तंंबाखू सेवनामुळे तोंडाच्या कॅन्सरमध्ये वाढ!

डॉ. जगदीश काकोडकर : कॅन्सर स्क्रिनिंग अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद


16th September, 12:50 am
तंंबाखू सेवनामुळे तोंडाच्या कॅन्सरमध्ये वाढ!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात तोंडाच्या कॅन्सरची लागण झालेल्या किंवा असा कॅन्सर होण्याआधीच्या पातळीवर असलेल्यांची संख्या वाढत असून, त्याला तंबाखूजन्य पदार्थांचे सेवनच कारणीभूत असल्याचे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) कम्युनिटी विभागाचे प्रमुख तथा राज्य सरकारने सुरू केलेल्या कॅन्सर स्क्रिनिंग अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. जगदीश काकोडकर यांनी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षांपासून राज्यात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, त्यात मृत पावणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी तसेच पहिल्या पातळीवर कॅन्सरची ओळख झाल्यास संबंधित रुग्णाला रुग्णाला वाचवण्यासाठी सरकारने कॅन्सर स्क्रिनिंग अभियानास सुरुवात केली आहे. या अभियानाअंतर्गत मोबाईल कॅन्सर डिटेक्शन व्हॅनद्वारे नागरिकांची मोफत तपासणी केली जात असून, आतापर्यंत मंडूर, वाळपई, कुडचडे आणि साखळी या चार भागांतील स्थानिकांच्या चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. या चारही ठिकाणच्या चाचण्यांमधून एकाला तोंडाचा कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. तर, २४ जण तोंडाचा कॅन्सर होण्याआधीच्या पातळीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात इतर प्रकारांच्या तुलनेत तोंडाचा कॅन्सर होणाऱ्यांची संख्या वाढत असून, याचे प्रमुख कारण तंबाखूजन्य पदार्थांचे वाढते सेवन हेच असल्याचे डॉ. काकोडकर यांनी नमूद केले.
गुटखा, सिगारेट, पान मसाल्याचे सेवन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सध्याची युवापिढी ई-सिगारेटचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यामुळेच तोंडाचा कॅन्सर झालेले किंवा त्याआधीच्या पातळीवर असलेल्यांची संख्या वाढत आहे. सरकारने सुरू केलेल्या कॅन्सर स्क्रिनिंग अभियानास विविध भागांतून मोठा प्रतिसाद मिळत असून, त्याचा फायदा अनेकांना मिळणार आहे. कॅन्सरची लागण होण्यापूर्वी त्याची माहिती मिळाल्यास संबंधितांवर तत्काळ उपचार करणे शक्य होऊन त्याचा जीवही वाचवणे शक्य होणार असल्याचेही डॉ. काकोडकर यांनी स्पष्ट केले.
राज्यात महिन्याला सापडतात कॅन्सरचे १३९ रुग्ण
गेल्या काही वर्षांत राज्यातील कॅन्सरच्या रुग्णांत मोठ्यात प्रमाणात वाढ झाली आहे. २०१९ ते २०२३ या पाच वर्षांच्या काळात महिन्याला सरासरी १३९ कॅन्सरचे रुग्ण राज्यात आढळले आहेत.
२०१९ ते २०२३ या पाच वर्षांत राज्यात कॅन्सरचे एकूण ८,२९६ रुग्ण आढळले. त्यात २०१९ मधील १,५९१, २०२० मधील १,६१८, २०२१ मधील १,६५२, २०२२ मधील १,७००, तर २०२३ मधील १,७३५ रुग्णांचा समावेश आहे.            

हेही वाचा