स्वेच्छा निवृत्ती योजनेला शिक्षण खात्यातून अत्यल्प प्रतिसाद

दोन शिक्षक, दोन कारकुनांकडून अर्ज


16th September, 12:43 am
स्वेच्छा निवृत्ती योजनेला शिक्षण खात्यातून अत्यल्प प्रतिसाद

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्य सरकारने ‘क’ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या स्वेच्छा निवृत्ती योजनेला शेकडो कर्मचाऱ्यांनी अर्ज केले असले तरी शिक्षण खात्यातून मात्र या योजनेला आतापर्यंत अत्यल्प प्रतिसाद मिळला आहे. शिक्षण खात्यात आतापर्यंत स्वेच्छा निवृत्ती योजनेसाठी शिक्षकांकडून दोन, तर कारकुनांकडूनही फक्त दोनच अर्ज आले आहेत. हे अर्ज सरकारी शिक्षण संस्थांमधील आहेत. योजनेसाठी मुदत असल्याने आणखी अर्ज येण्याची शक्यता आहे, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले.
राज्य सरकारने ‘क’ श्रेणी कामगारांसाठी लागू केलेल्या स्वेच्छा निवृत्ती योजनेला (व्हीआरएस) उत्तम प्रतिसाद मिळाला, अशी माहिती सूत्रांनी दिली. ४५ वर्षांहून अधिक वय आणि २० वर्षे सेवा पूर्ण केेलेल्या ‘क’ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सप्टेंबरमध्ये संपणार आहे. मंत्रिमंडळाने फेब्रुवारी महिन्यात योजनेला मंजुरी दिली होती. अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर खात्यांचे प्रमुख सर्व अर्ज एकत्र करून त्यावर शिफारसीचा शेरा मारतील. नंतर ते अर्ज आर्थिक विभागाकडे पाठवले जातील. नियमाप्रमाणे निवृत्तीवेतन (पेन्शन) आणि जितकी वर्षे निवृत्तीला राहिली आहेत, त्यांपैकी दोन महिन्यांचा पगार देण्याची तरतूद योजनेत आहे. योजनेसाठी अर्ज येत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. खात्याच्या प्रमुखांनी अर्ज पाठवल्यानंतर स्वेच्छा निवृत्तीविषयी अर्थिक विभाग अंतिम निर्णय घेईल.

हेही वाचा