कुडचडे मतदारसंघातील खड्डेमय रस्त्यांविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th September, 12:15 am
कुडचडे मतदारसंघातील खड्डेमय रस्त्यांविरोधात काँग्रेसचे आंदोलन

खराब रस्त्यावर माती टाकून त्यावर शेण सारवून निषेध करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर. सोबत पराग सबनीस व इतर. (संदीप मापारी)  

सांगे : कुडचडे मतदारसंघात विकासकामाच्या नावाखाली गेली दोन वर्षे रस्त्यांची तोडफोड करून सामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण बनले आहे. येथील काम अजून थांबलेले नाही. पुन्हा पुन्हा एकाच ठिकाणी माती उकरून काढली जात आहे. या कामावर कोणाचेही लक्ष नसल्याने कंत्राटदार आपल्या मर्जीनुसार काम करून जनतेला वेठीस धरू लागला आहे. ही परिस्थिती केवळ कुडचडे मतदारसंघात घडलेली नसून संपूर्ण गोव्यात अशी वाईट स्थिती निर्माण झाली असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. जेटपॅचद्वारे खड्डे बुजविणार म्हणून केवळ हवा निर्माण केली. पण, प्रत्यक्षात काहीच केले नाही, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना पाटकर म्हणाले, रस्ते खराब झाले म्हणून राज्य सरकार कंत्राटदारावर कारवाई करून त्याचे नाव काळ्या यादीत घालणार म्हणून सांगतात, तर कधी अभियंत्यावर कारवाई करणार असे सांगत असले तरी अातापर्यंत कोणावर कारवाई केली ते स्पष्ट करावे. इतकेच नाही तर राज्यात दरडी कोसळून वाहतूक बंद पडली, पण कारवाई न करता एमव्हीआर‍सारखे जावई राज्यात नवीन कंत्राट घेत आहेत. मग कारवाई कोणावर केली? की दरडी कोसळण्यास जबाबदार असलेल्यांना बक्षीस म्हणून नवीन कामे दिली जातात, असा प्रश्न करून या सरकारच्या राज्यात जनता सुखी समाधानी नसून आपल्या मर्जीतील लोकांना खुश करणारे हे सरकार अाहे, अशी टीकाही त्यांनी केली.

रस्त्यावर शेण सारवून सरकारचा निषेध
कुडचडे आणि खास करून राज्यभरात वाहतूक करणाऱ्या मुख्य रस्त्याची झालेली वाताहत आणि त्यातही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यावर एकही खड्डा उरणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्या सर्व आश्वासनांना सरकारने हरताळ फासल्याने प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांच्या पुढारपणाखाली कुडचडे काँग्रेसने गांधीगिरी करून रस्त्यावर माती टाकून त्यावर शेण सारवून तीव्र निषेध केला. यावेळी काँग्रेसगट अध्यक्ष पराग सबनीस, अॅड. हर्षद गावस देसाई, शाम भंडारी, जाॅर्ज डिसोझा, संकेत भंडारी आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा