पुरुषांच्या उंच उडीत प्रवीण कुमारला सुवर्ण

पॅरिस पॅरालिम्पिक : भारताच्या खात्यात २६ पदके

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
06th September 2024, 10:55 pm
पुरुषांच्या उंच उडीत प्रवीण कुमारला सुवर्ण

पॅरिस : पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने २६ वे पदक जिंकले आहे. प्रवीण कुमारने शुक्रवारी पुरुषांच्या उंच उडी टी-६४ च्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले. त्याने २.०८ मीटर उडी मारून आशियाई विक्रम केला. या पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे सहावे सुवर्ण आहे.
प्रवीण कुमारच्या मदतीने भारत पदकतालिकेत १४ व्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत ६ सुवर्ण, ९ रौप्य आणि ११ कांस्य पदके जिंकली आहेत. पॅरालिम्पिकमधील भारताची ही सर्वकालीन सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी ५ सुवर्णांसह १९ पदके जिंकली होती.
प्रवीणने चमकदार कामगिरी करत पुरुषांच्या उंच उडी टी-६४ च्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले. त्याने २.०८ मीटर उडी मारून आशियाई विक्रम केला. अमेरिकेच्या डेरेक लोक्सिडेंटने २.०६ मीटरच्या उडीसह रौप्य, तर उझबेकिस्तानच्या टेमुरबेक गियाझोव्हने २.०३ मीटरच्या वैयक्तिक उडीसह कांस्यपदक जिंकले. प्रवीण कुमारने टोकियो २०२० मध्ये रौप्य पदक जिंकले होते.
भारताचे आज ५ अंतिम सामने
पॅरालिम्पिक स्पर्धेच्या ९ व्या दिवशी भारत ५ अंतिम सामने खेळणार आहे. कस्तुरी राजमनी पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ६७ किलो गटाच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहे. भावनाबेन आजबाजी चौधरी महिलांच्या भालाफेकच्या एफ-४६ स्पर्धेत पदक जिंकू शकतात, तर सोमण राणा पुरुषांच्या शॉटपुट एफ ५७ फायनलमध्ये खेळणार आहे.