पेडणे, बार्देश तालुक्यांत जमिनीच्या किमतीत वाढ !

मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय : २ दशलक्ष टन खाण मालाचा होणार ई-लिलाव

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th September, 12:26 am
पेडणे, बार्देश तालुक्यांत जमिनीच्या किमतीत वाढ !

पणजी : मंत्रिमंडळाने बार्देश आणि पेडणे तालुक्यांतील जमिनींची किमान किंमत ३,००० रुपये प्रति चौरस मीटरवरून ८,००० रुपये प्रति चौरस मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुधारणा केवळ व्यावसायिक वापरासाठी आहे. मंत्रिमंडळाने चार ठिकाणी २ दशलक्ष टन खाण मालाच्या ई-वितरणलाही मान्यता दिली. पर्वरी येथील मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत माहिती दिली.


महसूल वाढवण्यासाठी बार्देश आणि पेडणे तालुक्यांतील जमिनीच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बार्देश आणि पेडणेमध्ये जमिनींची किंमत प्रति चौरस मीटर ३,००० रुपयांवरून ८,००० रुपये प्रति चौरस मीटरवर जाईल. या दोन्ही तालुक्यांत जमिनीच्या विक्रीच्या प्रमाणात वाढ होत आहे. याशिवाय बांधकाम आणि इतर प्रकल्पही सुरू होत आहेत. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी जमिनीची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इतर तालुक्यांमध्ये पूर्वीचा ३,००० रुपये प्रति चौरस मीटरचा दर तसाच राहील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमाेत सावंत यांनी सांगितले.

याशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकण रेल्वेच्या बाळ्ळी येथे २२० केव्ही सबस्टेशनलाही मंजुरी देण्यात आली आहे. जुन्या पर्वरी मार्केटमधून १८ गाळ्यांना नवीन मार्केटमध्ये स्थलांतरित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमांद सावंत यांनी दिली.

हेही वाचा