मुख्यमंत्रिपद सोडण्याची केजरीवालांची घोषणा

नूतन मुख्यमंत्र्याची दोन दिवसांत निवड : दिल्लीच्या विधानसभा निवडणुुका नोव्हेंबरमध्ये घेण्याची मागणी


16th September, 12:52 am
मुख्यमंत्रिपद सोडण्याची केजरीवालांची घोषणा

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : भाजपने माझ्यावर अप्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले. आता जनतेच्या न्यायालयातच माझ्या प्रामाणिकपणाचा निर्णय होईल. निवडणुकीपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. मनीष सिसोदिया यांच्यावरही माझ्यासारखेच आरोप आहेत, तेही कोणतेही पद घेणार नाहीत, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले. रविवारी येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयात मुख्यमंत्री केजरीवाल कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. दिल्ली मद्यधोरण घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली.
सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तब्बल १५६ दिवसांनंतर तिहार तुरुंगामधून केजरीवाल बाहेर आले. तुरुंगात असताना त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली होती. त्यामुळे केजरीवाल नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. रविवारी दिल्ली येथील सभेत त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली.
मी प्रमाणिक आहे. तुम्हालाही असे वाटत असल्यास आम आदमी पक्षाला भरभरून मतदान करा. दिल्लीच्या निवडणुका येत्या फेब्रुवारीत पार पडणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. दिल्लीचीही निवडणूक त्यासोबतच व्हावी, अशी माझी मागणी आहे. निवडणुका होत नाहीत तोपर्यंत पक्षातूनच कुणीतरी मुख्यमंत्रिपद सांभाळेल. येत्या दोन दिवसांत आमदारांच्या बैठकीत पुढचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर येईल, असेही ते म्हणाले.
केजरीवालांच्या राजीनामास्त्रामागील अर्थ
अरविंद केजरीवाल दिल्ली मद्यधोरण प्रकरणातून जामिनावर तुरुंगातून बाहेर आले आहेत. ते मुख्यमंत्री कार्यालयात जाणार नाहीत आणि कोणत्याही फाईलवर स्वाक्षरी करणार नाहीत, अशी अट सर्वोच्च न्यायालयाने त्यांना घातली आहे. म्हणजे तुरुंगातून बाहेर येऊन मुख्यमंत्री असूनही त्यांच्याकडे सत्ता राहिलेली नाही. मंत्रिमंडळाच्या भरवशावर सरकार चालेल.
दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२५ मध्ये संपत आहे. म्हणजे सरकारकडे निवडणुकीसाठी अवघे पाच महिने उरले आहेत. केजरीवाल न्यायालयाच्या अटींना बांधील आहेत. मात्र तुरुंगातून सुटल्यानंतर केजरीवाल यांच्याबद्दल लोकांत सहानुभूती आहे. या सहानुभूतीचे भांडवल केजरीवाल यांना दोन-तीन महिने आधीच दिल्लीत निवडणुकांची मागणी करून करायचे आहे.
दिल्ली दारू धोरण प्रकरणात त्यांचे नाव आल्यापासून आणि अटक झाल्यापासून भाजप नेते अरविंद केजरीवालांकडे मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. केजरीवाल यांनी आता राजीनामा जाहीर केला आहे. आता मी राजीनामा दिला आहे, असे सांगून भाजप नेत्यांच्या प्रत्येक हल्ल्याला ते प्रत्युत्तर देतील.
दोन दिवसांत पक्षाच्या विधिमंडळ गटाची बैठक होईल. त्या बैठकीत पक्षातील दुसऱ्या नेत्याची मुख्यमंत्रिपदी निवड केली जाईल. दिल्लीच्या जनतेचा निर्णय येईपर्यंत मी मुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही. दिल्लीच्या नागरिकांनी पुन्हा निवडून दिल्यानंतरच मी आणि मनीष सिसोदिया पद व राज्याची जबाबदारी स्वीकारणार आहोत. जनतेला मी प्रामाणिक वाटत असेन, तरच आम्हाला निवडून द्यावे. मी प्रामाणिक नसेन तर आम्हाला निवडून देऊ नये.
_ अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री

दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होईल, हे महत्त्वाचे नाही. केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर आपचे सरकार एक आठवडा, एक महिना कसे चालते, ते महत्त्वाचे आहे. पुढील मुख्यमंत्री कोण याचा निर्णय आमदारांच्या बैठकीत घेतला जाईल; पण दिल्लीची जनता आपच्या पाठिशी आहे. आमचा पक्ष तोडण्याचे षडयंत्र रचण्यात आले. मात्र पक्ष धीराने सामोरा गेला. पक्षाचे ऐक्य कायम राहील. या एकीने, प्रामाणिकपणाने दिल्लीच्या जनतेचा विश्वास कमावला आहे.
_ आतिशी, नेत्या, आप
मुख्यमंत्रिपदासाठी ‘यांची’ नावे चर्चेत


१. गोपाल राय : आम आदमी पक्षाचे संयोजक आहेत. केजरीवालांच्या अनुपस्थितीत ते पक्ष संघटनेचे कामकाज पाहतात. विद्यमान सरकारमध्ये ते मंत्री असून बाबरपूरचे आमदार आहेत.


२. आतिशी मार्लेना : सध्या दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम व शिक्षणमंत्री म्हणून काम पाहत आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये त्या केजरीवाल व सिसोदिया यांच्यानंतरच्या तिसऱ्या मोठ्या नेत्या म्हणून परिचित आहेत. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत १५ ऑगस्ट रोजी मार्लेना यांनीच विधानसभेबाहेरील राष्ट्रध्वज फडकवला होता.
३. कैलाश गहलोत : दिल्लीच्या मंत्रिमंडळात कैलाश गहलोत यांच्याकडे आठ खाती आहेत. यामध्ये कायदा, न्याय व विधीमंडळ व्यवहार, वाहतूक, प्रशासकीय सुधारणा, माहिती व तंत्रज्ञान, महसूल, वित्त आणि नियोजन या खात्यांचा समावेश आहे. अन्य कोणाकडेही इतकी खाती नाहीत.
४. सौरभ भारद्वाज : सौरभ भारद्वाज यांच्याकडे सध्या दक्षता, सेवा, आरोग्य, उद्योग, शहरी विकास व पूर नियंत्रण व पाणी पुरवठा मंत्रालयाचा कारभार आहे.
५. इम्रान हुसैन : इम्रान हुसैन यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचा कारभार आहे.


६. सुनीता केजरीवाल : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आहेत.

२०१३ पासून दिल्लीत केजरीवाल यांचेच सरकार
दिल्लीतील केजरीवाल सरकारचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२५ मध्ये संपणार आहे. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्ष २०१३ पासून दिल्लीत सत्तेत आहे. ४ डिसेंबर २०१३ रोजी दिल्लीत ७० जागांवर विधानसभा निवडणुका झाल्या. ८ डिसेंबर २०१३ रोजी निकाल आले. यामध्ये भाजप ३२ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, बहुमत मिळाले नाही. आपला २८, तर काँग्रेसला ८ जागा मिळाल्या. काँग्रेसच्या पाठिंब्याने केजरीवाल मुख्यमंत्री झाले. दोन्ही पक्षांची युती ४९ दिवसांनंतर तुटली. ७ फेब्रुवारी २०१५ रोजी पुन्हा विधानसभा निवडणुका झाल्या. आपने ६७ जागा जिंकल्या. पाच वर्षांनंतर ८ फेब्रुवारी २०२० रोजी झालेल्या निवडणुकीत आपने ६२ जागा जिंकल्या होत्या.
...

पत्नीला मुख्यमंत्री करण्यासाठी दोन दिवसांची मुदत : भाजप
भाजपा नेते मनजिंदर सिंग सिरसा केजरीवालांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर म्हणाले, केजरीवाल यांनी राजीनामा देण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली आहे. या दोन दिवसांत ते त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री बनवण्यासंदर्भात निर्णय घेणार आहेत. यासाठी ते दोन दिवसांत पक्षातील सर्व आमदारांचे मन वळवणार आहेत.
अरविंद केजरीवाल स्वतःहून राजीनामा देत नाही आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. न्यायालयाने त्यांना मुख्यमंत्रिपदावरून खडे बोल सुनावल्यानंतर त्यांच्याकडे दुसरा पर्यायच उरलेला नाही. केजरीवाल भ्रष्टाचारात इतके बुडालेत की, सर्वोच्च न्यायालयाला म्हणावे लागले की, ‘तुम्ही मुख्यमंत्रिपदावर बसून सह्या करू शकत नाही’.

हेही वाचा