चतुर्थीत चोऱ्यांवर नियंत्रणासाठी रात्रीची गस्त वाढवणार

पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांची माहिती : पोलीस महासंचालकांसह मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th September, 12:29 am
चतुर्थीत चोऱ्यांवर नियंत्रणासाठी रात्रीची गस्त वाढवणार
Pic By: चतुर्थीत चोऱ्यांवर नियंत्रणासाठी रात्रीची गस्त वाढवणार

पणजी : चतुर्थीच्या काळात चोऱ्या तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढविण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक व पोलीस उपअधीक्षकांना गस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

राज्यात चतुर्थीच्या काळात गर्दी वाढते. बरेचजण सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांना जातात. यामुळे चोऱ्या घडण्याची शक्यता असते. चोऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचे उपाय योजले आहेत. राखीव पोलिसांच्या मदतीने गस्त वाढवली जाईल. कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधिक्षक अक्षत कौशल यांनी केले आहे. वाहतूक नियंत्रणासाठीही पोलिसांची खास व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती कौशल यांनी दिली.


राज्यात शनिवारीपासून गणेश चतुर्थीला प्रारंभ होत आहे. चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे. चतुर्थी हा राज्याचा एक महत्त्वाचा सण आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक अलोक कुमार, पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. चतुर्थीतील सुरक्षा तसेच कायदा सुव्यवस्थेवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 

संशयास्पद व्यक्ती किंवा संशयास्पद घटना दिसून आल्यास जवळच्या पोलीस स्थानकाला नागरिकांनी माहिती द्यायला हवी. वेळीच माहिती मिळाली तर चोऱ्यांसारख्या प्रकारांना आळा घालणे सोपे होते. तसेच समाजविघातक व्यक्तींवर नजर ठेवणेही शक्य होते, असे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले. लाऊडस्पीकर अथवा कर्णकर्कश संगीतावरही पोलीस नियमानुसार कारवाई करणार आहेत. चतुर्थीत राज्याचे वातावरण शांत रहावे, असे पोलिसांचे प्रयत्न असल्याचे कौसल म्हणाले.

हेही वाचा