इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची तोंडे विरुद्ध दिशांना!

प्रदेश काँग्रेसच्या आंदोलनांना इतरांची साथ नाही; कार्यकर्त्यांकडून प्रश्नचिन्ह

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th September, 12:26 am
इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची तोंडे विरुद्ध दिशांना!

पणजी : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या बॅनरखाली एकत्र आलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीनंतर मात्र तोंडे विरुद्ध दिशांना फिरवली आहेत. काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड हे पक्ष वैयक्तिकरीत्या आंदोलने छेडत आहेत. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंची शिवसेना या आंदोलनांपासून अजूनही दूर आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या गोव्यातील घटक पक्षांमध्ये फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली. त्यानुसार, गोव्यातही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीत आप, गोवा फॉरवर्ड, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांसारखे पक्ष सहभागी झाले. या पक्षांनी निवडणुकीत संघटितपणे काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचा प्रचार केला. त्याचा फायदा म्हणून दक्षिण गोव्याचा गड काँग्रेसला राखता आला. त्यानंतर मात्र हे एकमेकांपासून दूर गेल्याचे दिसून आले. विधानसभेच्या पावसाळी अ​धिवेशनातही काँग्रेस, आप आणि गोवा फॉरवर्डच्या आमदारांनी आपापल्या पक्षांच्या अजेंड्यांनुसार कामगिरी केली. गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध प्रश्नांवरून प्रदेश काँग्रेसने आंदोलने छेडण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण गोव्यातील सनबर्न महोत्सव, डोंगर कापणी, खराब रस्ते आदी प्रश्नांवरून प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते, पदाधिकारी रस्त्यावर उतरत आहेत. परंतु, काँग्रेसच्या या आंदोलनांना इंडिया आघाडीत असलेल्या इतर पक्षांकडून मात्र पाठिंबा मिळत नसल्याने काँग्रेस नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांची भूमिका पावसाळी अधिवेशन काळात स्पष्ट झाली होती. या अधिवेशनानंतर आमदार सरदेसाई यांनी सोशल मीडियाचा आधार घेत, सरकारवर विविध प्रश्नांवरून हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. पण, ते किंवा त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी काँग्रेसच्या आंदोलनांमध्ये उतरत असलेले दिसत नाहीत. आप आणि काँग्रेसचे पदाधिकारी मध्यंतरीच्या काळात काही आंदोलनांत एकत्र दिसले. परंतु, काँग्रेसने महत्त्वाच्या विषयांवरून छेडलेल्या आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग दिसला नाही. ​शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलने, मोर्चांकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या पक्षांचे पदाधिकारी नाराज असल्याचेही दिसून येत आहे.
निश्चित विचार करू : पालेकर
आपचे गोवा निमंत्रक अमित पालेकर यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, आप आणि काँग्रेसने काही आंदोलने एकत्र येऊन केली आहेत. पण, इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांनी संघटित होऊन ज्यापद्धतीने सरकारला विरोध करणे गरजेचे आहे, त्याप्रमाणे ते होत नाही, असे ते म्हणाले. २०२७ पर्यंत एकत्र राहून भाजपचा पराभव करण्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतलेला आहे. त्यामुळे आंदोलने, मोर्चांत सर्वांनी संघटित होणे आवश्यक असून, त्यावर आम्ही निश्चित विचार करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या आंदोलनांना साथ अपेक्षित : पाटकर
राज्यातील भाजप सरकारची अनेक बेकायदेशीर कृत्ये चव्हाट्यावर आणण्यासाठी प्रदेश काँग्रेस नव्या दमाने मैदानात उतरला आहे. अशावेळी इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी काँग्रेसच्या आंदोलने, मोर्चांना पाठिंबा देऊन सरकारला घेरणे आवश्यक आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले. आगामी काळात प्रदेश काँग्रेस आणखी आक्रमकपणे सरकारला विविध प्रकरणांत उघडे पाडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.             

हेही वाचा