स्वत:हून निघून पाईपमधून त्याच्यासोबत असलेल्या बाटलीमध्ये भरले जाते. ते साठवून आई गरजेनुसार बाळाला दूध देऊ शकते.

ब्रेस्ट मिल्क पंप करण्याचे फायदे

• बाळाला कधीही दूध पाजू शकते- जर एखाद्यावेळी आई सोबत नसेल किंवा आईसाठी स्तनपान करणे सोयीस्कर नसेल तर त्यावेळेस पंप केलेले दूध चमच्यातून किंवा बाटलीतून दिले जाऊ शकते. यामुळे बाळाला कुठेही आणि कधीही दूध पाजले जाऊ शकते.

• दूध साठवले जाऊ शकते- आईला नोकरीवर जायचे असल्यास किंवा काही काळासाठी बाळापासून दूर राहणे आवश्यक असल्यास पंप केलेले दूध साठवून ठेवून बाळाला गरज असल्यास वेळेस ते मिळू शकते.

• स्तनदाह टाळणे- स्तनांमध्ये जास्त दूध भरलेले असेल व बाळ ते पूर्णपणे रिकामी करत नसल्यास स्तनात दाह होऊ शकतो. अशावेळी नियमितपणे पंप करून स्तन रिकामी केल्याने स्तनांमधील अतिरिक्त दूध काढून ठेवून  स्तनदाह टाळला जाऊ शकतो.

ब्रेस्ट मिल्क पंप करण्याचे तोटे

• वेदनादायी ठरु शकते- काही महिलांना स्तनातून दूध पंप करणे कठीण किंवा वेदनादायक वाटू शकते.

• आईसाठी हानिकारक ठरु शकते- वारंवार स्तनांतून दूध काढण्यासाठी पंपचा वापर झाल्यास स्तनाग्रे आणि ऊतींना सूज येऊ शकते.

• बाळासाठी हानिकारक ठरु शकते- आईचे दूध पंपद्वारे काढून दिले जाते तेव्हा बाळाला योग्य ती पोषक तत्वे त्यातून मिळत नाहीत. तसेच आईचे दूध साठवून ठेवल्यावर या दुधात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे बाळाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

• दूध साठवणे आणि हाताळणे- पंप केलेले दूध  योग्यरित्या हाताळणे व साठवूण ठेवणे महत्त्वाचे असते. नाहीतर हे दूध दूषित होऊ शकते आणि बाळाला आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

ब्रेस्ट मिल्क केव्हा पंप करावे ? 

• ब्रेस्ट मिल्क पंपींग वारंवार न करता काही तासांच्या फरकाने अगदी आवश्यक असेल तेव्हाच केले पाहिजे. आईचे दूध पंप करण्यापूर्वी, बाटलीसोबतच इतर उपकरणे देखील स्वच्छ करुनच घ्यावीत.

• पंपींग केलेले दूध जास्त काळ बाटलीत उघड्या वातावरणात ठेवू नये. 

• पंप केलेले दूध काढल्यानंतर किमान चार तास बाहेर, रेफ्रिजरेटरमध्ये चार दिवस व डिप फ्रिजरमधे सहा महिन्यांपर्यंत साठवले जाऊ शकते.

 भलेही आई बाळाजवळ असो किंवा नसो, ते आई आणि बाळाला समाधानी ठेवण्यासोबतच त्यांच्यात प्रेमाचे दृढ बंध निर्माण करण्याचे काम करते. प्रत्येक आईने आपले दूध पंप करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व दूध पंप करण्याची योग्य पद्धत शिकून घ्यावी व स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी म्हणजे ही प्रक्रिया सुरक्षित व सोपी ठरू शकते. ब्रेस्ट पंपद्वारे स्तनपान नैसर्गिक पद्धतीप्रमाणेच स्तनपानाची पद्धत आहे, त्यामुळे दोन्ही प्रकारामध्ये तुलना करू नये.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर