रुमडामळ येथे डेंग्यूचे रुग्ण; आर्ले येथे युवकाचा तापाने मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th September, 12:35 am
रुमडामळ येथे डेंग्यूचे रुग्ण; आर्ले येथे युवकाचा तापाने मृत्यू

मडगाव : रुमडामळ हाऊसिंग बोर्ड परिसरातील कचरा समस्येमुळे साथरोगाचा प्रश्न वारंवार येत आहे. यापूर्वी एका बालकाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. आता आणखी तीन डेंग्यूसदृश लक्षणे असलेली रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, आर्लेम येथील एका २२ वर्षीय युवकाचा तापाने मृत्यू होण्याची घटना घडलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुमडामळ दवर्ली परिसरात यापूर्वी जून महिन्यात एका ५ वर्षीय बालकाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. सदर कुटुंबीय भाड्याच्या छोट्याशा खोलीत राहत होते. जिथे मोठ्या प्रमाणात कचर्‍याची साठवणूक होती. अजूनही रुमडामळ परिसरातील कचर्‍याच्या समस्येत सुधारणा झालेली नाहीत. आता नव्याने बांधलेल्या एका इमारतील दोन महिन्यापूर्वी राहायला आलेल्या एका कुटुंबातील लहान मुलांसह आणखी दोघांना डेंग्यूसदृश लक्षणे दिसून आली आहेत. याची माहिती कुडतरी आरोग्य केंद्राला मिळाल्यानंतर आरोग्य विभागाकडून आवश्यक ती उपाययोजना करत परिसरात औषध फवारणी केली आहे. रुमडामळ पंच सदस्य सैफुल्ला फनीबंध यांनीही पंचायतीकडून नागरिकांना स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती केली जात असल्याचे सांगितले.
दरम्यान, आर्ले येथे राहत असलेल्या दिलू पुरन राम या मूळ झारखंड येथील २२ वर्षीय युवकाचा ताप आल्याने मृत्यू झाला आहे. आर्ले येथील कामाच्या ठिकाणी परिसरात दिलू राम हा राहत होता. मागील चार दिवसांपासून त्याला ताप येत होता. बुधवारी त्याला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. फातोर्डा पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. ताप आल्याने मृत्यू झालेल्या या कामगारालाही डेंग्यूसदृश लक्षणे असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, आरोग्य अधिकार्‍यांकडून याला दुजोरा मिळालेला नाही.

हेही वाचा