कधीकधी एकटेपणा हा परिस्थितीने किंवा इतरांनी आपल्यावर लादलेला असू शकतो. पण कुणीही सहसा एकटेपणाला सामोरे जायला तयार नसते. गरजेच्या वेळी आपल्या माणसाने साथ सोडली की एकटेपणाची जाणीव होऊ लागते.
हल्लीच काव्यवाचनाच्या वेळी एका सखीने केलेली कविता मनाला स्पर्शून गेली. विषयच तसा होता. हल्लीच तिच्या पतीचे निधन झाल्याने तिच्या आयुष्यात त्याच्या शिवायचे आलेले एकटेपण जे तिला असहनीय वाटत होते. क्षणाक्षणाला आपल्या जोडीदाराची आठवण येणं साहजिकच आहे. त्याच्या सोबत दिवस रात्र एकत्र घालवलेले क्षण मनावर कोरले गेलेले असतात. ते पुसता येत नाहीत. जोडीदारामध्ये कोण आधी जाणार, कोण नंतर हे काहीच सांगता येत नाही. मग मागे जो उरतो त्याला या एकटेपणाच्या वेदना सहन कराव्या लागतात. त्याच्या किंवा तिच्या शिवाय जीवन अपूर्ण आहे हे सत्य उशिरा कळते. भलेही ती व्यक्ति जवळ असताना हजार वेळा एकमेकांशी भांडले असतील, चिडले असतील, एकमेकांची उणीधुणी काढली असतील पण जसजसे वय होत जाते तसतसे नाते मुरत जाते. या जोडीची एकत्र राहण्याची गोडी वाढत जाते. आयुष्यात समजूतदारपणाची आलेली कल्हई जीवनात चमक आणते. दोघांचे जीवन एकरूप होऊन जाते. अशा वेळी त्याचे किंवा तिचे सोडून जाणे यासारखे दुसरे दुःख नाही. पण कधी कधी दोन माणसे आयुष्यभर एकत्र राहूनही त्यांच्या नात्यात आपलेपणा नसतो अशा वेळी एक कोरडेपणा उरतो. असा एकटेपणा नैराश्य आणतो. केवळ दोन व्यक्ति एकत्र राहण्याने एकटेपणा संपतो असे नाही. त्यांच्या मनाच्या तारा जुळाव्या लागतात. असा एकटेपणा माणसाला पोखरून काढतो. निसर्गतः माणूस हा कळपात राहणारा प्राणी असल्याने सहवासाची ओढ त्याला मनापासून वाटत असते. आपले विचार, आपली सुख-दुःखे त्याला दुसऱ्यांशी शेयर करायला आवडत असतात त्यासाठी आजूबाजूला माणसे असणे गरजेचे असते. सामान्य माणसाला आपण एकटे पडण्याची भीती वाटत असते. मुले शिकली ती दूरदेशी गेली की आपण एकटे पडू अशी भीती वाटत असते. एकटेपणा हा लादलेला असतो तेव्हा मग मागच्या भूतकाळातील आठवणी मनात कुरवाळत बसून मनाला अजूनच क्लेश करून घेत असतो. एकटेपणा मनाला मरगळ आणतो एका प्रकारची नकारात्मकता येते. माणसाची विनाकारण चिडचिड होते, राग राग होऊ लागतो. मानसिक संतुलन बिघडू शकते. पूर्वीच्या काळी कैद्याला सर्वात मोठी शिक्षा एकांतात ठेवणे ही असायची. असा एकटेपणा हा जीवघेणा असतो.
कधीही कुणी एकटेपणा आपणहून स्वीकारत नाही. तो आलेला असतो. अशाच आशयाचे एक पत्र मला माझ्या एका वाचकाकडून आले होते. त्यांनी माझी “तुझ्या विना” ही कथा वाचली आणि त्यांना त्याच्या प्रिय पत्नीची खूपच आठवण झाली जी त्यांना हल्लीच सोडून गेली होती. त्यांना पदोपदी तिची आठवण येत होती. तिचे दिसणे, तिचे हसणे, तिचे त्यांच्या अवतीभोवती असणे, तिचा आवाज, तिचे बोलणे, सारे त्यांना आठवून आठवून मनाला त्रास देत दुःख देत होते. तिच्याशिवाय जाणवणारा एकटेपणा त्यांना खायला उठत होता. नको नको ते जगणे अशी मनाची भावना होऊ लागली होती. पत्र पाठवून माझ्याकडे मन मोकळे केल्याने कदाचित त्यांना हलके वाटले असावे. त्यांचे ते बोलणे मन हेलावून सोडणारे होते. पत्र वाचून माझ्याही नयनांच्या कडा ओल्या झाल्या. पण आपल्या हातात कुणाची जीवन डोर बांधलेली नसते ती हलवणारी शक्ति कुणी दुसरीच आहे जी आपल्याला ठाऊक नाही तुमचा तिचा इतकाच सहवास लिहिला असेल त्याला कोण काय करू शकणार या माझ्या उत्तरादाखल लिहिलेल्या ओळी त्यांचे मन शांत करू शकल्या असतील पण आयुष्यातला एकटेपणा दूर होण्यासाठी त्यांनी स्वतःच प्रयत्न करणे गरजेचे आहे. एकटेपणा दूर करण्यासाठी मनाला आपल्या आवडीच्या छंदात गुंतवले तर कदाचित त्याची तीव्रता कमी होऊ शकेल. एकटेपणाची, शिक्षेची तीव्रता कमी होण्यासाठी मनाला काहीतरी नवीन स्फूर्ति देणारी गोष्ट केली गेली पाहिजे. अशा एकटेपणातूनच टिळकांनी गीतारहस्य लिहिले, नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया चे लेखन केले. ही सर्व मोठी माणसे होती त्यांच्यासारखे सर्वांना जमणार नाही पण तरीही या एकटेपणावर मात करण्यासाठी काहीतरी उपाय शोधणं शक्य आहे. आजकाल मोबाईल सारख्या गोष्टीमुळे आपण निदान दुसऱ्यांशी कनेक्ट तरी राहू शकतो तेवढ्या पुरता आपला एकटेपणा दूर होतो. कुणाशी गप्पा मारताना ती व्यक्ति आपल्यासोबत आहे याचा निदान आभास तरी होत राहतो जरी दूर असली तरी.
लहानपणापासूनच आपल्याला कुणीतरी सोबत असण्याची सवय झालेली असते. आजूबाजूला माणसांची जाग असली की बरं वाटतं. कधीकधी मन शांत करण्यासाठी एकटेपणा मिळाला तर फार बरं होईल असं वाटत असतं पण ते तात्पुरतं असतं. चिंतन मनन करण्यासाठी माणसाला शांतपणा किंवा एकांत हवा असतो. पण तो त्या कारणा पुरता असतो. तुकाराम महाराज उंच डोंगरावर जाऊन एकांतात देवाची आराधना करायला जात असतं तिथे त्यांनी केलेली अभंग निर्मिती ही श्रेष्ठच होती यात शंका नाही. पण नंतर त्यांची पावले घरच्या दिशेने वळायचीच. म्हणजे त्यांना एकटेपणा नकोसा वाटायचा.
कधीकधी एकटेपणा हा परिस्थितीने किंवा इतरांनी आपल्यावर लादलेला असू शकतो. पण कुणीही सहसा एकटेपणाला सामोरे जायला तयार नसते. गरजेच्या वेळी आपल्या माणसाने साथ सोडली की एकटेपणाची जाणीव होऊ लागते. माझी एक कॉलेजपासूनची मैत्रीण पण तिने कधीच लग्न न करायचा निर्णय घेतला होता, त्यामुळे ती आजन्म अविवाहित राहिली. कॉलेजमध्ये प्रोफेसर होती आता रिटायर झाली. इतकी वर्ष तिची म्हातारी आई तिच्यासोबत राहायची पण आता ती गेल्यावर तिच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली जी कशाने भरून येणार नाही जी एकटेपणाची आहे. आता या वयात तिचा एकटेपणा तिला पोखरत असतो. हे तिच्या फोनवरच्या संभाषणावरून कळते. असा एकटेपणा कुणाच्याच नशिबात येऊ नये असे वाटते. काही माणसे स्वभावाने हट्टी, हेकेखोर असतात त्यांना कुणाशीच जुळवून घ्यायला आवडत नाही. इतरांची नाराजी ओढवून घेतात अशा माणसांशी कुणीच संबंध ठेवायला तयार नसतात त्यांना वाळीत टाकल्यासारखे वागतात. अशाने त्यांना एकटेपणा भोगावा लागतो. अशी माणसे शेवटपर्यंत एकटीच राहतात. त्यांचा एकटेपणाचा अट्टाहास त्यांना माणसांपासून दूर ठेवतो. अशी अनेक सिने कलाकारांची एकटेपणामुळे वाताहत झालेली आहे. माणसांचा माणसांशी संबंध आणि संपर्क तुटल्यामुळे निर्माण झालेला एकटेपणा जीवनात नैराश्य निर्माण करतो. माणूस वाईट सवयीच्या आहारी जाऊ शकतो. बाकीच्या लोकांशी, समाजाशी, नाळ तुटलेला माणूस आपला एकटेपणा सहन करत जगत असतो. कधीकधी तीव्र एकटेपणामुळे त्याचा शेवट मृत्यूत होतो.
पूर्वी हा एकटेपणाचा प्रश्नच उभा राहायचा नाही कारण सगळे एकत्र कुटुंबामुळे एकत्र बांधले गेलेले असायचे त्यांना एकटं कधी वाटत नसे. घरात भरपूर माणसे असायची ती कुणाला एकटे पडू देत नसत. पण आता आधुनिक विचारसरणीप्रमाणे तरुण तरुणींना लग्न नको, मुले नको त्यांची जबाबदारी नको अशा विचारांचा पगडा त्यांच्या मनावर झालेला दिसतो आणि त्याचे परिणाम जपानसारख्या देशांना जाणवू लागले आहेत. एकटेपणाची भावना कुठेतरी माणसाला दुर्बल बनवते. व्हरच्युल फ्रेंडस, सोशल मीडिया याद्वारे ते लोकांशी मैत्री जोडू शकतात पण ते सर्व आभासी आणि तात्पुरते असते. कुठल्याही कारणामुळे एकटेपणा जर कुणाच्या वाट्याला आला असेल तर त्याचा प्रतिकार करत नाती जोडून चार माणसांच्या बरोबर राहून जीवनाचा आनंद घेतला पाहिजे.
प्रतिभा कारंजकर, फोंडा.