निर्माल्य गोळा करून कंपोस्ट खत तयार करणार

आमदार तुयेकर : दवर्ली-झर येथे निर्माल्यदान कलश उपक्रमाची सुरुवात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th September, 12:55 am
निर्माल्य गोळा करून कंपोस्ट खत तयार करणार

निर्माल्य कलशाचे उद्घाटन करताना आमदार उल्हास तुयेकर. आमदार दिगंबर कामत व इतर.

मडगाव : दवर्ली येथे गणेश विसर्जन केले जात असलेल्या दवर्ली-झर याठिकाणी आमदार उल्हास तुयेकर यांच्या पुढाकारातून निर्माल्यदान कलश ठेवण्यात आले आहे. पर्यावरण चांगले राखण्यासाठी व निर्माल्यापासून खत निर्मितीसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, असे आमदार तुयेकर यांनी सांगितले.
दवर्ली-झर येथील गणपती विसर्जनस्थळी ठेण्यात आलेल्या निर्माल्य कलश उपक्रमाचा शुभारंभ आमदार तुयेकर यांच्यासह आमदार दिगंबर कामत, योगिराज कामत, सरपंच साईश राजाध्यक्ष व पंचसदस्य यांच्या उपस्थितीत झाला. आमदार तुयेकर यांनी सांगितले की, गणेश विसर्जनावेळी निर्माल्य इकडेतिकडे टाकण्यात येते व पाहण्यास चांगले दिसत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी निर्माल्यदान कलशाची संकल्पना पुढे नेण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
आमदार कामत यांनी सांगितले की, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा प्रश्न निर्माण होतो तसेच मूर्तीवरील निर्माल्य इतरत्र किंवा पाण्यात उडवण्यात येते. त्यानुसार निर्माल्य एकत्रित करत त्याचे कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे. दवर्ली झर याठिकाणी उपलब्ध जागेचे सौंदर्यीकरण केले जाऊ शकते त्यासाठी जलस्रोत खात्याकडून नियोजन करण्यात यावे, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. पर्यावरण राखण्यासाठी भाषणे देणे खूप सोपे असते. पण, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठीही लोकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. मंदिरातील फुले एकत्र करत अगरबत्ती करण्याचा उपक्रमही काही ठिकाणी सुरू आहे. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही कामत म्हणाले.
दवर्ली गावात घरोघरी कचरा संकलन केले जाते. आता गणेश विसर्जनावेळी निर्माण होणार्‍या निर्माल्यावर उपाययोजना म्हणून आमदार तुयेकर यांनी दोन निर्माल्य कलश दिले. त्यानंतर गोळा होणार्‍या निर्माल्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खतनिर्मिती केली जाणार आहे. यासाठी योगिराज कामत यांचे सहकार्य लाभल्याचे सरपंच साईश यांनी सांगितले.      

हेही वाचा