बाणस्तारी, पणजी बाजारात माटोळी साहित्याच्या दरांत वाढ

माटोळीच्या कात्र्यासाठी १ हजार ते १२०० रुपये, पाच नारळांची पेंड ५०० रु.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th September, 12:49 am
बाणस्तारी, पणजी बाजारात माटोळी साहित्याच्या दरांत वाढ

पणजी/फोंडा : बाणास्तारी येथे माटोळी बाजाराला प्रचंड गर्दी दिसून आली. राज्यात बाणास्तारी येथे भरण्यात येणारा चतुर्थी बाजार प्रसिद्ध असल्याने अनेक ठिकाणीहून लोकांनी गर्दी केली. दरम्यान, माटोळीसाठी कात्रे (सुपारीचा घोस) १ हजार ते १२०० रु., ५ नारळांची पेंड ५०० रु. दराने विकले जात होते.

बाणस्तारीतील बाजाराला ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. माटोळीसाठी लागणारे कात्र्ये, नारळाच्या पेंडी, विविध प्रकाराची बागायती फळे, रान फळे, केळीचे घड, केळीची पाने व अन्य सर्व प्रकारचे साहित्य  बाजारात उपलब्ध झाले आहे. अनेक विक्रेत्यांकडे पाने, केळीची पाने, शिवाय नारळ, पोफळी, भोपळे, रानफळे, फुले विक्रीसाठी उपलब्ध आहे. पणजी, म्हापसा, मडगाव फोंडा, वास्को भागांतील अनेक व्यापाऱ्यांनी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.                        

पणजीत माटोळीच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. यंदा पावसामुळे माटोळी साहित्याचे नुकसान झाल्यामुळे सर्वच वस्तू दुप्पट दराने विकल्या जात आहेत. पणजीत कातरे आकारानुसार ५०० ते ७००, तर सर्वात मोठे १५०० ते १७०० पर्यंत विकले जात होते. घागरे, करमाळा, तीन कुंफळे, कांगला आदी १०० रु. होते. गेल्यावर्षी हेच साहित्य १०० रु. जोडी मिळत होते. पण यावेळी एकच विकले जात हाेते. गावठी फळे तोरींग, चिबूड १०० रु., म्हावळींग १००-१५० रु., तीन मंडोळी केळी १०० रु. फणा, वीस आंबाडे १०० रु., पाच नारळाची पेंड ५०० रु., तर निरफणसाची किंमत ५०० रु. होती.

यंदा माटोळी साहित्य खूप महागले आहे. बाणावली बाजारात माटोळी सामानासाठी आम्ही जेवढे पैसे दिले, तेवढेच पैसे देऊन ग्राहक या वस्तूंची मागणी करत आहेत. यावर्षी पावसामुळे सामानाचे फारच नुकसान झाले. गेल्यावर्षी हेच सामान १०० रुपये जोडी विकले जात होते. पण, यावर्षी साहित्य कमी असल्यामुळे महाग विकावे लागत आहे. _लक्ष्मी गावडे, माटोळी साहित्य विक्रेती

गावठी कात्र्यांच्या किमतीत भरमसाट वाढ
गेल्या काही दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारात सर्व दरात वाढ दिसून येत आहे. माटोळीच्या बाजारात गावठी कात्रे कमी विक्रीसाठी उपलब्ध असून त्याच्या दरात भरमसाठ वाढ दिसून येत आहे. कात्रे, कांगले, तोरिंग व इतर फळे कमीतकमी १०० रुपये दरात विक्री करण्यात येत आहे. त्यात चतुर्थीच्या दिवसात लागणारी केळीची पाने ४०० रु. ला शंभर, रानफुले व अन्य फळांना ५० रुपये, ८ नाराळाची पेंड सुमारे १ हजार रुपये, पोफळीच्या कात्र्याचा दर रु. १२०० व अन्य साहित्य महाग दरात विक्री करण्यात येत आहे.                          

हेही वाचा