मडगावात दररोज ३५ टन ओला कचरा; प्रक्रिया शून्य

काकोडा प्रकल्पात रवानगी : साठलेल्या कचरा प्रक्रियेसाठी आतापर्यंत २० कोटींचा खर्च

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th July, 12:15 am
मडगावात दररोज ३५ टन ओला कचरा; प्रक्रिया शून्य

मडगाव : मडगाव पालिका क्षेत्रात दररोज ३५ टन ओला कचरा व १५ टन सुक्या कचऱ्याची निर्मिती होते. ५ टन सुक्या कचऱ्यावर नेसाय येथे तर १० टन कचऱ्यावर सोनसडोत प्रक्रिया केली जाते. पण दररोजचा ३५ टन ओला कचरा काकोडा प्रक्रिया प्रकल्पात पाठवण्यात येतो. तसेच साठवणूक केलेल्या कचऱ्यावर रेमेडिएशन व आरडीएफ उचल यासाठी आतापर्यंत २० कोटींचा खर्च केलेला आहे. तर दरदिवसा कचरा हाताळणीसाठी ७३ हजारांचा खर्च केला जात असल्याची माहिती नगरविकास खात्याकडून देण्यात आली आहे.
मडगाव येथील सोनसडो कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठवणूक झालेली होती. सुक्या कचऱ्यासाठी बेलिंग मशिन वगळता ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणताही प्रकल्प अद्याप उभारलेला नाही. कचरा प्रकल्पाबाबत आमदार विजय सरदेसाई यांनी प्रश्न केला होता. त्यानुसार नगरविकास खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, मडगावात ३५ टन ओला कचरा दर दिवशी म्हणजे महिन्याला १ हजार टन कचरा होतो. पण ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणतीही सोय नाही. हा कचरा काकोडा-कुडचडे प्रकल्पात पाठवून देण्यात येतो. साठवणूक केलेल्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी ठेकेदाराला २८ नोव्हेंबर २०१९ रोजी आदेश दिलेले होते व ३१ मार्च २०२३ पर्यंत रेमेडिएशनसाठी तर एनर्ट व आरडीएफ उचलसाठी डिसेंबर २०२४ पर्यंतचा वेळ दिलेला आहे. साठवणूक केलेल्या कचऱ्यावर रेमेडिएशन व आरडीएफ उचलसाठी आतापर्यंत २० कोटी ६१ लाख १० हजार ७६ रुपये खर्च करण्यात आले. दरदिवशी ५० टन कचरा गोळा होतो, ३५ टन ओला कचरा गोवा घनकचरा व्यवस्थापनाकडून उपलब्ध गाड्यांतून काकोडा कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेला जातो. १० टन सुका कचरा सोनसडोत तर ५ टन सुका कचरा नेसाय येथे एमआरएफ सुविधेत एका स्वयसहाय्यता गटाकडून प्रक्रिया केली जाते. दरदिवशी कचरा हाताळणीसाठी ७३ हजारांचा खर्च येत असल्याचेही नगरविकास खात्याकडून सांगण्यात आले. सोनसडो येथील कचरा साठवणूक शेड, सिमेंटचा प्लॅटफॉर्म, गटार, पाणी साठवणूक टाकी व संरक्षक भिंतींच्या कामांसाठी सुमारे ३.३९ कोटींचा खर्च आलेला आहे. न्यायालयाकडून देखरेख ठेवण्यात आल्यानंतर कचरा वाहतुकीसाठी वाहनांत वाढ करण्यात आली. याशिवाय पालिकेकडून ट्रकची खरेदीही करण्यात आली.
प्रकल्पाची उभारणी अजूनही नाही
उच्चस्तरीय बैठकीत मे २०२३ मध्ये सोनसडो येथे १५ टीपीडी कचरा प्रकल्प गोवा घनकचरा व्यवस्थापनाकडून जीसुडाच्या सहकार्यातून उभारण्याचे व मडगाव पालिकेने आवश्यक ते सहकार्य करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार मडगाव पालिकेला गोवा घनकचरा व्यवस्थापनाकडून १५ टीपीडी प्रकल्प उभारणी व पाच वर्षे देखभालीसाठी १७.०४ कोटी जमा करण्यास सांगण्यात आलेले होते व निविदा जारी करण्यात आलेली आहे. सध्या साठवणूक केलेल्या शेडमधील कचरा उचल केलेली असली तरीही कचरा प्रक्रियेसाठी अजूनही प्रकल्पाची उभारणी झालेली नाही.